PM Kisan: योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची?

पीएम सम्मान निधी योजना

PM Kisan: योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची?

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १.१५ लाख कोटी रुपये १०.७५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत, अर्थमंत्री र्मला सीतारामन यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे.

तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर PM-Kisan योजनेसाठी नोंदणी करणं आवश्यक आहे.

आपण PM-Kisan किसान योजना काय आहे, या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, PM-Kisan निधीचा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा झाला आहे की नाही, हे कसं बघायचं, इतकंच नाही तर आधार कार्ड संबंधित माहितीत दुरुस्ती कशी करायची, याची माहिती जाणून घेणार आहोत. सुरुवातीला पाहूया PM-Kisan योजना काय आहे ते.

हे पण वाचा:- महत्वाची बातमी: पीएम किसान योजनेतून १० हजार रुपये मिळण्याची शक्यता!

PM- Kisan योजना

 

PM- Kisan म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना 1 डिसेंबर 2018पासून देशात लागू करण्यात आली.

या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते.

पण, मग या योजनेसाठी कोणता शेतकरी पात्र ठरतो, असा प्रश्न आता तुमच्या मनात आला असेल. तर या योजनेसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात.

सरकारनं सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता. पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं.

या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतरानं दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

असं असलं तरी घटनात्मक पदावरील व्यक्ती (राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश इ.) आजी-माजी लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार, महापौर), आजी-माजी सरकारी कर्मचारी, करदाते, डॉक्टर, इंजीनियर्स, वकील, सनदी लेखापाल, वास्तुरचनाकार यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे.

PM Kisan योजनेसाठी नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना 3 पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

  • एक – या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.
  • CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. मात्र इथं नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारलं जातं.
  • शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. तसंच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.
ऑनलाईन नोंदणी कशी करायची?

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला pm kisan असं गुगलवर सर्च करावं लागेल. त्यानंतर PM-Kisan Samman Nidhiची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

त्यानंतर उजवीकडे तुम्हाला ‘फार्मर कॉर्नर’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केलं की ७ पर्याय तुमच्यासमोर येतात. त्यातील पहिलाच पर्याय आहे New Farmer Registration.

या पर्यायावर क्लिक केलं की ‘New Farmer Registration form’ नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

इथं तुम्हाला आधार क्रमांक आणि captcha टाकायचा आहे.

captcha म्हणजे तुम्ही रोबोट किंवा यंत्र नाही, तर माणूस आहात, हे तुम्हाला तुम्ही ज्या मशीनवर फ़ॉर्म भरता त्या मशिनीला (फोन किंवा कॉम्प्युटर) पटवून द्यायचं असतं. त्यासाठी captchaमधील आकडेवारी किंवा अक्षरं जशीच्या तशी समोरच्या रकान्यात लिहायची असतात.

त्यानंतर कंटिन्यू या पर्यायावर क्लिक केलं की Record not found with given details असा मेसेज स्क्रीनवर येईल. याचा अर्थ तुमच्या आधार क्रमांकाची या योजनेसाठी यापूर्वी नोंदणी झालेली नाही. तुम्हाला या मेसेजखाली असलेल्या ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला “Record not found with given details. Do you want to register on PM-Kisan Portal?” असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. याचा अर्थ तुम्ही नोंदवलेल्या आधार क्रमांकाचा कोणताही रेकॉर्ड आमच्याकडे जमा नाही, तुम्हाला PM-Kisan योजनेसाठी नाव नोंदवायचं आहे का, असा होतो. त्याखाली असलेल्या YES या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. (agri news)

त्यानंतर एक पानी रेजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सुरुवातीला शेतकऱ्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे.

यात सुरुवातीला state म्हणजे राज्य निवडायचं आहे, त्यानंतर district म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. पुढे sub-district आणि block या दोन्ही ठिकाणी तुमच्या तालुक्याचं नाव निवडायचं आहे. आणि मग गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे.

त्याखाली farmer name म्हणजे शेतकऱ्याचं नाव लिहायचं आहे. इथं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आधार कार्डवर तुमच्या नावाची स्पेलिंग जशी लिहिलेली असते, एकदम तंतोतंत तशीच स्पेलिंग इथं नाव टाकताना लिहायची आहे. एक जरी इंग्रजी शब्द इकडे तिकडे झाला, तर तुमचा फॉर्म पूर्ण होऊ शकत नाही. पुढे लिंग निवडायचं आहे (मेल, फिमेल की अदर्स) आणि मग तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता (जनरल, एससी, एसटी की इतर) ते निवडायचं आहे. (sheti vishyak mahiti)

त्यानंतर फार्मर टाईप मध्ये शेतकऱ्याचा प्रकार निवडायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे १ ते २ हेक्टरदरम्यान शेती असेल तर तुम्हाला पहिल्या पर्यायावर क्लिक करायचं आहे, जास्त असेल तर अदर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आपण नोंदणीसाठी आधार क्रमांक दिलेला असल्यामुळे एक Identity proof number आपोआप जनरेट होतो.

