उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांचे नियोजन कसे कराल? वाचा सविस्तर
16-01-2023
उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांचे नियोजन कसे कराल? वाचा सविस्तर
महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, चवळी, घेवडा, कोथिंबीर, कांदापात, मेथी, राजगिरा, माठ, पोकळा यांचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळी हंगामातील या भाज्यांच्या लागवडीचे नियोजन, काळजी यांची माहिती घेऊ.
उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड करताना घ्यावयाची काळजी
- लागवडीसाठी प्रामुख्याने अधिक सेंद्रिय कर्ब व पाणी साठवून ठेवणारी, परंतु उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीची निवड करावी.
- जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा.
- कोरडे व उष्ण वाऱ्यापासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूंनी शेवरीसारख्या पिकाची अथवा वाफ्याभोवती मक्याची दाट लागवड करावी.
- रोगप्रतिकारक जातींची निवड, सिंचनाचे व्यवस्थापन, रासायनिक व सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन याकडे लक्ष द्यावे.
- फळांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी. स्वच्छ ठिकाणी प्रतवारी व पॅकिंग, साठवण व योग्य वेळी मालवाहतूक (पहाटेच्या वेळी) या बाबींचा नियोजनपूर्वक एकत्रित वापर करावा. त्यामुळे उत्तम प्रतीचा भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोचविणे शक्य होईल.
भेंडी, गवार
उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या भेंडी व गवार या भाज्यांना मागणीसुद्धा भरपूर असते. भेंडी लागवड करतेवेळी हळद्या रोगास प्रतिकारक्षम परभणी क्रांती, अर्क अनामिका, पुसा सवानी, पंजाब पद्मनी या वाणाची निवड करावी. गवारीसाठी पुसा सदाबहार, पुसा नवबहार यांसारख्या भरपूर उत्पादन देणाऱ्या जातीची निवड करावी. उन्हाळ्यात या पिकांना पाणी वेळेवर द्यावे. या पिकांची तोडणी संध्याकाळच्या वेळेस (५ नंतर) करावी.
वेलवर्गीय भाजीपाला पिके
वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका व घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश आहे. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे ही कामे महत्त्वाची आहेत. दर्जेदार, अधिक उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीने आधार द्यावा.
कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिके असून, वेलींना चांगला आधार मिळाला तर त्यांची वाढ चांगली होते. आधारासाठी मंडप किंवा ताटी पद्धत वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यामुळे फळे जमिनीपासून ४ ते ६ फूट उंचीवर वाढतात.
फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाशसारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो. फळांची तोडणी, कीडनाशकांची फवारणी ही कामे सुलभ होतात.
दुधी भोपळा
दुधी भोपळा मंडपावर घेतल्यास जमिनीवर घेतलेल्या पिकापेक्षा उत्पादनामध्ये अडीच ते तीन पट वाढ होते. मंडप पद्धतीमुळे फवारणी सुलभ होते. कारली, दोडका व घोसाळी या पिकांना ताटी पद्धत वापरणे सोईस्कर असते. वेलवर्गीय पिकांना वेळच्या वेळी पाणी द्यावे. वेलांना वळण व आधार दिल्यानंतर पिकास मातीची भर द्यावी. गरजेप्रमाणे खत द्यावे.
मिरची, वांगी आणि टोमॅटो या तिन्ही पिकांची रोपे गादी वाफ्यावर करावी. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादीवाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड केली जाते. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांचा प्रसार करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी दक्ष राहावे.
मिरची
मिरचीची लागवड करतेवेळी तिचे उत्पादन मार्च ते मे महिन्यात बाजारात येईल असे करावे. लागवडीसाठी वाण हा उंची शाकीय वाढणारा, फांद्या जास्त असणारा, पोपटी ते गर्द हिरव्या रंगाच्या लांब मिरच्यांचा असावा. मिरचीमध्ये फुले ज्योती या जातीमध्ये मिरच्या झुपक्यात येतात व झाडावर दाट पाने असतात.
वांगी
वांगी या पिकासाठी उंच व डेरेदार वाढ असणारा काटेरी देठ, जांभळ्या, पांढऱ्या व हिरव्या रंगाची छटा एकत्र असणाऱ्या चकाकीदार गोल किंवा उभट गोल फळे येणाऱ्या वाणाची निवड करावी. वांग्यामध्ये रंग व आकार यानुसार भागनिहाय विविधता आढळून येते. वांगी पिकास शेणखत व रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा. उन्हाळी हंगामात योग्य वेळी पाणी द्यावे. फळांची तोडणी ५-६ दिवसांनी करावी. चांगली, एकसारखी फळे बाजारात पाठवावीत.
टोमॅटो
टोमॅटो पिकासाठी वाण निवडताना प्रामुख्याने तो वाण अधिक पाने असणारा, उष्ण तापमानात फळधारणा होणारा, लीफ कर्ल व्हायरस या रोगास सहनशील व फळांना तडे न जाणारा निवडावा. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी. कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी होते.
कांदापात
कांदापात महाशिवरात्रीस कांद्याची रोपे टाकून त्याची लागवड गुढीपाडव्यापर्यंत करावी. उन्हाळ्यात व आषाढी एकादशीपर्यंत कांद्याच्या पातीचे पैसे होतात.
कोथिंबीर
कोथिंबिरीच्या पिकास कोरडे हवामान मानवते. उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबिरीचे पीक कमी कालावधीत चांगले पैसे देऊन जाते. कोथिंबीर पिकाची लागवड करताना वाफे तयार करावेत. दर आठ दिवसाच्या अंतराने कोथिंबिरीची लागवड करावी.
राजगिरा, पोकळा, माठ, मेथी उन्हाळी भाजीपाल्यामध्ये पालेभाज्या महत्त्वाच्या आहेत. पालेभाज्या आपल्या आहारातील खनिजे, क्षार आणि जीवनसत्त्वाचा पुरवठा करणारे अगदी स्वस्त आणि सहजसुलभ नैसर्गिक स्रोत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पालेभाज्या या अल्प भांडवल, कमी क्षेत्रात, कमी वेळेत उत्पादन देतात.
पालेभाज्या लागवडीसाठी पाण्याचा हमखास, सलग पुरवठा, बाजारपेठ जवळ असणे व वाहतुकीची चांगली सोय असणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने राजगिरा, पोकळा, माठ, मेथी या पालेभाज्या घेतल्या जातात.
भरत तांबोळकर, ९८२३८२८६४५ (सहायक प्राध्यापक, उद्यान विद्या विभाग, सौ. के. एस. के. कृषी महाविद्यालय बीड.)
source : agrowon