पावसाळ्याच्या दृष्टीकोनातून जनावरांच्या व्यवस्थापनात कोणते बदल केले पाहिजे?

14-06-2023

पावसाळ्याच्या दृष्टीकोनातून जनावरांच्या व्यवस्थापनात कोणते बदल केले पाहिजे?

पावसाळ्याच्या दृष्टीकोनातून जनावरांच्या व्यवस्थापनात कोणते बदल केले पाहिजे?

उन्हाळ्याच्या उत्तरार्धात, पावसाळ्यापूर्वी जनावरांच्यामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा मोठ्या प्रमाणात ताणतणाव निर्माण करून उत्पादन कमी करण्यास तसेच काहीवेळा गंभीर नुकसानास जबाबदार असतात. पावसाळ्यात जनावरांत अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो तसेच कुपोषण किंवा काहीवेळा मृत्यूही ओढवतो.

पावसाळ्यात हवामानातील अचानक बदल हे काही रोगप्रसारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अनुकूल ठरतात. ज्यामुळे जनावरे, कोंबड्यांच्यामध्ये आजारांचा प्रादुर्भाव होतो. प्रतिकूल हवामान घटकांमुळे, जसे थंड, ओलसर गोठे/शेड आणि गोठ्याच्या आजूबाजूला पाणी साचलेले चर आणि बुरशीजन्य खाद्यामुळे जनावरे आजारी पडतात.

पावसाळ्यात सामान्यतः जनावरांची प्रतिकारशक्ती क्षीण होते. उष्ण, दमट हवामानात विविध जिवाणू आणि बुरशीची वाढ झपाट्याने होते. पावसाळ्यात बुरशीजन्य प्रादुर्भावयुक्त चारा खाल्ल्याने जनावरांना बुरशीजन्य आजार होतात. कुरणात आणि गवताळ प्रदेशात बुरशीची वाढ झपाट्याने होते आणि बीजाणू आणि विषारी द्रव्ये तयार होतात, ज्यामुळे मायकोटॉक्सिकोसिस होतो.

जनावरांच्या संपूर्ण शरीरावर ॲलर्जी, त्वचेचे विकृती, शेपटी, मांडी, पाय, कास, सामान्य तापमानासह अंडकोष आणि भुकेवर परिणाम दिसतो. त्यामुळे जनावरांचा गोठा, आहार आणि पोषण, प्रजनन, तसेच आरोग्याची काळजी घ्यावी.

गोठ्याचे व्यवस्थापन

  • गोठा पुरेसा स्वच्छ नसल्यास, साचलेल्या घाण पाण्यामुळे अमोनियासारख्या वायूची निर्मिती होते, त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
  • शेळ्यांमध्ये खूर कुजण्याचा आजार टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.
  • पावसाळ्यात गोठ्याची फरशी स्वच्छ व कोरडी ठेवावी. गोठ्यात योग्य वायुवीजन ठेवल्याने गोठा स्वच्छ आणि कोरडा रहातो.
  • पावसाळ्यातील हवामान प्रौढ जनावरांच्यापेक्षा नवजात लहान वासरासाठी तसेच करडांसाठी अधिक असुरक्षित असते. नवजात वासरांना फरशीवरील थंडी टाळण्यासाठी उबदार निवारा द्यावा.

समतोल आहार

  • टंचाईमध्ये खाद्य देण्यासाठी गवत आणि सायलेज तंत्राद्वारे हिरव्या चाऱ्याचे योग्य नियोजन करावे.
  • पावसाळी आणि पूर परिस्थितीत खनिज आणि जीवनसत्त्वयुक्त खाद्याची तरतूद करावी.
  • पावसाळ्यात कोरड्या चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास पौष्टिकतेची हानी कमी होऊ शकते.
  • ओल्या हवामानात खाद्यावर बुरशीची वाढ होण्याची शक्यता असल्याने, पावसाळ्यात पेंड व चारा साठवताना काळजी घ्यावी.
  • पावसाळ्यात मिळणाऱ्या चाऱ्यात पाण्याचे जास्त प्रमाण असते. असा चारा खाल्ल्याने काही वेळा पातळ शेण होऊ शकते. त्यामुळे हिरवा चारा कोरड्या चाऱ्यात मिसळून द्यावा.
  • थंड हवामानात टिकून राहण्यासाठी जनावरांच्या अंगात उष्णता निर्माण करण्यासाठी ऊर्जा समृद्ध खाद्याची आवश्यकता असते.
  • पिण्याच्या पाण्याचे स्रोत अनेक कारणांमुळे सहज दूषित होतात. त्यामुळे जनावरांना दिल्या जाणाऱ्या पाण्याचा दर्जा राखावा.
  • जनावरांना चराईला जाण्यापूर्वी त्यांना पिण्याचे पाणी पाजावे.

पावसाळ्यातील आरोग्याची काळजी

  • आजाराने संक्रमित जनावरे चारा, पाणी दूषित करतात. त्यामुळे इतर जनावरांच्यामध्ये प्रसार होतो.
  • जनावरांच्या अंगावरील उघड्या जखमा नियमितपणे स्वच्छ करून ते कापडाने झाकावेत.
  • पावसाळ्यात माशीच्या अळ्या जखमेत वाढतात. त्यामुळे जखमेचे नियमित ड्रेसिंग करावे.
  • पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करावे. गाई, म्हशींना घटसर्प, फऱ्या आजारासाठी लसीकरण करावे. मेंढ्या, शेळीला पावसाळ्यापूर्वी पीपीआर, आंत्रविषार लसीकरण करावे.
  • लसीकरण केल्यानंतर जनावरांचे अति उष्ण व अति थंड वातावरणापासून संरक्षण करावे. दूरवरची वाहतूक टाळावी.
  • पावसाळ्यात बाह्य आणि अंतर्गत परजीवींचे प्रमाण वाढते. त्यामुळे पाणथळ जागेत जनावरांना चरावयास सोडू नये.
  • जंतांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीनुसार जंतनाशके पाजावीत. जंतनाशकाची निवड, त्याचे प्रमाण आणि पाजण्याची पद्धत पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार अंमलात आणावी.

उपाययोजना

  • संक्रमित आणि संपर्कातील जनावरांची ओळख आणि विलगीकरण करावे. प्रभावित जनावरांवर उपचार करावेत.
  • दूषित खाद्य आणि पाण्याची विल्हेवाट लावावी.
  • बाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी शिफारशीत गोचिडनाशकाची नियमित फवारणी करावी.
  • अंतर्गत परजीवी नियंत्रित करण्यासाठी जनावरांचे मान्सूनपूर्व आणि नंतर जंतनिर्मूलन करावे.
  • जनावरांना पुरेसा व्यायाम द्यावा. पावसाळ्यात कासेचे रोग होतात, त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो.
  • चुना आणि मीठ वापरून मृत जनावरांना खोल खड्यात पुरावे.
  • पावसाळ्यात झाडांखाली जनावरे बांधू नका कारण ज्यावर वीज पडू शकते.जनावरे विजेच्या खांबाना बांधू नये.

source : agrowon

Animal Management, Animal Care In Rainy Season, Animal Health Care

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading