Search
Generic filters

वनशेती म्हणजे काय, आणि वन शेतीच्या पद्धती

वन शेती

वनशेती म्हणजे काय, आणि वन शेतीच्या पद्धती

 

राज्यात वनशेतीयोग्य जमीन असतानाही त्याबाबत विचार केला जात नाही. महाराष्ट्राच्या पठारावर बऱ्याच भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तेथे ज्वारी, बाजरी, गहू यांसारखी पिके घेणेही परवडत नाही. वाटण्या होत गेल्याने बरेचसे शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. कमी पावसात अर्धा-एकर जमीन कसणे परवडत नाही. अशा ठिकाणी वनशेतीला थोड्या प्रमाणात सुरवात करून हळूहळू वृक्ष वाढवत जाणे योग्य ठरते.

कोकणपट्टीचा विचार करता तेथे पावसाचे प्रमाण जास्त आहे. पण भात शेती परवडत नाही. नुसता तांदूळ उत्पादित करून त्यावर संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ चालवणे अवघड जाते. पण त्या भागात मसाल्याचे पदार्थ होतात. इतर जंगली पण उपयोगी वृक्ष बरेच आहेत.

किंजळ, नरक्‍या, आसाणा, खैर अशी झाडे उत्पन्न देऊ शकतात. काडेपेटीच्या काड्या बनविण्यासाठी मऊ लाकडाच्या प्रजातीही कोकणात वाढू शकतात. तसेच करंजाच्या बियांपासून जैवइंधन बनविता येते. हिरडा, बेहडा, बिब्बा, कढीपत्ता, फणस, जांभूळ, इत्यादी अनेक वृक्ष वाढवून वृक्षशेती – वनशेती करता येईल. तरीही शेतकरी वनशेतीकडे वळत नाहीत. त्याची कारणे व उपाययोजना याचे विवेचन पुढीलप्रमाणे आहे.

वनशेतीला लागणारा वेळ झाडे वाढण्याला सुमारे पाच ते पंधरा वर्षांचा कालावधी लागतो. तेवढा काळ काहीही उत्पन्न न मिळता नुसतीच मेहनत करणे अव्यवहार्य ठरते आणि चालू उत्पन्न डावलून वनशेतीकडे वळणे परवडत नाही. याबाबत असे करता येईल, की दरवर्षी फक्त पाच ते दहा वृक्ष लावले जावेत. बाकीच्या जमिनीवर पारंपरिक पिके लावता येतील. लवकर फळे देणारे वृक्ष सुरवातीला लावले जावेत. काही वृक्ष केवळ चार – पाच वर्षांत उत्पन्न देणारे आहेत. त्यात आंबासुद्धा आहे. ते अगोदर लावले जावेत.

या प्रमाणे वनशेती केल्यास सुरवातीला बचत केल्याप्रमाणे काही टक्‍क्‍यांनी उत्पन्न कमी मिळाले तरी कालांतराने दीर्घ मुदतीच्या ठेवीप्रमाणे पुरेसे उत्पन्न मिळू लागेल. शिवाय एकदा झाडे वाढली की मग मेहनत खूप कमी होते व उत्पादन म्हणजे बिया व फळे काढण्याचीच काय ती मेहनत करावी लागते. यामुळे मजुरीचा खर्चही कमी होतो.

वनशेती न करण्यामागे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारी कायदे होत. 1966 ला झाडतोड बंदी कायदा झाला. शिवाय प्रसिद्धी माध्यम व सामाजिक कार्यकर्ते यांनीही झाडतोड विरोधी भूमिका घेतली आहे. या सर्व पर्यावरणविषयक चळवळींची भीती शेतकरी वर्गाला आहे. त्यामुळे वनशेती कोणी करू इच्छित नाही. झाड तोडले तर त्याकडे गंभीर गुन्हा म्हणून पाहिले जाते. वास्तविक वृक्षांच्या फांद्या तोडल्याने पर्यावरणाला बाधा येत नाही.

जळाऊ लाकूड हा ही एक ऊर्जास्रोत आहे. तो उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. झाड तोडल्याने कापलेले झाड जास्त जोमाने वाढते. नवीन वृक्ष पूर्ण मोठे व्हायला पंधरा वर्षे लागतात, पण फांद्या तोडलेले झाड जेमतेम पाच वर्षात पूर्ववत होते. ही वृक्षतोड पिके काढण्यासारखीच आहे. शिवाय फळे, बिया वगैरेपासून उत्पन्न मिळते ते वेगळेच.

