महाडीबीटी पोर्टलवरून विविध प्रकारच्या योजनांसाठी असा करा अर्ज
05-04-2023
महाडीबीटी पोर्टलवरून विविध प्रकारच्या योजनांसाठी असा करा अर्ज
कृषी क्षेत्रासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध प्रकारच्या योजना असून या सगळ्या योजनांचे अंमलबजावणी जलद आणि पारदर्शक होणे गरजेचे असते. तसेच शेतकरी बंधूंना सर्व सरकारच्या योजनांचा लाभ हा एकाच माध्यमातून मिळावा याकरिता महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी हे संकेतस्थळ विकसित केले आहे.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून मागील दोन वर्षाचा विचार केला तर एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील 1800 शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून 20.77 कोटी रुपयांचे अनुदान मिळवले आहे. हे पोर्टल खूप महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून अनेक प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला जातो. म्हणजेच एक अर्ज करून अनेक योजनांचा लाभ या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना मिळणे शक्य आहे.
महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून एक अर्ज करून तुम्ही खालील प्रमाणे योजनांचा लाभ घेऊ शकतात
महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, शेततळ्यांचे खोदकाम तसेच शेडनेट योजना, पॉली आणि पॅक हाऊस, कांदा चाळ व शेततळे अस्तरीकरण इत्यादी महत्त्वाच्या घटकांसाठी देखील अनुदान महाडीबीटी च्या माध्यमातून मिळवता येण्याची सुविधा आहे.
याशिवाय ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, पावर टिलर तसेच पावर विडर, रोटावेटर, कल्टीवेटर, नांगर, खते व बियाणे पेरणी यंत्र, पाचट कुट्टी, मल्चर, श्रेडर, ट्रॅक्टर ऑपरेटेड ब्लोअर, धान्य मळणी यंत्र, डाळ मिल, कम्बाईन हार्वेस्टर, प्लास्टिक पेपर मल्चिंग, कोल्ड स्टोरेज, रॅपनिंग चेंबर व प्रक्रिया युनिट इत्यादी घटकांसाठी देखील शेतकऱ्यांना अर्ज करता येतो.
शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा देखील लाभ महाडीबीटीच्या माध्यमातून मिळतो
शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक कल्याणकारी योजना आहेत.
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना,
- मुख्यमंत्री शाश्वत शेती सिंचन योजना (सामूहिक/ वैयक्तिक),
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना,
- फलोत्पादनाच्या एकात्मिक विकासासाठी अभियान,
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेत कृषी यांत्रिकीकरण,
- कांदा साठवणूक सुविधा तसेच संरक्षित लागवड व शेततळ्यांना कागदी आच्छादन,
- भाजीपाला रोपवाटिका तसेच अनुसूचित घटकांसाठी नवीन विहीर इत्यादी.
- राज्य कृषी यांत्रिकीकरण आणि तेलबिया लागवडीत वाढ करणे
इत्यादी योजनांचा समावेश या महाडीबीटी पोर्टलवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही एका अर्जात या सगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अशा पद्धतीने करावा अर्ज
- तुम्हाला देखील या पोर्टलच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात अगोदर https://mahabdt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्वतःच्या मोबाईलवरून किंवा संगणक किंवा सामुदायिक सुविधा केंद्रावरून लाभ घेऊ शकतात. तसेच ग्राम पंचायत संलग्न कक्षा मधून अर्ज करावा.
- त्यानंतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व अर्जांची सोडत काढण्यात येते.
- संगणक सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्यासाठी मोबाईलवर मेसेज करून कळवण्यात येते.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर पूर्वसंमती देण्यात येते व या पूर्व संमतीमध्ये सुचित कालावधीत निवड झालेल्या बाबींची शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून देयकांची छायांकित प्रत पोर्टल वरती अपलोड करणे गरजेचे असते.
- अशा पद्धतीने तुम्ही महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अनेक कृषी योजनांचा लाभ मिळवू शकतात.
source : shetimarathi