कृषी अवजारे बँक (FMB) योजनेसाठी नवीन नोंदणी व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; महिलांच्या बचत गटांना संधी

कृषी अवजारे बँक (FMB) योजनेसाठी नवीन नोंदणी व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; महिलांच्या बचत गटांना संधी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गावस्तरीय कृषी अवजारे बँक (FMB) या घटकासाठी नव्याने नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने 26 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
या निर्णयामुळे प्रकल्पांतर्गत पात्र महिला बचत गटांना कृषी अवजारे बँक घटकाचा लाभ घेण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
कोणते बचत गट अर्ज करू शकतात?
प्रकल्प गावातील आत्मा (ATMA) अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट या घटकासाठी पात्र राहतील.
महिला बचत गटामध्ये केवळ महिला सभासद असल्याची खात्री करून प्रस्तावांची पुढील छाननी करण्यात येणार आहे. तसेच आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गटांसाठी लागू असलेले पात्रता निकष आणि कृषी अवजारे बँकेच्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील.
अर्जांची छाननी किती दिवसांत होणार?
नवीन अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरीय नोडल अधिकारी आणि प्रकल्प विशेष कृषी व्यवसाय यांच्या मदतीने प्रस्तावांची छाननी करण्यात येईल.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर 3 कार्यालयीन दिवसांत कागदपत्रांची छाननी पूर्ण करावी.
- प्रस्तावात त्रुटी असल्यास आवश्यक कागदपत्रांची पूर्तता 8 कार्यालयीन दिवसांत करून घ्यावी.
- संबंधित गटांकडून आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करून घेण्याची जबाबदारी प्रकल्प विशेष कृषी व्यवसाय यांची राहील.
ऑनलाइन लॉटरीद्वारे गटांची निवड
पूर्ण आणि पात्र प्रस्तावांची निवड FPO-DBT पोर्टलवरील ऑनलाइन लॉटरी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
लॉटरी प्रक्रिया दर महिन्याच्या 15 आणि 30 तारखेला पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, एखाद्या गावातील सर्व अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतरच त्या गावाचा लॉटरीमध्ये समावेश केला जाईल.
जर त्या गावातील एक जरी अर्ज त्रुटीमध्ये असेल, तर संपूर्ण गाव लॉटरीसाठी पात्र ठरणार नाही. त्यामुळे गावातील सर्व अर्ज पात्र झाल्यानंतरच लॉटरी काढणे आवश्यक राहील.
निवड झालेल्या गटांची माहिती कशी मिळणार?
लॉटरीमधून निवड झालेल्या गावनिहाय गटांची तालुकानिहाय यादी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना पाठवतील.
तालुका कृषी अधिकारी ही यादी मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवतील.
लॉटरी पूर्ण झालेल्या गावांमध्ये निवड झालेल्या गटांची माहिती ग्राम कृषी विकास समितीच्या बैठकीत देण्यात येईल. तसेच ग्रामपंचायत फलकावरही संबंधित माहिती प्रसिद्ध केली जाईल.
एक गाव, एक कृषी अवजारे बँक
प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘एक गाव, एक औजार बँक’ या संकल्पनेनुसार गावस्तरीय कृषी अवजारे बँक घटक राबविण्यात येत आहे.
ज्या गावांमध्ये अद्याप लॉटरी प्रक्रिया झालेली नाही, त्या गावांमध्ये अधिकाधिक पात्र गटांनी पोर्टलवर अर्ज करावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
कृषी अवजारे बँकेत कोणती अवजारे घेता येणार?
कृषी अवजारे बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काही अवजारांचा समावेश करण्यात आला आहे.
भात हे प्रमुख पीक असलेल्या गावांना वगळून इतर गावांसाठी बेड तयार करण्याकरिता बेडमेकर हे अवजार बंधनकारक करण्यात आले आहे. बेडमेकरची संख्या किमान 1 आणि कमाल 5 असू शकते.
तथापि, क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त विनंतीनुसार गटांना आवश्यकतेनुसार बेडमेकरऐवजी बीबीएफ (BBF) अवजार घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
प्रस्तावित अवजारांचा टेस्ट रिपोर्ट उपलब्ध नसल्यास, संबंधित गटाच्या लेटरहेडवर अवजाराच्या गुणवत्तेबाबत हमीपत्र घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.