कापूस काढणी आणि त्यानंतरचे जमिनीचे व्यवस्थापन
01-02-2023
कापूस काढणी आणि त्यानंतरचे जमिनीचे व्यवस्थापन
बागायत कापूस आणि जिरायत कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रात केली जाते. कपाशीच्या पेरणीचा हंगाम संपल्यानंतर बरेच शेतकरी कपाशीचं पिक जनावरांना खाऊ घालून तसेच शेतात राहू देतात. आणि मग कधी सवड असेल त्या वेळी नांगरून अगर उपटून पऱ्हाट्या काढतात. ही अगदी चुकीची पद्धत आहे. कारण पऱ्हाट्या तशाच शेतात राहू दिल्यास कपाशीवारिल पुष्कळशा किडी रोग सुप्तावस्थेत पडून राहतात.आणि मग पुढच्या हंगामात अनुकूल हवामानात पुन्हा उद्भवतात आणि मग औषधांचा खर्च वाढतो. उत्पादन कमी होते.
कपाशीची पिकाची विल्हेवाट कशी लावावी
- पुढच्या हंगामात कापसावर जास्त प्रमाणात किड-रोग येऊ नयेत म्हणून कपाशीच्या पिकाच्या अवशेषाची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
- कपाशीवर येणाऱ्या किडिंचा आणि रोगाचा प्रसार पूर्वीच्या पिकाच्या अवशेषापासून आणि काडी काचऱ्यापासून होतो. यासाठी कपाशी हंगाम संपल्यानंतर शेतातला काडीकचरा रोगट पाने यांसारखे अवशेष गोळा करून नायनाट व्हावा यासाठी स्वछता मोहिम हाती घेणे आवश्यक आहे. अशी स्वछता मोहिम पूर्ण झाल्यानंतर रोगाच्या पुढच्या वाढीस आळा बसेल.
- शेवटची वेचणी संपली कि, लवकरात लवकर पऱ्हाट्या जनावरांना खाऊ घालून पऱ्हाट्याचे राहिलेले अवशेष मुळासह उपटून काढाव्यात.
- पऱ्हाट्या तशाच शेतात ठेवल्यास जमिनीतला अन्नांश खातात. जमिनीचा कस कमी होतो. म्हणून त्या मुळासह उपटून काढाव्यात.
- अशा पऱ्हाट्या जळणासाठी उपयोगी पडतात. अगर बारीक तुकडे करून अळिंबीचे बेड तयार करण्यासाठी फारच उपयुक्त ठरतात.
- कपाशीवरील ठिपक्यांची बोंडअळी शेतात शिल्लक राहिलेल्या कपाशीच्या पऱ्हाट्यावर, फुटीवर तसेच भेंडी, अंबाडी यांसारख्या उन्हाळी पिकांवर पोसली जाते.
- तर कपाशीवरील शेंदरी बोंडअळी जमिनीवर पडलेल्या कापसाच्या बोंडात अगर कपाशीच्या सरकित पुढच्या हंगामापर्यंत सुप्त अवस्थेत पडून राहते.
- याशिवाय कवडी-करपा सारख्या रोगाचे जिवाणूही कापसाच्या शेतात पडलेल्या अवशेषात सुप्त अवस्थेत राहतात.
- अशा सुप्तावस्थेत पडून राहिलेल्या किडी-रोगाच्या बंदोबस्तासाठी कापूस स्वच्छाता मोहिम हाती घ्यावी आणि तीही त्या सर्व परीसरातल्या सर्व शेतकऱ्यांनी एका वेळी सामुदायिकरीत्या हाती घ्यावी. एकट्या दुसर्याने स्वच्छता मोहिम राबवून फारसा उपयोग होत नाही. म्हणुन सार्वजनिकरित्या स्वच्छता मोहिम राबवावी.
- याशिवाय कपाशिचा खोडवा ठेवू नये. कपाशिच्या शेतातल्या तणाचाही नाश करावा. बांधाची स्वच्छता करावी.अशा शेतात उन्हाळ्यात भेंडी, अंबाडीसारखी पिके मुळीच घेवु नयेत.अशा प्रकारे सर्व प्रकारची स्वच्छता केल्यानंतर त्या क्षेत्राची खोल नांगरट लगेच करावी. म्हणजे नांगरटीमुळे उन्हाळाभर ती तापते त्यामुळे जमिनीत सुप्तावस्थेत पडून राहिलेले किडी रोगाचे जीवाणु अवशेष उन्हामुळे मरून जातील.
source : krushinama