कापूस दराला पुन्हा उभारी मिळत आहे

कापूस दराला पुन्हा उभारी मिळत आहे

कापूस दराला पुन्हा उभारी मिळत आहे

 

मागील काही दिवसांत अफवांमुळे कापूस बाजारात गोंधळ, भीतीचे वातावरण निर्माण होऊन दरात घसरण झाली होती. काही ठिकाणी दर ६८०० ते ७००० हजार रुपयांपर्यंत घसरले होते. मात्र सरकार बाजारात हस्तक्षेप करणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी कापूस बाजारात पुन्हा सुधारणा झाली. राज्यात कापसाला ७६०० ते ८२०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले

कापूस हंगाम सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीसह देशातील कापूस बाजारानेही चाल केली. दिवाळीपूर्वी खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक बाजार समित्यांत कापूस दराने ८४०० रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र दिवाळीनंतर कापूस बाजारात अफवांचे पेव फुटले.

कापूस आणि सूत निर्यात बंद होणार, कापूस आयात करणार, सरकार हस्तक्षेप करून दर कमी करणार अशा अफवा बाजारात पेरल्या गेल्या. गाव, खेड्यांत सोशल मिडियाच्या माध्यमातून या अफवा चर्चिल्या गेल्या. त्यामुळे गोंधळ, भीतीचे वातावरण निर्माण होऊन कापसाचे दर अनेक ठिकाणी ६५०० ते ६८०० रुपयांपर्यंत कमी झाले होते. मात्र नुकतेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सूतगिरण्या आणि कापड उद्योगांना तंबी देत शेतकऱ्यांच्या कापसाला मिळणाऱ्या दराला हात न लावण्याचा इशारा दिला. त्यामुळे सर्व अफवांना पूर्ण विराम मिळाला आणि बाजार सुधारला आहे.

बाजारातील दरातील स्थिती

सोमवारी खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक बाजार समित्यांत कापूस दराने ७ हजार ८०० ते आठ हजार ३५० रुपयांचा टप्पा गाठला. मध्य प्रदेशातील इंदोर येथेही कापसाचे व्यवहार ६ हजार ८०० ते ८ हजार २०० रुपयांनी झाले. तर पंजाब राज्यातही ६ हजार ९०० ते ८ हजार ३०० रुपये दर मिळाला. शनिवारच्या तुलनेत कापसाच्या दरात ३०० ते ५०० रुपयांनी सुधारणा झाली होती.

हे पण वाचा:- सोयाबीनचे भाव वाढूनही आवक घटलेलीच, शेतकरी अपेक्षित दराच्या प्रतिक्षेतच!

वायद्यांमद्येही सुधारणा

बाजार समित्यांसह वायदे आणि ‘एनसीडीईएक्स’च्या स्पॉट दरातही सुधारणा झाली. एनसीडीईएक्सच्या राजकोट येथील सेंटरमध्ये कापसाच्या दरात काहीशी सुधारणा होत ३१ हजार ४३९ रुपयाने प्रति गाठींचे व्यवहार झाले. एक कापूस गाठी १७९ किलोची असते. तर मल्टी कमोडिटी एक्स्चेंज अर्थात ‘एमसीएक्स’वर कापसाच्या वायद्यांत सुधारणा पाहायला मिळाली. नोव्हेंबरचे वायदे ३१ हजार ८०० रुपयाने झाले. तर डिसेंबरचे वायदे ३२ हजार आणि जानेवारी २०२२ चे वायदे ३२ हजार १६० रुपयांनी पार पडले. एकूणच काय तर कापूस दरात वाढीचा ट्रेंड आहे. त्यामुळे बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री फायदेशीर ठरेल, असे जाणकारांनी सांगितले.

प्रतिक्रिया

बाजारात सध्या कापसाची आवक वाढत आहे. कापसात आर्द्रता कमी असून दर आठ हजार ते आठ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोमवारी कापसाच्या दरात सुधारणा झाली. शेतकऱ्यांनी कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करावी.

– माधव पतोंड, श्री रामदेव कॉटन यार्न लिमिटेड, अकोट, जि. अकोला

मागील काही दिवसांत कापूस दर घसरले होते. त्यात सुधारणा होऊन आठ हजार ते आठ हजार २०० रुपयांपर्यंत सुधारले आहेत. शेतकऱ्यांनी कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करावी. शेवटी मागणी आणि पुरवठ्यावर दर ठरतात, हे लक्षात ठेऊन विक्री फायदेशीर ठरेल.

– अशोक निलावार,
कापूस व्यापारी आणि उत्पादक

source:– agrowon

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *