Search
Generic filters

लागवड कोबीवर्गीय पिकांची

लागवड कोबीवर्गीय पिकांची

लागवड कोबीवर्गीय पिकांची

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोली या पिकांच्या शिफारशीत जातींची लावणी  करावी. सुधारित तंत्राने लावणी  केल्याने चांगले उत्पादन मिळू शकते.

कोबीवर्गीय लागवड पिकांच्या वाढीसाठी रेताड ते मध्यम, काळी, नदीकाठाची गाळाची जमीन, पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 असल्यास ही पिके उत्तम येतात.

1) बियाणे – कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोली या पिकांच्या लागवडीसाठी हेक्‍टरी 600 ते 700 ग्रॅम बियाणे पुरेसे होते. नवलकोलचे हेक्‍टरी एक ते दीड किलो बी पुरेसे होते.

2) रोपनिर्मिती – जमिनीची पूर्वमशागत झाल्यानंतर बी पेरणीसाठी तीन मीटर लांब, एक मीटर रुंद व 15 ते 20 सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. प्रत्येक गादीवाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत दोन घमेली, 30 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड, 100 ग्रॅम मिश्रखत मातीत चांगले मिसळून घ्यावे. रुंदीशी समांतर 10 सें.मी. अंतरावर रेषा पाडून 1 ते 1.5 सें.मी. खोलीवर बियांची पातळ पेरणी करून मातीने बियाणे झाकून घ्यावे. बियाण्याची उगवण होईपर्यंत गरजेनुसार सकाळी व संध्याकाळी झारीने पाणी द्यावे. बी उगवल्यानंतर 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. कीड, रोगाच्या प्रादुर्भावानुसार फवारणीचे नियोजन करावे. रोपे चार आठवड्यांत पुनर्लागवडीसाठी तयार होतात.

3) लागवड – जमिनीची मशागत करून शेवटच्या पाळीपूर्वी

चांगले कुजलेले शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्‍टरी या प्रमाणात चांगले पसरून घ्यावे. जमिनीच्या उतारानुसार लागवडीसाठी योग्य आकारमानाची सपाट वाफे तयार करावेत.

4) पुनर्लागवड – फ्लॉवर व ब्रोकोलीच्या रोपांची पुनर्लागण 60 सें.मी. x 45 सें.मी. अंतरावर तर कोबीची लागवड 45 सें.मी. x 30 सें.मी. तर नवलकोल पिकाची लागवड 20 सें.मी. x 20 सें.मी. अंतरावर करावी.

5) खत व्यवस्थापन – कोबी पिकासाठी हेक्‍टरी 180 किलो नत्र – 80 किलो स्फुरद – 80 किलो पालाश फ्लॉवरसाठी 150 किलो नत्र – 75 किलो स्फुरद – 75 किलो पालाश आणि ब्रोकोलीसाठी 175 किलो नत्र – 30 किलो स्फुरद – 30 किलो पालाश आणि नवलकोलसाठी 40 किलो नत्र – 40 किलो स्फुरद – 40 किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. नत्राची मात्रा लागवडीच्या वेळी आणि लागवडीनंतर 30 दिवसांनी दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे.

6) कोबीवर्गीय पिकांची मुळे उथळ असल्यामुळे पाण्याच्या पाळ्या वरचेवर नियमित द्याव्यात. या पिकास गड्डा तयार होण्याच्या वेळी पाण्याचा ताण पडल्यास गड्डे लहान राहतात.

7) आंतरमशागत – लागवडीनंतर गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या करून माती भुसभुशीत आणि पीक तणविरहित ठेवावे. ब्रोकोलीमध्ये खोडावर येणारी फूट अलगद काढावी म्हणजे गड्डे चांगले मिळतात.

भाजीपाल्यातील जीवनसत्त्वे

1) कोबी, फ्लॉवर, नवलकोल, ब्रोकोली भाज्यांमध्ये अ आणि क या जीवनसत्त्वांचे प्रमाण अधिक आहे.

2) ब्रोकोलीमध्ये असणारे औषधी गुणधर्म आणि मधुर स्वादामुळे चांगली मागणी आहे.

सुधारित जाती

1) कोबी – गोल गड्डा असलेल्या गोल्डन एकर, प्राईड ऑफ इंडिया, कोपहेगन मार्केट इ. जाती आहेत. चपटे गड्डे असलेल्या पुसा ड्रम हेड तर उभट गड्डा असलेली जर्सी वेकफील्ड ही जात आहे. कोबीच्या संकरित जाती उपलब्ध आहेत. संकरित जातींचे गड्डे काढणीस एकाच वेळी तयार होतात. त्यापासून अधिक उत्पादन मिळते.

2) फ्लॉवर – पुसा दीपाली, अर्ली पटना, अर्ली कुंभारी, पंत शुभ्रा या जाती 60 ते 80 दिवसांत तयार होतात. पुसा सिंथेटिक, न्यू सिंथेटिक व नाशिक नं. 5 या जाती 90 ते 100 दिवसांत तयार होतात, तसेच स्नोबॉल-16, पुसा स्नोबॉल-1, पुसा स्नोबॉल-2, कटरेन-1 या जाती 110 ते 120 दिवसांत तयार होतात. या जातींचे बियाणे नोव्हेंबर महिन्यात पेरावे.

3) ब्रोकोली – महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली “गणेश ब्रोकोली’ ही जात निवडावी.

4) नवलकोल – व्हाईट व्हिएन्ना, परपल व्हिएन्ना, अर्ली व्हाईट किंग आणि किंग ऑफ मार्केट या जातींची निवड करावी.

agrowon.com

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “लागवड कोबीवर्गीय पिकांची”

  1. श्री सुभाष ऊमाकांत पाटील मवाळ मो.9921656155

    ऊन्हाळी फ्लावर गोबी ची जात कोनती ती शेअर करा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व