तांबडा भोपळा लागवड
11-05-2023
तांबडा भोपळा लागवड
तांबडा भोपळा हे वेलवर्गीय फळभाजी पैकी एक महत्त्वाचे पीक आहे. उपवासाच्या दिवसात याला विशेष महत्त्व आहे. विशेषत: पितृपंधरवडा व नवरात्रीतील उपवासासाठी तांबड्या भोपळ्याला भरपूर मागणी असते. हा कालावधी साधून भोपळ्याची लागवड केल्यास त्यापासून चांगला आर्थिक लाभ मिळतो. म्हणजेच नेमके नवरात्र व पितृपंधरवड्यात मागणीच्या वेळी भोपळा मार्केटमध्ये येणे आवश्यक असते.
हवामान व जमीन :
भोपळा पिकाच्या वाढीसाठी उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. त्यामुळे तांबडा भोपळा खरीप व उन्हाळी हंगामात घेतला जातो. या पिकाच्या वाढीसाठी 18 अंश से. ते 29 अंश से. तापमान, भरपूर व स्वच्छ सूर्यप्रकाश पोषक असतो. खरीपात जास्त पाऊसामुळे वेलीवर केवडा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. जास्त थंडीमुळे फळधारणा व्यवस्थित होत नाही.
तांबडा भोपळा हलक्या ते मध्यम चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत उत्तम पोसतो. तसेच नदीकाठच्या व नदीतील रेताड जमिनीत ही चांगल्या प्रकारे येतो. मात्र चोपण, क्षारपड जमिनीत येत नाही. जमिनीचा सामू 6 ते 7 पर्यंत असल्यास अशा जमिनीत भोपळा उपयुक्त ठरतो. उन्हाळी हंगामात हलक्या जमिनीत भोपळा घेऊ नये कारण पाण्याचा ताप पडल्यावर फळे तडकण्याचा संभव असतो.
रानबांधणी :
जमिनीची खोल नांगरट करावी. नांगरण्यापूर्वी किंवा शेवटच्या कुळवणीअगोदर प्रति अडिच एकरच्या जवळपास 5 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळणे. जमिनीत सुत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दोन टन निंबोळी पेंड मिसळावी. पुर्नमशागत करून जमीन चांगली पोतावर आल्यावर दोन ओळीत 2 ते अडीच मीटर अंतर ठेवून रूंद सरी पाडावी. सरीमध्ये एक ते दीड मीटर दोन रोपांमध्ये अंतर ठेवून आळी तयार करावीत. आळी तयार करताना त्यामध्ये एक पाटी शेणखत टाकून हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश सर्व आळ्यात विभागून टाकावे.
लागवड व हंगाम :
खरीप हंगामासाठी जून-जुलै तर उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारी- मार्चमध्ये लागवड करावी. लागवड बी टोकण पध्दतीने करतात. सरीमध्ये तयार केलेल्या आळयात 2 ते 3 बिया टाकाव्यात. बी टोकण्यापूर्वी बाविष्टीनची बीजप्रक्रिया व त्यानंतर ॲझोटॉब व स्फुरद उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणू संवर्धन रेवतांची प्रक्रिया करावी. बी लागवडीपूर्वी ओल्या फडक्यात 24 ते 48 तास बांधुन ठेवल्यावर नंतर लागवड केल्यास उगवण उत्तम होते.
सुधारीत जाती:
1. अर्का सुर्यमुखी : या जातीची फळे लहान, दोन्ही बाजूंनी चपटी असून फळांचा रंग नारंगी पिवळसर असून त्यावर पांढरे चट्टे असतात. गर ठळक असून एका फळाचे वजन एक किलोपर्यंत भरते. साधारण फळे 100 ते 125 दिवसात पक्व होतात. या जातीचे हेक्टरी 33 टन उत्पादन मिळते.
2. पुसा : या जातीची फळे फिक्कट रंगाची व गोल आकाराची असून गर जाड पिवळ्या रंगाचा असतो. फळाचे सरासरी वजन 5 किलो भरते. जवळ जवळ 100 दिवसात ही जात पक्व होत व हेक्टरी 23 टन उत्पन्न मिळते.