वृक्ष तोडताना लागणारी शासकीय परवानगी, त्यासाठी घालावे लागणारे हेलपाटे, तोडल्यावर त्याच्या वाहतुकीसाठी लागणारा कर, या सर्व गोष्टींना कमीत कमी पंधराशे रुपये लागतात. या सर्व गोष्टी कटकटीच्या वाटतात म्हणून वनशेतीकडे कोणी वळत नाही.

वनशेतीपासून होणारे फायदे

साधारण डोंगर उताराची जमीन चालते. कोकणातील जांभा दगडाच्या जमिनीवरसुद्धा वनशेती यशस्वीपणे करता येते. पर्जन्यमानानुसार वनशेती करता येते. कमी पावसाच्या भागात देखील निंबोणी, बाभूळ, चिंच अशा झाडांची वनशेती करता येते. एकाच प्रकारची झाडे सर्व शेतकऱ्यांनी मिळून लावली तर त्यापासून एखादा उद्योगही सुरू करता येतो. जसे ः निंबोणीपासून निंबोणी तेल काढणे.

अन्य फायदे पुढीलप्रमाणे – श्र बाभळीपासून डिंक, बाभूळ पावडर मिळू शकते. अनेक प्रकारचे कारखाने वृक्षाच्या प्रकारानुसार निघू शकतात. श्र वनशेतीच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्र विकसित करता येईल. श्र लाकूड रूपाने भरपूर इंधन मिळू शकेल. वीटभट्ट्या, बेकरी व अन्य उद्योगांसाठी इंधननिर्मिती होऊ शकेल. श्र देशातील जंगल क्षेत्र वाढेल. पडित जमिनी लागवडीखाली येतील.
वनशेती सुलभ होण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्‍यकता आहे. श्र खासगी वनशेतीसाठी शासनाने वृक्षतोडीचे नियम शिथिल करावेत. श्र रोजगार हमी योजनेप्रमाणे वनशेतीला अनुदान मिळावे.

श्र तालुक्‍याच्या ठिकाणी वनविकास कार्यालये उभी करावीत, जेथे सल्ला व माहिती मिळेल. श्र शासकीय मालकीच्या पडित जमिनी खासगी व्यक्तींना, संस्थांना, गरीब शेतकरी वर्गाला दीर्घ मुदतीच्या कराराने, योग्य त्या अटींवर द्याव्या.
कुठल्याही भूभागावर वनशेती होऊ शकत असल्याने अशा शेतीला प्राधान्य मिळाले पाहिजे. वनसंपदा हा संवेदनशील विषय आहे आणि ती समाजाची व देशाची गरज आहे.

वन शेतीच्या पद्धती

वन शेती ही शेती उत्पादनातील सुधारित पद्धत आहे. महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण विभागातील कमी व अनिश्‍चित पाऊसमानात हलक्‍या, उथळ, क्षारयुक्त व नापिक, पाणथळ जमिनीत नेहमीचे पीक बऱ्याच वेळा फायदेशीर ठरत नाही, तसेच आर्थिकदृष्ट्या परवडतदेखील नाही. अशा जमिनीत परिस्थितीमुळे प्रचलित पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.
1) कृषी वनरोपण: या पद्धतीत झाडे व पिके एकत्रितरीत्या घेतली जातात. जमिनीच्या प्रकारानुसार आणि झाडांच्या उपयोगानुसार उदा. तटरक्षक, फळझाडे, लाकूडफाटा, चारा इ. झाडांची निवड करून ती योग्य त्या अंतरावर ओळीमध्ये लावून त्यामध्ये योग्य पद्धतीने पिके घेतात.
2) वनीय कुरण: हलक्‍या व उथळ जमिनीत चारा देणारे वृक्ष व कुरण उपयोगी गवताची लागवड करण्यात येते.
3) कृषी वनीय कुरण: हलक्‍या ते मध्यम प्रतीच्या जमिनीवर पिके, वृक्ष व गवतांची लागवड करतात.
4) उद्यान कुरण पद्धत: हलक्‍या जमिनीवर सीताफळ, बोर, आवळा आणि कवठ यांसारख्या कोरडवाहू फळझाडांची लागवड करून मधल्या जागेत सुधारित गवतांची लागवड करतात.
5) उद्यान कृषी: फळझाडांच्या पिकाबरोबर धान्याची पिके घेतली जातात.
6) कृषी-उद्यान – कुरण: मध्यम प्रतीच्या जमिनीत फळझाडे, पिके व सुधारित गवतांची लागवड करतात.
7) वृक्ष शेती पद्धत: या पद्धतीत वृक्षांची लागवड करून फायदा मिळवता येतो.