आता पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती भरायची आहे. यामध्ये बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. हा कोड तुमच्या पासबुकवर दिलेला असतो. त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे आणि मग खाते क्रमांक टाकायचा आहे.

त्यानंतर पत्ता टाकून झाला की, तुम्हाला Submit for Adhar authentication या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

या पर्यायावर क्लिक केलं, की “Yes, Aadhar Authenticated Succesfully” असा लाल अक्षरात मेजेस तिथं येतो. याचा अर्थ तुमचं आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या झालं आहे.

यानंतर Farmers other details मध्ये शेतकऱ्याविषयीची इतर माहिती भरायची आहे. यात मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि आई किंवा वडिलांचं नाव लिहायचं आहे.

त्यानंतर Land Holdingमध्ये जमिनीच्या मालकीचा प्रकार सांगायचा आहे. यात स्वत: एकट्याच्या मालकीची जमीन असेल, तर single या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि सामूहिक मालकीची शेतजमीन असेल तर joint या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर Add या पर्यायावर क्लिक करून शेतजमिनीची माहिती सांगायची आहे.

आता इथं तुम्हाला सर्व्हे किंवा खाता नंबरमध्ये सातबाऱ्यावरील आठ-अ चा जो खाते क्रमांक आहे, तो टाकायचा आहे. त्यानंतर खासरा किंवा डॅगमध्ये सातबाऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुमच्याकडे किती शेतजमीन आहे, ते हेक्टरमध्ये लिहायचं आहे. सातबाऱ्यावर जितकी जमीन नोंदवलेली आहे, तो आकडा इथं टाकायचा आहे.

हे टाकून अॅड बटन दाबलं की तुमच्या माहितीची तिथं नोंद केली जाते.

आता एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन वेगवेगळ्या गट क्रमांक आणि खाते क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते. त्यामुळे तुम्ही पुन्हा add या पर्यायावर क्लिक करून ती माहिती देखील भरू शकता.

ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर “[X]I certify that all the given details are correct” याचा अर्थ मी दिलेली सगळी माहिती खरी आहे, या पर्यायासमोरच्या डब्ब्यात टीक करायचं आहे

त्यानंतर तुम्ही Self -Declaration Form* वर क्लिक करून तिथं दिलेली माहिती वाचू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, करदाते नाही याबद्दलची माहिती त्यात दिलेली असते.

सगळ्यात शेवटी सेव्ह या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर स्क्रीनवर एक मेसेज येईल. त्यावर लिहिलेलं असेल की, *****हा तुमचा identity proof number आहे आणि तुम्ही यशस्वीरित्या नोंदणी केली आहे. पुढील मंजूरीसाठी ही माहिती राज्य सरकारकडे पाठवली जाईल. ही माहिती समाधानकारक असेल, तर योजनेसाठी तुमचा विचार केला जाईल, अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल.

एकदा फॉर्म भरून झाला की काही दिवसांच्या अंतरानं तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकता.

त्यासाठी फार्मर कॉर्नर मधील status of self registered or csc farmer या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक आणि captcha टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस तिथं पाहायला मिळतं. यात सगळ्यात शेवटी नोंदणीची तारीख आणि फॉर्मचं स्टेटस दिलेलं असतं.

आता पाहूया पीएम-किसान योजनेचा हप्ता जमा झाला की नाही हे कसं बघायचं ?

हप्ता जमा झाला की नाही?

तुमच्या खात्यात PM-Kisanचा हप्ता जमा झाला की नाही, हे एकतर तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवलं जातं किंवा वेबसाईटवरही तुम्ही ते चेक करू शकता.

ते कसं तर यासाठी Farmer Cornerमधील beneficiary status या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तिथं तुम्हाला आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय माहिती टाकायची आहे. त्यानंतर get data या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग हप्ताविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.

या माहितीत शेतकऱ्याचं नाव, गाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, किती तारखेला नोंदणी केली ही वैयक्तिक माहिती दिलेली असते.

आतापर्यंत PM-Kisanचे ५ हप्ते सरकारनं जारी केले आहेत. त्यापैकी किती हप्ते शेतकऱ्याला मिळाले, त्याविषयीची माहिती हप्त्यानुसार दिलेली असते.

आधार संबंधित दुरुस्ती कशी करायची?

पीएम-किसान योजनेत नाव नोंदवताना आधार कार्डसंबंधीची माहिती चुकली असेल, तर दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला फार्मर कॉर्नरमधील Edit Aadhar Failure Record या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर आधार क्रमांक आणि captcha टाकून सर्च या पर्यायावर क्लिक केलं की एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

त्या पेजवर आधार कार्डवर जसं नाव आहे, तसंच तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्ही केलेली दुरुस्ती तिथं नोंद होईल.

संदर्भ :-BBC News

कृषी क्रांती चे अँप एकदा नक्की डाउनलोड करा.

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या शेतकरी मित्रांनो 

1 thought on “PM Kisan: योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *