Land Purchase : शेतजमीन खरेदी करताना ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा!

Land Purchase : शेतजमीन खरेदी करताना 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा!

Land Purchase : शेतजमीन खरेदी करताना ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा!

 

शेतजमीन विकत घेताना आमची फसवणूक झाली. जमिनीचा मूळ मालक वेगळाच होता, पण प्रत्यक्षात जमीन कसणारी व्यक्ती दुसरीच निघाली, या व अशा अनेक तक्रारी वेळोवेळी कानावर येतात.

त्यामुळे जमीन खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं.

कोणत्या आहेत या 5 गोष्टी, याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

1. जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा नीट पाहणे

ज्या गावात आपल्याला जमीन खरेदी करायची आहे, त्या गावातील तलाठ्याकडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावरील फेरफार आणि आठ-अ उतारे तपासून घ्यावे.

सातबाऱ्यावरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तीचींच आहे का ते पाहावे. त्यावर मयत व्यक्ती किंवा जुना मालक, इतर वारसांची नावे असल्यास ती काढून घेणं आवश्यक असतं.

जमिनीवर कोणत्याही बॅंक किवा संस्था यांच्या कर्जाचा बोजा नसल्याची खात्री करावी. तसंच न्यायालायीन खटला चालू असल्यास संदर्भ तपासून पाहावं.

शेत जमिनीमधून नियोजित महामार्ग, रस्ता इत्यादी नसल्याची खात्री करावी किंवा याची उताऱ्यावर नोंद आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.

याशिवाय जमिनीचे 1930 सालापासूनचे सातबारा आणि फेरफार उतारे तुम्ही पाहू शकता. तहसील कार्यालयातल्या अभिलेख कक्षात जमिनीच्या इतिहासाशी संबंधित ही सगळी माहिती तुम्हाला मिळते. फेरफार उतारे पाहिल्यास सदर जमिनीच्या मालकी हक्कात वेळोवेळी कोणकोणती बदल होत गेले, याची माहिती कळते.

हे पण वाचा:- राज्य सरकारचे नवे धोरण ई-पीक पाहणी नंतर आता ‘ई-पंचनामा’

2. भूधारणा पद्धत तपासून घेणे

एकदा का सातबारा उतारा हातात आला की त्यावर जी जमीन खरेदी करायची आहे, ती कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते, हे पाहावं.

सातबारा उताऱ्यावर भूधारणा पद्धतीची नोंद केलेली असते.

जर सातबाऱ्यावर भोगवटादार वर्ग- 1 पद्धत असेल, तर भोगवटादार वर्ग- 1या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो. म्हणजे ही जमीन विक्री करणाऱ्याच्या स्वत:च्या मालकीची असून ती खरेदी करताना विशेष अडचण येत नाही, असा याचा अर्थ होतो.

पण, सातबाऱ्यावर भोगवटादार वर्ग- 2 असं नमूद केलं असेल, तर या जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत.

सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही. यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इ. जमिनींचा समावेश होतो.

जर सातबाऱ्यावर भोगवटादार वर्ग – 2 असं असेल तर सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच ती जमीन खरेदी करावी.

याव्यतिरिक्त ‘सरकारी पट्टेदार’ या प्रकारच्या जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वार दिल्या जातात.

3. जमिनीच्या गटाचा नकाशा पाहणे

ज्या गटातील शेतजमीन खरेदी करायची आहे, त्या गटाचा नकाशा पाहणं गरजेचं असतं. यामुळे एकतर आपल्याला जमिनीची हद्द कळते. नकाशाप्रमाणे जमिनीची हद्द तपासून घ्यावी.

दुसरं म्हणजे चतु:सीमा कळते. आपण जी जमीन खरेदी करतोय, त्याच्या चारही बाजूंना कोणते गट नंबर आहेत, याची माहिती स्पष्ट होते.

4. शेत रस्ता

जी जमीन खरेदी करायची आहे, तिथं जाण्यासाठी शेतरस्ता आहे की नाही, ते पाहावं.

जमीन बिनशेती असेल तर जमिनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवलेला असतो. पण, जमीन बिनशेती नसेल तर व रस्ता खाजगी असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी.

5. खरेदी खत

तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदीखत करावे.

यात गट नंबर, मूळ मालकाचं नाव, चतु:सीमा, क्षेत्र बरोबर आहे की नाही ते तपासून घ्यावं.

source:- BBC marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *