नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान देणार – अजित पवार
‘‘नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची सरकारची भूमिका आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे सध्या आर्थिक चणचण आहे. ही अडचण दूर झाल्यानंतर जे सभासद बँक कर्ज नियमित फेडतील, त्यांना भविष्यात याचा निश्चित लाभ होईल. त्यामुळे सभासदांनी बँकेचे कर्ज भरून सहकार्य करावे,’’ असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर तालुका विभागीय कार्यालय व जुना पुणे- सोलापूर महामार्गावरील नुतन शाखा इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाईप रिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्ष अर्चना घारे, संचालक अप्पासाहेब जगदाळे, दिगंबर दुर्गाडे, ॲड. संजय काळे, आत्माराम कलाटे, मदनराव देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘‘इंदापूर येथे जुन्या पुणे- सोलापूर महामार्गालगत २० गुंठे जागा घेऊन त्यावरील १४ हजार चौरस फूट जागेत १ कोटी १८ लाख रुपये खर्च करून शहर वैभवात भर टाकणारी सुसज्ज इमारत उभी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होणार आहे. बँकेत नोकरभरती झाली असली, तरी आणखी कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे मेरिटनुसार संधी दिली जाईल.’’
भरणे म्हणाले, ‘बँकेच्या तालुक्यात ३० शाखा असून, बँकेस ८४ कोटी १८ लाख रुपयांचा नफा झाला आहे. तर, बँकेने १७५२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. पैशांचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे गरिबांना सेवा देणारी ही एकमेव बँक आहे.’’
रमेश थोरात म्हणाले, ‘‘तीनशेपेक्षा जास्त शाखा असलेल्या बँकेने सभासद हितास सर्वोच्च प्राधान्य देत जगभर नाव लौकिक मिळवला आहे. बँक शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देत असून, दरवर्षी त्यासाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद करावी लागते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिस्त व वचक आणि सभासदांचे सहकार्य असल्याने बँक यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.’’
वाचा:- “शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना: 2020-21 योजनेचा GR आला, पहा सविस्तर!”
“‘राज्यात सत्ता कोणाचीही असली, तरी विकास कामांचा गाडा सुरू राहिला पाहिजे. लाखांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे, ही राष्ट्रीय नेते शरद पवार यांची शिकवण आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यास जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात.”
अजित पवार, उपमुख्यमंत्री
संर्दभ:- agrowon e gram.com