Search
Generic filters

वांगी लागवड माहिती-तंत्रज्ञान

वांगी लागवड माहिती-तंत्रज्ञान

वांगी लागवड माहिती-तंत्रज्ञान

 

वांगी या भाजीपाला पिकाची लागवड (Eggplant cultivation) वर्षभर सर्वर हंगामात खरीप (Kharif),  रब्‍बी (Rabbi) आणि उन्‍हाळयातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. आहारात वांग्‍याचा भाजी, भरीत, वांग्‍याची भजी, इत्‍यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्‍या रोग्‍यांना गुणकारी असतात.  वांग्‍यामध्‍ये खनिजे अ ब क ही जीवनसत्‍वे तसेच लोह, प्रथीने यांचे प्रमाण पुरेसे असते. महाराष्‍ट्रात या पिकाखाली अंदाजे 28, 113 हेक्‍टरी क्षेत्र लागवडीखाली आहे.

हवामान

कोरडया आणि उष्‍ण हवामानामध्‍ये वांग्‍याची वाढ चांगली होते. ढगाळ हवामान व एकसारखा पाऊस वांगी पिकाला मानवत नाही. सरासरी 13 ते 21 सेल्सिअस तापमानाला वांग्‍याचे पिक चांगले  येते.

जमिन

सर्व प्रकारच्‍या हालक्‍या ते भारी जमिनीत वांग्‍याचे पिक घेता येते परंतू सुपिक चांगला पाण्‍याचा निचरा होणा-या मध्‍यम काळया जमिनीमध्‍ये वांग्‍याचे झाड जोमाने वाढते. जमिनीचा सामू 6 ते 7 असल्‍यास पिकाची वाढ चांगली होते. नदीकाठच्‍या गाळवट जमिनीत वांग्‍याचे उत्‍पादन चांगले येते.

पूर्वमशागत

मुख्‍य शेतात रोपांची लागवड करण्‍यापूर्वी जमीन उभी आडवी नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. कुळवाच्‍या शेवटच्‍या पाळीसोबत दर हेक्‍टरी 30 – 50 गाडया शेणखत जमिनीत पसरवून मिसळून घ्‍यावे.

लागवडीचा हंगाम

वांग्‍याची लागवड तिनही हंगामात करता येते.खरीप बियांची पेरणी जूनच्‍या दुस-या आठवडयात आणि रोपांची लागवड जूलै, ऑगस्‍टमध्‍ये केली जाते. रब्‍बी किंवा हिवाळी हंगाम-बियांची पेरणी सप्‍टेबर अखेर करतात आणि रोपे आक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये लावतात.उन्‍हाळी हंगाम–बी जानेवारीच्‍या दुस-या आठवडयात पेरून रोपांची लागवड फेब्रूवारीत करतात.

वाण

मांजरी गोटा : या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने लहान ते मध्‍यम आकाराची असतात. खोड पाने आणि फळांच्‍या देठावर काटे असतात. फळे जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पटटे असतात. फळांचा आकार मध्‍यमहिन्‍यात ते गोल असतो. या जातीची फळे चविला रूचकर असून काढणीनंतर 4 ते 5 दिवस टिकतात. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 300 ते 400 क्विंटल.

वैशाली : या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने खोड आणि फळांच्‍या देठावर काटे असतात. फळे आणि फूले झुबक्‍यांनी येतात.  फळांचा रंग आकर्षक जांभळा असून त्‍यावर पांढरे सरमिसळ पटटे असतात. फळे मध्‍यम आकाराची अंडाकृती असतात. सरासरी हेक्‍टरी उत्‍पादन 300 क्विंटल.

प्रगती : या जातीचे झाड उंच आणि काटक असून पाने गडद हिरव्‍या रंगाची असतात. पाने फळे आणि फांदयावर काटे असतात. या जातीचे फूले आणि फळे झुबक्‍यांनी येतात.  फळे अंडाकृती आकाराची असून फळांच्‍या रंग आकर्षक जांभळा असून पांढ-या रंगाचे पटटे असतात. पिकांच्‍या कालावधी 175 दिवस असून 12 ते 15 तोडे मिळतात. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल.

अरूणा : या जातीची झाडे मध्‍यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुबक्‍यात लागतात.  फळे मध्‍यम आकाराची आणि अंडाकृती असून त्‍यांचा रंग चमकदार जांभळा असतो. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 300 ते 350 क्विंटल वांग्‍याच्‍या वरील जाती शिवाय कृष्‍णा एम एच बी 10 या अधिक उत्‍पादन देणा-या संकरीत जाती आहेत.

बियांचे प्रमाण

500 ग्रॅम / हेक्‍टर सुधारीत जातींसाठी 150 ग्रॅम / हेक्‍टर संकरीत जातीसाठी

हे पण वाचा:- आंबा मोहोर आणि फळगळ किड व रोग व्यवस्थापन

लागवड

वांग्‍याची रोपे गादीवाफयावर तयार करतात. गादीवाफे 3 बाय 1 मिटर आकाराचे आणि 10 ते 15 सेमी उंचीचे करावेत. गादीवाफयाभोवती पाणी देण्‍यासाठी सरी ठेवावी. एक हेक्‍टर वांगी लागवडीसाठी अशा 15 ते 20 वाफयातील रोपे पुरेशी होतात. वांग्‍यांच्‍या एक हेक्‍टर लागवडीसाठी 400 ते 500 ग्रॅम बी पुरते. मात्र त्‍यापेक्षा जास्‍त म्‍हणजे 800 ते 1000 ग्रॅम बी पेरून अधिक रोपे तयार करून ठेवावीत. म्‍हणजे काही रोप न जगल्‍यास ही रोप नांगे भरण्‍यासाठी वापरता येतात.  गादी वाफयावरील रोपे 12 ते 15 सेंटीमिटर उंचीची झाल्‍यावर म्‍हणजे 6 ते 8 पानांवर आल्‍यावर लावणीस तयार होतात. बी पेरणीपासून साधारणपणे 4 ते 5 आठवडयात रोपे लागवडीसाठी तयार होतात. बियांची उगवण होईपर्यंत वाफयांना सुरुवातीला झारीने आणि नंतर वाफयाच्‍या भोवती असलेल्‍या सरीमधून गरजेनुसार पाणी द्यावे.

लागवडीनंतर रोपावर पाने लहान होणे किंवा बोकडया (लिटल लिफ) या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्‍हणून रोपवाटिकेमध्‍ये वाफयावर बी पेरताना फोरेट 10 टक्‍के दाणेदार औषध 3 बाय 1 मिटर आकाराच्‍या वाफयासाठी 20 ग्रॅम या प्रमाणात बियाण्‍याच्‍या दोन ओळींमध्‍ये टाकावे. रोपावरील मावा, तुडतुडे फूलकिडे या किडींच्‍या नियंत्रणासाठी बी पेरल्‍ यानंतर दोन आठवडयांनी 12 मिलीलिटर एन्‍डोसल्‍फॉन (35 टक्‍के) किंवा 20 मिलीलिटर मॅलेथिऑन (50 टक्‍के ) किंवा 2.5 मिलीलीटर फॉस्‍फॉमिडॉन ( 85 टक्‍के) किंवा 10 मिलीलिटर डयमेथोएट (30 टक्‍के ) किंवा 10 मिलीलीटर फार्मोथिऑन (25 टक्‍के ) 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

दोन ओळीतील आणि  दोन रोपांतील अंतर जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे आणि जातीनुसार ठेवावे. काळया कसदार जमिनीत 100 बाय 100 सेंटीमीटर मध्‍यम प्रतीच्‍या जमिनीत 75 बाय 75 सेंटीमीटर आणि हलक्‍या जमिनीत 60 बाय 60 किंवा 75 बाय 60 सेंटीमीटर अंतर ठेवावे. रोपांची लागवड करण्‍यासाठी सरी वरंबे पाडून वरंब्‍याच्‍या बगलेत एका जागी रोप लावावे. कोरडवाहू पिकासाठी रोपांची लागवड सपाट जमिनीवर करावी. रोपांची लागवड ढगाळ वातावरणात किंवा झिमझिम पाऊस सुरू असताना केल्‍यास फायदेशिर ठरते. उन्‍हाळयात रोपांची लागवड सकाळी न करता दुपारी 4 नंतर ऊन कमी झाल्‍यावर करावी.

खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन

वांग्‍याच्‍या बागायती पिकास दर हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्‍फूरद आणि 50 किलो पालाश द्यावे. त्‍यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्‍फूरद आणि पालाश रोपांच्‍या लागवडीच्‍या वेळी द्यावे. आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्‍या लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावे. ही खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडाच्‍या बुध्‍याभोवती 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावर बांगडी पध्‍दतीने द्यावीत. वांग्‍याच्‍या कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्‍फूरद द्यावे.

