Search
Generic filters

टोमॅटो लागवड पध्दती

टोमॅटो लागवड पध्दती

टोमॅटो लागवड पध्दती

 

krushi kranti : टोमॅटो (Tomato) हे महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतक-यांचे प्रमुख फळपिक (Fruit Crop) आहे.  नाशिक, पुणे, अहमदनगर, नागपूर, सांगली हे महाराष्ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्वाचे जिल्हे आहेत.खरीप (Kharif) , रब्बी (Rabbi), उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड (Planting of tomato crop) करता येते.  टोमॅटो मध्ये अ, ब,आणि क जीवनसत्व, कॅल्शियम, फास्फोरस तसेच लोह इत्यादी पोषक अन्नद्रव्येही टोमॅटो मध्ये पुरेशा प्रमाणात असतात.टोमॅटोच्या पिकलेल्या फळापासुन सुप, सॉस, केचप, जाम, ज्युस, चटणी इत्यादी पदार्थ बनविता येतात.  यामुळे टोमॅटोचे औद्योगिक महत्व वाढलेले आहे.  लाल हे खाण्यास स्वादिष्ट तसेच पौष्टिक असते याच्या आंबट स्वाद चे कारण आहे की यात साइट्रिक एसिड आणि मैलिक एसिड असते ज्यामुळे एंटासिडच्या रूपात काम करते.

 

हवामान

टोमॅटो हे पिक उष्ण हवामानातील असले तरीही महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते.  अति थंडी पडल्यास टोमॅटोच्या झाडाची वाढ खुंटते.टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे,कमी आर्द्रता असलेले व उष्ण हवामान चांगले असते.  18 अंश ते 30 अंश सेल्सिअस तापमानात हे पिक चांगले येते. जास्त तापमान , कमी आर्द्रता व कोरडे वारे असले तर पिकाची फुलगळ होते.उष्ण तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असल्यास टोमॅटो फळांची गुणवत्ता चांगली असते.व फळांचा रंगही आकर्षक येतो.

 • 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असले तर पिकाची वाढ खुंटते.
 • 16 अंश ते 29 अंश सेल्सिअस असले तर बी उगवण चांगली होते.
 • 21 अंश ते 24 अंश सेल्सिअस असले तर पिकांच्या वाढीस अनुकूल असते.
 • 25 अंश ते 30 अंश सेल्सिअस असले तर फुले व फळधारणा चांगली असते.
 • 38 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास फळधारणा होत नाही.

 

हे पण वाचा:- टोमॅटो खत शेड्यूल व नियोजन

 

जमीन

टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी मध्यम व भारी जमीन योग्य असते. परंतु अशा जमिनीत सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा करावा लागतो त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.  पिकाला वारंवार पाणी देण्याची सोय असावी.हलक्या जमिनीत पिक लवकर निघते पण भारी जमिनीत फळाचा तोडा उशिरा सुरू होतो.परंतु उत्पादन भरपूर निघते.  काळ्याभोर जमिनीत पावसाळी टोमॅटो लागवड करणे टाळावे.व उन्हाळ्यात टोमॅटो लागवड हलक्या जमिनीत घेऊ नये.  क्षारयुक्त जमिनीत पाण्याचा निचरा होत नसल्याने अशा जमिनीत पिक चांगले येत नाही त्यात पिक घेतल्यास पिकांची वाढ खुंटते व फुलगळ होते. टोमॅटो हे पिक घेण्याच्या अगोदरच्या हंगामात वांगी, मिरची हे पिक घेतलेली नसावी.

जाती

 • धनश्री – या जातीची फळे मध्यम व गोल आकाराची व नारंगी रंगाची असतात. या जातीचे उत्पादन सरासरी 50 ते 60 टन प्रतिहेक्टर मिळते.
 • भाग्यश्री – या जातीची फळे हे गर्द लाल रंगाची असतात. या फळात गर भरपूर प्रमाणात असतो.या जातीचे उत्पादन सरासरी 50 ते 60 टन प्रतिहेक्टर मिळते.
 • राजश्री – ही फळे लाल रंगाची असतात या जातीचे उत्पादन सरासरी 50 ते 60 टन प्रतिहेक्टर मिळते व लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमीत कमी बळी पडते.
 • फुले राजा – फळे नारंगी व लाल रंगाची असतात या जातीचे उत्पादन सरासरी 55 ते 60 टन प्रतिहेक्टर मिळते.

हंगाम

खरीप – जुन, जुलै महिन्यात बी पेरावे.

रब्बी – सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात बी पेरावे.

उन्हाळी हंगाम –  डिसेंबर, जानेवारी महिन्यात बी पेरावे.

बियाण्याचे प्रमाण – टोमॅटो पिकाचे हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम बी लागते.

लागवडीसाठी जमीन तयार करणे

जमीन उभी व आडवी खोलवर नागरून घ्यावी जमिनीत कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. जमिनीत गवताच्या काड्या, हारळीच्या काश्या चांगल्याप्रकारे वेचुन घ्याव्या. भारी जमिनीत 90 ते 120 सें.मी. अंतरावर, व हलक्या जमिनीत 60 ते 75 सें.मी. अंतरावर स-या पाडून जमिनीचा उताराप्रमाणे वाफे पाडून घ्यावेत.व लागण करण्याच्या वेळी दोन रोपामधील अंतर 45 ते 60 सें.मी. इतके ठेवावे.

टोमॅटो रोपाची लागवड

टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना 8 ते 10 दिवस अगोदर पाणी देऊन वाफवा स्थितीत ठेवावे.

रोपांची लागवडीच्या दिवशी वाफ्यांना परत पाणी द्यावे, वाफ्यात पाणी असतानाच रोपाची लागवड करावी.

वाकडे, चपटे.मुळे नसलेली व कोमावलेली रोपांची लागवड करू नये.

लागवड केल्यानंतर 2-3 दिवसांनी पाणी द्यावे.

 

 

पाणी व्यवस्थापन

लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे व त्यानंतर 2-3 दिवसात आंबवणीचे पाणी द्यावे.

पिकाच्या सुरूवातीला पाणी जास्त प्रमाणात झाल्यास पानांची व फाद्यांची वाढ जास्त होते. त्यामुळे पिकाला फुल येईतोपर्यंत पाणी अंदाजे 60 दिवसांपर्यंत द्यावे. ठिबक संचाच्या साहाय्याने पिकाला पाणी देताना पिकाची दैनंदिन पाण्याची गरज निश्चित करून नियमात पाणी द्यावे.फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळण्याची समस्या निर्माण होते.

टोमॅटोच्या झाडांना आधार देणे

लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी झाडांची वाढ झाल्यानंतर फांद्या व फुटी जोरात वाढतात त्यामुळे त्यांना बांबु, सुतळी व तार च्या साहाय्याने झाडाला बांधुन आधार दिला जातो.

जमिनीतल्या सरीच्या दोन्ही बाजूला 6 ते 8 फुट उंचीचे लाकटी बांबु जमिनीत खोलवर रोवावे.व जमिनीपासुन 1 मीटर अंतरावर दोन्ही खांबावर तार ओढून घट्ट बांधून बांबुना आधार द्यावा.

झाडाची उंची 30 सें.मी. झाल्यानंतर झाडाच्या खोडाला सैलसर सुतळी बांधुन ती तारेला बांधावी.

तणाचे नियंत्रण

लागवडीनंतर तणविरहित ठेवण्यासाठी खुरपण्या किंवा निंदनी करून घ्यावी. किंवा लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांनी मेट्रीब्युझीन किंवा पेंडिमिथॅलिन हे तणनाशकाची फवारणी करून घ्यावी.

रोग व किड

 • करपा = हा रोग झाडाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो. या रोगामध्ये पाने देठ खोड यावर तपकिरी ठिपके पडतात.

नियंत्रण = मॅन्कोफेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा टेब्युकोनॅझोल 10 मि.लि. प्रति 10 लिटर प्रमाणे फवारणी करावी.

 • फळे पोखरणारी अळी = ही अळी पाने खाते. हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरून आत शिरते.

नियंत्रण = क्विनॉलफॅास 20 मि. लि.प्रति 10 लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.

 • नागअळी = ही अळी पानांच्या पापुद्र्यामध्ये जावुन हिरवा भाग खातात.

नियंत्रण = निंबोळी अर्कच्या 2 ते 3 वेळा फवारणी करावी. किंवा अळीचे प्रमाण वाढल्यास अबामेक्टीन 4 मि .लि. प्रति 10 लिटर पाण्यात टाकुन फवारणी करावी.

फळाची तोडणी

पुर्ण पिकलेली व लाल रंगाची फळे तोडावीत. पंरतु बाजारासाठी लागणारी फळे निम्मी लाल व निम्मी हिरव्या रंगाची तोडावी.

फळाची तोडणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी तापमान कमी असताना करावी.

तोडणी अगोदर 3 ते 4 दिवस किटकनाशकाची फवारणी करू नये.

काढलेली फळे सावलीत आणावी व त्याची आकारानुसार वर्गवारी करावी.तडा गेलेली, खराब फळे बाजुला काढावीत. टोमॅटो लागवड पध्दती

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *