राज्य सरकारने केली घोषणा, कसा असणार यंदाचा गाळप हंगाम..? Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information


राज्य सरकारने केली घोषणा, कसा असणार यंदाचा गाळप हंगाम..?

20-09-2022

...

राज्य सरकारने केली घोषणा, कसा असणार यंदाचा गाळप हंगाम..?

यंदाचा गाळप हंगाम सरासरी 160 दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी 10.25 टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन 3 हजार 50 रुपये एफआरपी देण्यात येणार आहे.

गतवर्षी झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून यंदा (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम 15 दिवसांनी अगोदर सुरु होत आहे. (Sugar Factory) साखर कारखानदारांसह शेतकऱ्यांना जे अपेक्षित होते तोच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यंदा 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळपाला सुरवात होणार आहे. गाळप हंगामाबाबत (Committee of Ministers) मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे. यावेळी गतवर्षी झालेले गाळप आणि साखरेचे उत्पादन याचाही आढावा घेण्यात आला.

 

 

गतवर्षी साखर कारखान्यांच्या क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम होता. राज्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. विशेषत: मराठवाड्यातील क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून 15 दिवस आगोदर गाळप हंगाम सुरु होत आहे.

गत हंगामात सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळप केले. शेतकऱ्यांना 42 हजार 650 कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली. राज्याने देशात सर्वाधिक 98 टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात आले.

यंदा राज्यात ऊसाचे क्षेत्र 14 लाख 87 हजार असून गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. हेक्टरी 95 टन ऊसाचे उत्पादन अपेक्षित आहे. यंदाच्या हंगामात राज्यात 203 साखर कारखाने हे सुरु होणार आहेत. 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

 

 

यंदाचा गाळप हंगाम सरासरी 160 दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी 10.25 टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन 3 हजार 50 रुपये एफआरपी देण्यात येणार आहे.

देशात सध्या 60 लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात 30 लाख मेट्रीक टन साठा आहे. यंदा देशातून 100 लाख मेट्रीक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज असून त्यात महाराष्ट्राचा वाटा 60 लाख मेट्रीक टन आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित होते.