रोपांची लागवड केल्‍यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे. पाण्‍याच्‍या पाळया जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतात. खरिपाच्‍या पिकास पाऊस नसताना 10 ते 12 दिवसांच्‍या अंतराने हिवाळयात 7 ते 8 दिवसांच्‍या अंतराने आणि उन्‍हाळयात 5 ते 6 दिवसांच्‍या अंतराने पाण्‍याच्‍या पाळया द्याव्‍यात. वांगी पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पध्‍दतीने पाणी देऊन पाण्‍याची बचत करता येते.

वांग्‍याच्‍या शेतीतील खुरपणी करून तण काढणे, कोळपणी करणे, पिकाला भर देणे ही आंतरमशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्‍यक आहे. त्‍याकरिता आवश्‍यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्‍यावे. तसेच झाडास मातीची भर द्यावी.  काही तणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारुनही करता येतो. वांगी पिकांमध्‍ये आंतरपीक म्‍हणून मुहा आणि पालेभाज्‍या ( पालक, मेथी, कोथिंबीर इ.) घेता येतात.

किड व रोग

अ) रोग

बोकडया किंवा पर्णगुच्‍छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते. ती लहान आणि बोकडल्‍यासारखी दिसतात. याचा प्रसार तुडतुडयांमुळे होतो.

उपाय –  1. बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्‍टरी दाणेदार औषध प्रती वाफयास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे. 2. रोपे लावण्‍यापूर्वी  मोनोक्रोटोफॉस 36 डब्‍ल्‍ये. एस. सी. 15 मिली व ऐंक्रामायसिन 5 ग्रॅम व 10 लिटर पाणी

मर : हा बुरशीजन्‍य रोग असून जमिनीत असणा-या फयूज्‍यारियम नावाच्‍या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरेमधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्‍यास आतील पेशी काळपट दिसतात. झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.

उपाय – रोगास बळी न पडणा-या जातींची लागवड करावी. पिकांची फेरपालट करावी. नियमितपणे झाडावर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्‍यास 3 ग्रॅम प्रतिकिलो थायरम बियाण्‍यास चोळावे.

ब) किड

शेंडा आणि फळे पोखरणारी अळी – या किडीमुळे वांगी पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. चिकट पांढ-या रंगाच्‍या या आळया शेंडयातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात. आाणि त्‍यामुळे झाडाची वाढ खुंडते फळे लहान असताना अळी देठारजवळून फळात शिरून फळाचे नुसकान करते.

उपाय – किड लागलेले शेंडे अळिसकट नष्‍ट करावेत. 40 ग्रॅम कार्बारिल किंवा 14 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के किंवा 2.4 मिली सायफरमेथिन, 25 टक्‍के 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी किंवा 10 टक्‍के कार्बारिल भूकटी दर हेक्‍टरी 20 किलो या प्रमाणात झाडांवर  धुरळावी.

तुडतुडे – हिरवट रंगाची किड असून पानातील रस शोषून घेते त्‍यामुळे पाने आकसल्‍यासारखी दिसतात. तसेच या किडीमार्फत बोकडया या विषाणू रोगाचा प्रसार होतो.

उपाय – रोपांच्‍या पुर्नलागवडीनंतर 2 आठवडयांनी 12 मिली एन्‍डोसल्‍फान 35 टक्‍के प्रवाही किंवा 20 मिली मेलॉथिऑन 50 टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

मावा – ही अतिशय लहान आकाराची किड पानांच्‍या पेशीमध्‍ये सोंड खुपसून पानातील रस शोषून घेते.

उपाय – 20 मिली मेलॅर्थिऑन 50 टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

 

काढणी व उत्‍पादन

रोप लावणीनंतर 10 ते 12 आठवडयांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण वाढून टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्‍यास उत्‍पादनात घट येते. तसेच जुन फळे गि-हाईकांच्‍या पसंतीस उतरत नाहीत. 4 ते 5 दिवसांच्‍या अंतराने 10 ते 12 वेळा वांग्‍याची तोडणी करता येते. वांग्‍याची काढणी साधारणपणे तीन ते साडेतीन महिने चालू राहते. 

वांगी पिकाचे सरासरी हेक्‍टरी उत्‍पादन जाती परत्‍वे 100 ते 250 क्विंटल पर्यंत येते.

स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “वांगी लागवड माहिती-तंत्रज्ञान”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *