तुषार आणि ठिबकसाठी 90 टक्के अनुदान
15-06-2024
तुषार आणि ठिबकसाठी 90 टक्के अनुदान मिळतयं, तुम्ही अर्ज केला का? वाचा सविस्तर
शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेत चालू वर्षासाठी तुषार संच व ठिबक संच अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी शेतकरी प्रणालीवर अर्ज घेतले जात आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या दोन योजनांच्या माध्यमातून ९० टक्के अनुदान देखील मिळणार आहे.
गेल्यावर्षी १ लाख ३४ हजार २६७ हेक्टर कपाशी पिकाची पेरणी झाली होती. यापैकी बहुतेक क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावर व कोरडवाहू आहे. कपाशी पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध न झाल्यास पिकाची वाढ होत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे फुले गळतात. बोंडे कमी प्रमाणात येतात, तसेच त्यांचे वजन कमी भरते. त्यामुळे पेरणी, मशागत आदी बाबी वेळेवर व चांगल्या प्रकारे केल्या तरी वाढीच्या अवस्थेत पाणी न मिळाल्याने उत्पन्नात घट होते. पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्यास किंवा झाल्यास ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्याने तंतोतंत वापर होऊन पिकाला वेळेवर पाणी मिळते व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेत ५५ टक्के व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत ३५ टक्के असे एकूण ९० टक्के अनुदान मिळते. त्याचप्रमाणे, बहू भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेत ४५ टक्के व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत ४५ टक्के असे एकूण ९० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सूक्ष्म सिंचन योजनेत सहभागी व्हावे अशी माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली. यासाठी कृषी विभागासाठी संपर्क साधणे आवश्यक आहे.
८० टक्के अनुदान मिळणार
यंदाच्या खरीप हंगामात कपाशीचे क्षेत्र जास्तीत जास्त प्रमाणात ठिबक सिंचनाखाली आणणे हा शासनाचा हेतु आहे. ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकयांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेत (प्रतिथेंब अधिक पीक) ५५ टक्के व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत २५ टक्के असे एकूण ८० टक्के अनुदान मिळते. त्याचप्रमाणे, बहू भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेत ४५ टक्के व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत ३० टक्के असे एकूण ७५ टक्के अनुदान मिळते.