मेथी लागवडीची संपूर्ण माहिती
06-02-2023
मेथी लागवडीची संपूर्ण माहिती
दैनंदिन आहारामध्ये मेथी या पालेभाजीचा वापर तुम्ही केलाच असेल. मेथी पिक हे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. मेथी हे पालेभाज्यातील महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी आहे. दैनंदिन आहारात मेथीचा वापर आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे या पिकाला वर्षभर चांगली मागणी असते. या पिकाची लागवड करून चांगला नफा मिळवता येतो. आज आपण मेथी लागवड माहिती बघणार आहोत.
जमीनीची निवड :
मेथी हे कमी कालावधीचे पीक आहे. त्यामुळे योग्य जमिनीची निवड आवश्यक आहे. मेथी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते काळी आणि पाण्याचा योग्य जमीन लागते. चुनखडीच्या तसेच पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत मेथी पीक चांगले येत नाही.
लागवडीचा हंगाम :
मेथी या पिकाची लागवड वर्षभर करता येते. पण पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास मेथी पिकात मर होते. तसेच उन्हाळ्यात जास्त उन्हामुळे मेथीची वाढ कमी होते . त्यामुळे थंडीच्या सुरुवातीला ऑक्टोम्बर महिन्यात आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला फेब्रुवारी महिन्यात मेथी पिकाची लागवड करणे योग्य राहते आणि या काळात लागवड केलेल्या मेथीला बाजारभाव पण योग्य मिळतो. भाजीचा सतत पुरवठा होत राहावा यासाठी टप्प्या-टप्याने मेथी पिकाची लागवड करून वर्षभर मेथी पिकाची उपलब्धता करता येऊ शकते.
जमिनीची मशागत :
लागवड करण्याआधी जमिनीची चांगली आडवी उभी नांगरट करून घ्यावी. नांगरणी नंतर रोटरच्या मदतीने जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
लागवड अंतर :
मेथी या पिकाची दोन प्रकारे लागवड करता येते.
मुख्य पीक म्हणून आणि आंतरपीक म्हणून . मुख्य पीक म्हणून लागवड करायची असल्यास तीन मिटर बाय दोन मीटर च्या सपाट वाफ्यामध्ये लागवड करतात. दोन ओळींमध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर चे अंतर ठेवून मेथीचे बी फेकून लागवड करतात.
तसेच आंतरपीक म्हणून मेथी पिकाची लागवड करायची असल्यास मुख्य पिकातील मोकळ्या जागेत असणाऱ्या वीस ते तीन सेंटीमीटर जागेत लागवड करतात.
बियाणांचे प्रमाण आणि बीजप्रक्रिया :
मेथी पिकाच्या मुख्य पीक म्हणून एक हेक्टर लागवडीसाठी पंचवीस ते तीन किलो बियाणे लागते. तसेच आंतरपीक घेताना आवश्यकतेनुसार बियाण्यांचे प्रमाण घ्यावे. बियाणे पेरताना एकसारखे आणि पातळ सोडावे. बिजप्रक्रिया करताना बुरशीनाशक ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बियाण्यास चोळावे.
सुधारित जाती :
फुले कस्तुरी : फुले कस्तुरी हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संशोधित करण्यात आले आहे. या वाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या वाणाला जास्त फुटवे असतात आणि जास्त उत्पादन क्षमता आहे. हे वाण मर आणि नागअलीळा प्रतिकूल वाण आहे.
या मेथीची उगवण लागवड केल्यावर सात ते आठ दिवसात होते.
कस्तुरी सिलेक्शन : कस्तुरी सिलेक्शन हे वाण भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे संशोधित करण्यात आले आहे.हे वाण खायला चविष्ट असते. या वाणाची पाने गोलाकार आणि हिरवी असतात. या वाणाची रोपे लहान आणि नाजूक असल्याने या वाणाला बाजारात चांगली मागणी असते.या मेथीची उगवण लागवड केल्यावर तीन ते चार दिवसात होते.
आंतर मशागत :
कमी कालावधीचे पीक असल्याने मेथी पिकामध्ये जास्त आंतरमशागतीची गरज नसते. तण व्यवस्थापन करणे आवश्यक असते. लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर खुरपणी करून घ्यावी. मेथी पिकामध्ये तण वाढू देऊ नये.
खते आणि फवारणी :
मेथी पिकाला सुरुवातीला २० किलो नत्र आणि नंतर खुरपणी झाल्यानंतर २० किलो नत्र हेक्टरी या प्रमाणात द्यावे. यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. तसेच पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी दहा लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया मिसळून त्याची फवारणी करावी. यामुळे उत्पादनात वाढ होते.
मेथी या पिकावर जास्त रोगांचा पादुर्भाव होत नाही. या पिकावर प्रामुख्याने पाने खाणारी अळी (लीप मायनर) आणि मावा या किडींचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो . मावा किड काळ्या रंगाची असते. मावा कीड पानाच्या खालच्या भागावर आणि शेंड्यावरून मोठ्या प्रमाणात पानातील रस शोषून घेते. त्यामुळे रोपे खराब होऊन रोपांची प्रत खराब होते. पाने खाणारी ही पानावरील रस शोषून घेत वेडीवाकडी पुढे पुढे जाते. त्यामुळे पानावर पांढरया रंगाच्या वेड्यावाकड्या रेषा दिसतात आणि रोपाची प्रत खराब होते.
किडीच्या नियंत्रणासाठी पीक लहान अवस्थेत असताना पिकावर निंबोळी अर्काची आणि डायमियोट ची फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन :
मेथी पिकाला नियमित पाणी द्यावे. मेथी पिकाला पाण्याची जास्त आवश्यकता असते. मेथीचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी आणि भाजीच्या दर्जेदार कॉलिटी साठी मेथी पिकाला चार ते पाच दिवसांनी पाणी द्यावे. मेथी पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकाला पाण्याचा ताण पडल्यास पिकाची वाढ कमी होऊन उत्पादनावर परिणाम होतो.
मेथी या पिकाचे योग्य नियोजन केले तर या पिकातून योग्य नफा मिळवता येतो.
महत्त्वाचे -
आपल्याला मेथीची लागवड करायची आहे आणि आपल्याला मेथीच्या बियाण्याची गरज आहे, तर तुम्ही कृषी क्रांती या आपल्या हक्काच्या वेबसाईट वर जाऊन बियाण्याच्या विक्रेत्यांशी संपर्क करू शकता आणि बियाणे विकत घेऊ शकता. तसेच जर तुमची मेथी तुम्हाला विकायची आहे तर कृषी क्रांती वर तुम्ही जाहिरात करा, लगेच तुम्हाला खरेदी दारांचे फोने यायला सुरुवात होईल आणि आपला माल चांगल्या भावात विकला जाईल.
source : krushimaharashtra