Havaman Andaj : राज्यात काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा वेधशाळेचा अंदाज
एकीकडे कमालीची वाढणारी उष्णता तर दुसरीकडे पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘असनी’ चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. आज सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरणअसून हवेतदेखील गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढचे तीन दिवस असेच वातावरण राहण्याचाही अंदाज आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार , आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या अंदमान समुद्रावरील दाबाचा पट्टा शनिवारी संध्याकाळी एका खोल दाबामध्ये केंद्रित होऊन रविवारी दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर ‘असनी’ चक्रीवादळ तयार झाले. पूर्व किनारपट्टीवर त्याचा अधिक परिणाम दिसून येत आहे.
अवकाळी पावसाचा अंदाज
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 13 मे रोजी पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्येही 13 मेपर्यंत पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पावसामुळे उन्हाने, उकाड्याने हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र पिकांना हा पाऊस नुकसानकारक ठरण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील महिन्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे शेतकऱ्यांचे विशेषत: बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते. द्राक्ष, डाळिंब यासह विविध पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. आता पुन्हा वेधशाळेने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हे पण वाचा:- कृषी यांत्रिकीकरणासाठी २४० कोटींना मान्यता!
ओडिशा, पश्चिम बंगालकडे पोहोचणार चक्रीवादळ
चक्रीवादळ 10 मे म्हणजेच आज संध्याकाळपर्यंत वायव्येकडे सरकत राहण्याची दाट शक्यता आहे आणि उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीपासून पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर ओडिशाच्या किनारपट्टीपासून उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागराकडे ते जाईल, असे आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संदर्भ:- tv9 marathi