सोयाबीनच्या दरात होत आहे सुधारणा, शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला..?

सोयाबीनच्या दरात होत आहे सुधारणा, शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला..?

 

अखेर दोन महिन्यानंतर का होईना  सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा होऊ लागली आहे. दिवाळीनंतर सोयाबीनच्या बाजारात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. गेल्या चार दिवसांपासून दिवसाकाठी 100 ते 150 रुपयांची वाढ ही प्रति क्विंटलमागे होत आहे. मागणी वाढत असल्यामुळे हा बदल होत आहे. मात्र,  जर वाढत्या दराबरोबर आवक वाढली तर याचे विपरीत परिणाम बाजारावर होणार आहेत. त्यामुळे आता चित्र तर बदलले आहे. पण याचा लाभ कसा घ्यावयाचा याबाबत कृषी अधिकारी व्यापारी हे शेतकऱ्यांना काय सल्ला देत आहेत ते ही महत्वाचे आहे.

दर कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी हे आपण पाहणार आहोत.
हंगामाच्या सुरवातीपासून सोयबीनच्या दरात घट होती. सोयाबीन हे खरिपातील मुख्य पिक असून शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्यात या पिकाचा मोठा वाटा समजला जातो. पण घटत्या दरामुळे शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली होती. दिवाळीनंतर बाजारपेठेत बदल दिसत असून दरात वाढ होत आहे.

हे पण वाचा:- आजचे बाजार भाव 

वेट अँड वॉच, फरक जाणवेल

सोयाबीनची आवक ही सुरवातीपासून कमीच राहिलेली आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला 10 ते 15 हजार क्विंटलची आवक होत आहे. मात्र, मागणी वाढल्याने सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे. अणखीन काही दिवस सोयाबीनची साठवणूक केली तर वाढत्या दराचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे अणखीन काही दिवस शेतकऱ्यांनी दर वाढीची वाट पाहणे गरजेचे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे.

साठवणूकीचा होणार फायदा

हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिलेला होता. काही शेतकऱ्यांनी तर यंदा प्रथमच शेती माल तारण योजनेचा फायदा घेतला होता. बाजारपेठेचे गणित कळल्याप्रमाणे शेतकरी हे उडीद व इतर पिकांची विक्री करीत होते पण सोयाबीनच्या साठवणूकीवर भर देत होते. त्या दरम्यान, शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे आताच्या दरावरुन निदर्शनास येत आहे.

असे राहिले आहेत सोयाबीनचे दर

हंगाम सुरु होण्यापूर्वी सोयाबीनला जूनमध्ये 8 हजार 900 चा दर होता. मात्र, सोयाबीन काढणीच्या दरम्यान राज्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याने सोयाबीनचे दर गगणाला भिडणार असेच चित्र निर्माण झाले होते. शिवाय, मुहूर्ताच्या दरामुळे शेतकऱ्यांच्या आशा ऊंचावल्या होत्या. कारण मुहूर्ताच्या सोयाबीनला हिंगोली, बार्शी आणि अकोला बाजार समितीमध्ये 11 हजाराचा भाव मिळाला होता. मात्र, तो काही दिवसांपूरताच मर्यादीत राहिला होता. त्यानंतर मात्र, ऑक्टोंबर महिन्यात तर सोयाबीनचे दर हे 4 हजार 800 वर येऊन ठेपले होते. या हंगामात शेतकऱ्यांनी उच्चांकी आणि सर्वात कमी असे दोन्हीही दर पाहिले आहेत. पण आता दरात सुधारणा होत असल्याने दिलासा मिळत आहे.

मागणी वाढल्याचा परिणाम बाजारपेठेत

सोयापेंडची आयात होऊन देखील सोयाबीनच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून काही काळ दरवाढीची प्रतिक्षा केली तर फायदा हा होणारच आहे. पण या दरम्यान वाढीव दरामुळे बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढली तर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयीबीनची विक्री केली तरच फायदा होणार आहे.

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email