बीट लागवड

बीट लागवड
जमीन आणि हवामान
बीट हे थंड हवामानातील पिक असून बीटची प्रत, रंग, चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते. थंड हवामानात साखरेचे प्रमाण वाढते. जास्त तापमानात मुळांना चांगला रंग येत नाही. तापमान १० अंश सेल्सीअसपेक्षा कमा झाल्यास बीटच्या खाण्यायोग्य मुळाची पुर्ण वाढ न होताच पीक फुलावर येते.
बीटची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतू बीट हे जमिनीत वाढणारे कंदमुळ असल्याने बीटच्या लागवडीसाठी भुसभुशीत आणी पाण्याच्या उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. अतीभारी जमिनीत बीटची लागवड केल्यास मुळाचा आकार वेडावाकडा होतो. बीटच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा. जमिनीचा सामू ९ ते १० पर्यत असणा-या खारवट क्षारयुक्त जमिनीतही बीटचे पिक उत्तम येते. महाराष्ट्रातील हवामानात रब्बी खरीप हंगामातही बीटची लागवड केली जाते.
जमीन आणि हवामान
बीट हे थंड हवामानात वाढणारे पिक असून पिकाच्या वाढीसाठी थंड हवामान पोषक असते. बीटच्या रब्बी हंगामातील लागवडीसाठी बियांची पेरणी ऑक्टोबरमध्ये करावी. महाराष्ट्रातील हवामानात बीटचे पीक खरीप हंगामातही घेतले जाते. त्यासाठी बियांची पेरणी जून-जुलै महीन्यात केली जाते.
वाण –
बीटच्या आकारमानाप्रमाणे त्याचे चपटे, गोल, लंबगोल आणि लांब असे प्रकार पडतात. डेट्राईट डार्क रेड आणि क्रिमसन ग्लोब या दोन गोल आकाराच्या जाती भारतात चांगल्या वाढतात.
१) डेट्राईट डार्क रेड- या जातीची मुळे एकसारखी गोल आकाराची, मुलायम असतात. मुळांचा रंग गर्द लाल असतो. मुळातील गराचा रंग रक्तासारखा गर्द लाल असतो. या जातीमध्ये कंदाचा वरील पानांचा भाग कमी असतो. पाने गर्द हिरव्या रंगाची व मरून रंगमिश्रीत असतात. या जातीचे पिक लागवडीनंतर ८०-१०० दिवसांत तयार होते. हा अधिक उत्पादन देणारा वाण आहे.
२) क्रीमसन ग्लोब- या जातीची मुळे गोल चपट्या आकाराची असतात. मुळांचा रंग मध्यम लाल असतो. मुळातील गराचा रंग फीकट लाल असतो. कापल्यानंतर यामध्ये रंगाच्या स्तरांची रचना दिसून येत नाही. पाने मोठी गर्द हिरवी आणि मरून रंगमिश्रीत असतात. कंदाचा वरील भाग मध्यम ते उंच असतो.
३) याशिवाय बीटचे क्रॉसब्रॉय इजिप्शीयन आणि अर्ली वन्डर हे उन्नत वाण आहेत.
बियाण्याचे प्रमाण, लागवडीचे अंतर आणि लागवड पध्दती –
एक हेक्टर लागवडीसाठी बीटरूटचे ७ ते १० किलो बियाणे लागते. बीटचे एक बी म्हणजे दोन किंवा जास्त बियांचा समूह असतो. बीटची लागवड पाभरीने पेरून किंवा बी टोकून करतात. बीटची लागवड करण्यासाठी ४५ सेंटीमिटर अंतरावर स-या कराव्यात आणि वरंब्यावर १५ – २० सेंटीमीटर अंतरावर बिया टोकून लागवड करावी. काही वेळा ३० सेंटीमीटर अंतरावर पाभरीने पेरणी करतात. नंतर विरळणी करून एका ठीकाणी एकच रोप ठेवावे. बीटचे बी पेरण्यापुर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास बियांची उगवण चांगली होते. बियाणे पेरताना जमिनीत ओलावा असावा. बीटची लागवड ३०-४५ बाय १५-२० सेंटीमीटर अंतरावर करावी.
खते आणि पाणी व्यवस्थापन –
जमिनीच्या मशागतीची वेळी १५- २० गाड्या शेणखत जमिनीत चांगले मिसळून द्यावे. बीटच्या पिकाला ६०-७० किलो नत्र, १०० ते १२० किलो स्फुरद आणि ६०-७० किलो पलाश दर हेक्टरी द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद आणि पलाशची पुर्ण मात्रा बियांची पेरणी करताना द्यावी. नत्राची उरलेली अर्धी मात्रा पेरणीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी द्यावी. हलक्या जमिनीत लागवड केल्यास नत्राची मात्रा वाढवावी.
कंदाच्या चांगल्या वाढीसाठी पिकाला पाण्याचा भरपूर पुरवठा करावा. जमिनीत सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण चांगली होऊन पिकांची वाढ चांगली होते. पिकवाढीच्या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. रब्बी हंगामात पिकाला ८-१० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
आंतरमशागत आणि आंतरपिके –
बीटच्या बियाण्याची पेरणी केल्यानंतर विरळणी करणे आवश्यक आहे. बिटच्या एका बीजामध्ये २ ते ६ बिया असतात आणि त्यातील प्रत्येक बी उगवू शकते. म्हणून बीटमध्ये विरळणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
विरळणी करतांना एका ठीकाणी फक्त एकच रोप ठेवावे. आणि बाकीची रोपे हातांनी काढून टाकावीत. पिकातील तण खुरप्याने काढून निंदणी करावी आणि शेत तणरहीत ठेवावे. पीक ४५ दिवसाचे झाल्यावर खोदणी करून मुळाला भर द्यावी. बीट हे क्षारांना दाद देणारे पिक असल्याने बीट ३-५ पानांवर असताना १० लिटरला २ किलो मिठाचे द्रावण फवारल्याने तणांचा नाश होतो. पण याच्याऐवजी इतर तणनाशकांचा वापर करणे आंतरपिक म्हणून फळबागांमध्ये घेता येते. मिरचीसारख्या अधिक कालावधीच्या पिकामध्ये वाफ्यांच्या स-यांवर बीटची लागवड आंतरपिक म्हणून करता येते.
काढणी आणि उत्पादन –
बीटच्या कंदाची वाढ ३ ते ५ सेंमी झाल्यावर काढणी करावी. बीटरूटची काढणी हातांनी उपटून करावी. काढणी करताना मुळांवा इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. बीटची काढणी बियांच्या लावणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी करावी. बीटची मुळे आतून स्पंजासारखी होण्यापुर्वी त्यांची काढणी करावी. काढणीनंतर कंदाची प्रतवारी करावी. कंद विक्रीला पाठविण्यापुर्वी त्यांची पाने काढून टाकावीत आणि कंद पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. कंद पॉलिथीनच्या पिशव्यांत भरून पाठविल्यास जास्त काळ चांगले राहतात. काही वेळा ४-६ बीट जुड्यांमध्ये एकत्र बांधून विक्रीस पाठवतात. बीटचे उत्पादन हेक्टरी २५ टन इतके मिळते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व