वन शेतीचे फायदे

1) वन शेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीक उत्पादनाबरोबर वृक्षापासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो व वाढीव उत्पन्न मिळविणे शक्‍य होते. 2) वृक्षामुळे शेतात आर्द्रता टिकवली जाते व वादळवारे यापासून पिकांचे संरक्षण होते. पर्यावरण संतुलनास मदत होते. 3) जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते. 4) हलक्‍या, मुरमाड अशा जमिनीत नेहमीच्या पीक पद्धतीऐवजी वन शेती लाभदायक ठरते. 5) नापिक अशा जमिनीत थोडी काळजी घेतल्यास वृक्षापासून फायदे मिळविता येतात, तसेच जमिनीचा मगदूर सुधारता येतो. 6) वन शेतीस मजूर कमी लागतात व या पद्धतीपासून दीर्घकाळ उत्पन्न मिळत राहते. 7) महुआ या झाडापासून मिळणारी फुले, फळे आणि बिया खाद्यान्न म्हणून वापरतात. बाभळीच्या सिनेगल या जातीपासून तयार होणारा डिंक परदेशात भरपूर भावाने विकला जातो. लिंब वृक्षाचा औषधी उपयोगासाठी अवलंब होतो. तसेच लिंबोळ्यांचा खत म्हणून उपयोग होतो. साग, सिसम, कडुनिंब यांसारखी झाडे इमारती लाकडासाठी प्रसिद्ध आहेत. वनशेती म्हणजे काय वनशेती म्हणजे काय वनशेती म्हणजे काय

पाऊसमानाप्रमाणे व जमिनीनुसार वृक्षांची निवड

1) भरपूर पावसाचा प्रदेश (1200 मि.मी. पेक्षा जास्त): साग, बांबू, मोहा, बाभूळ, शेवगा, हादगा, काशीद.
2) मध्यम पाऊसमान (750-1200 मि.मी.): कडुलिंब, करंज, बाभूळ, सिसू, शिवण, बकाण.
3) कमी पावसाचा प्रदेश (750 मि.मी. पेक्षा कमी): नीम, बाभूळ, सुबाभूळ, बोर, चिंच, आवळा, खैर सीताफळ.
4) क्षारयुक्त जमीन: खैर, विलायती, बाभूळ, सुरू, सिसू, नीम.
5) आम्लयुक्त जमीन: करंज, शिवण, चिंच, ग्लिरिसिडीया, शिरस.
6) दलदलीची जमीन: बाभूळ, ग्लिरिसिडीया, भेंडी, शेवरी, शिरस.

उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवड

1) हिरवा चारा: सुबाभूळ, अंजन, शिवण, शिरस, खैर आपटा, कांचन, पांगारा, धावडा, नीम, पळस, शेवरी, हादगा, बाभूळ.
2) जळणासाठी लाकूड: निलगिरी, बाभूळ, वेडीबाभूळ, सुरू, पळस, साग, नीम, आवळा, करंज, हादगा, शेवरी.
3) फळझाडे: आंबा, चिंच, बोर, आवळा, जांभूळ, सीताफळ, पेरू.
4) औद्योगिक उत्पादनाकरिता: नीम, बाभूळ, तुती, करंज, धावडा, निलगिरी, बांबू, पॉपलर, वन, एरंड महुआ.
5) लाकडासाठी झाडे: साग, नीम, बाभूळ, शिरस, सुरू, काशीद, करंज, शिवण.
6) जैविक इंधनाकरिता: करंज, वन एरंड, महुआ, जोजोबा, सीमारुबा.

विविध जमिनींसाठी उपयुक्त वृक्ष

1) हलक्‍या व उथळ जमिनी: अंजन, सुबाभूळ, सिसू, बाभूळ, सिरस, शेवरी, कडुलिंब.
2) पाणथळ जमिनी: गिरिपुष्पास सुरू, भेंडी, करंज, शेवरी, निलगिरी.
3) क्षारयुक्त जमिनी: वेडी बाभूळ, बाभूळ, कडुलिंब, सिसू, निलगिरी, करंज, खैर.
4) डोंगराळ जमिनी: निलगिरी, बाभूळ, सुबाभूळ, सौंदड, कडुलिंब.

संपर्क: 02426-243252
अखिल भारतीय समन्वित वनशेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

संदर्भ:- mr.vikaspedia.in

Leave a Comment

Your email address will not be published.