3. अर्का चंदन : या जातीचे फळ आकाराने चपटी व दोन्ही बाजूला थोडी दबलेली दिसतात. फळाचा रंग फिक्कट तांबडा असून वजन 2 ते 3 किलो भरते. या जातीत कॅरोटीनचे प्रमाण जास्त असून फळाची चव गोड, स्वादीष्ट व सुगंधी असते. या फळांची साठवण क्षमता ही चांगली असून याचे हेक्टरी 33 ते 34 टनापर्यंत उत्पन्न मिळते.
4. को-1: ही उशिरा येणारी जात असून या जातीचा पक्वतेचा कालावधी 175 दिवस असून फळाचे वजन सरासरी 7 ते 8 किलोपर्यंत भरते. तसेच हेक्टरी सरासरी उत्पन्न 25 ते 35 टनापर्यंत मिळते.
5. को – 2 : ही जात लवकर म्हणजे 135 दिवसात तयार होते. याची फळे आकाराने लहान असून फळाचे सरासरी वजन दोन किलो भरते. हेक्टरी 22 ते 25 टन उत्पादन मिळते.
शिवाय तांबड्या भोपळ्यामध्ये सी एम – 14, पुसा विकास, आय.एच.आर. 83-1-1 या जाती आहेत.
सीएम -14 जातीची ठळक वैशिष्ट्ये :
या जातीची फळे गोल असून ती दोन्ही बाजूनी चपटी असतात. फळांचा रंग लालसर पिवळा असून फळे आकर्षक, वजनाने हलकी असतात. फळांचे वजन सरासरी 3 किलो असून त्यात गराचे भरपूर प्रमाण असते. या जातीची लागवड उन्हाळी हंगामात करता येते. पण पीक खरीप हंगामात अधिक चांगले येते. ही जात सरासरी 400 क्विंटल प्रती हेक्टरी उत्पन्न देते.
आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन :
बी उगवण झाल्यावर एका आळ्यात एकच रोप ठेवून बाकी रोपे उपटून काढावीत. खुरपणी करून आळी स्वच्छ करावीत. व नत्रांची दुसरी मात्रा द्यावी. वेल दोन ओळीच्या मधल्या जमिनीवर पसरावेत. पाटामध्ये वेल वाढू देऊ नयेत. पाण्यामुळे फळे खराब होणार नाहीत. याची काळजी घ्यावी. पिकाची उगवण होईपर्यंत बेताचे हलके पाणी द्यावे. त्यानंतर खरीपात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. उन्हाळ्यात 6 ते 7 दिवसांनी पाणी द्यावे. जमिनीचा प्रकार व पिकाच्या वाढीची अवस्था यानुसार पाणी पाण्यातील अंतर ठेवावे.
पीक संरक्षण :
तांबड्या भोपळ्यावर प्रामुख्याने लाल भुंगेरे, फळमाशी व सुत्रकृमींचा प्रादुर्भाव दिसून येतो. लाल भुंगेरे लहान पिकास होतो. भुंगेरे पाने कुरतुडून खातात तर फळमाशी फळांच्या सालीखाली अंडी घालून त्यातून अळ्या निर्माण करते. या अशा अळ्या फळातील गर खातात व फळे खराब करतात. सुत्रकृमी मुळातील रस शोषण करतात व त्यामुळे मुळावर गाठी होऊन पिकाची वाढ खुंटते.
काढणी व उत्पन्न :
तांबडा भोपळा पुर्ण पक्व झाल्यावर काढणी करतात. फळ काढणीत आलेली लक्षणे दिसू लागली की फळाची तोडणी करावी. पक्व झालेली फळे रंग बदलून पिवळसर होतात. तसेच देठ सूकलेले दिसतात. पक्व होण्यासाठी सरासरी 160 ते 180 दिवस लागतात. फळे काढणी करताना ती देठासह करावी आणि बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत.वरीलप्रमाणे योग्य व्यवस्थापन करून तांबड्या भोपळ्याचे सरासरी 350 ते 400 क्विंटलपर्यंत प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते.
source : nisargacrop