पिकनिहाय रासायनिक खते निवडण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स
04-07-2023
पिकनिहाय रासायनिक खते निवडण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स
खते फेकून टाकल्यास ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाया जातात. याचा परिणाम खर्चात वाढ आणि उत्पादन (Crop Production) कमी मिळते. पाण्याची प्रत व जमिनीचा प्रकार, क्षाराचे प्रमाण, पाणी आणि जमिनीतील इतर घटक तसेच जमिनीतील जैविक विविधता (Crop Diversity) यावर खताची उपलब्धता अवलंबून आहे.
त्यामुळे रासायनिक खतांची निवड करतांना काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय रासायनिक खते (Chemical Fertilizer) कशा प्रकारे दिल्यानंतर पिकाला लागू पडतात याविषय़ीही माहिती असने आवश्यक आहे.
रासायनिक खतांची निवड करतांना...
- दीर्घकालीन पिकांसाठी नायट्रो फॉस्फेट १५:१५:१५,अमोनियम फॉस्फेट यासारख्या संयुक्त खतांचा वापर करावा.
- स्फुरदाची उपलब्धता सुकर होण्यासाठी पूर्णपणे विद्राव्यशील खतांची निवड करावी. उदा. सिंगल सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट
- डाळवर्गीय व तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा समावेश करवा. उदा. अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फेट
- स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू (पि.एस.बी.) खतांचा वापर करावा.
- नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवरणयुक्त युरियाचा वापर करावा. (निमकोटेड युरिया, सल्फर कोटेड युरिया).
- हिरवळीची खते म्हणून गिरीपुष्पाचा किंवा सुबाभळीच्या कोवळ्या फांद्या वापराव्यात.
- साखर कारखान्यातील ऊसाची मळी, जिवाणू खताचा वापर करावा.
रासायनिक खते कशी द्यावीत?
- साधरणत: स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खते एकाच हफ्त्यात पेरणीच्या वेळी आणि बियाण्यापासून ५ सें.मी. खोल द्यावीत.
- नत्रयुक्त खताची पूर्ण मात्रा एकाच हफ्त्यात न देता पिकाची अवस्था लक्षात घेऊन २ अथवा ३ हफ्त्यात द्यावेत.
- चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर दिल्यास बराच नत्र उडून जातो. म्हणून ही खते जमिनीत मिसळून द्यावीत.
- नत्र वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे. खते शक्यतो पेरणीच्या वेळी द्यावीत व मातीने झाकावीत.
- पिकाच्या कालावधीप्रमाणे खताच्या मात्रा विभागून देणे फायदेशीर ठरते.
source : agrowon