खरीप कांदा रोपवाटिका
26-05-2023
खरीप कांदा रोपवाटिका
साधारणपणे मे-जून महिन्यात बी पेरून जुलै-ऑगस्ट महिन्यात कांदा रोपांची लागवड करावी. हा कांदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात काढणीस तयार होतो. एक एकर क्षेत्रावर लागवडीकरिता रोपांच्या उपलब्धतेसाठी सुमारे २ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी.
त्यासाठी २-२.८ किलो बियाणे लागते. रोपवाटिकेसाठी जमीन तयार करताना प्रथम खोल नांगरट करावी. त्यामुळे कीटकांचे कोष व तणांच्या बिया सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात. वाफे तयार करण्यापूर्वी पूर्वीच्या पिकाची धसकटे, काडीकचरा, तण आणि दगड काढून टाकावे. दोन क्विंटल चांगले कुजलेले शेणखत घालावे. मर रोगाचे नियंत्रण करून निरोगी रोपे मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५०० ग्रॅम प्रति २ क्विंटल कुजलेल्या शेणखतात मिसळून वापर करावा. गादीवाफे १० ते १५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब तयार करावेत. तणांच्या बंदोबस्तासाठी पेंडीमिथॅलीन २ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे
मातीतून पसरणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी नत्र १.६ किलो, स्फुरद ४०० किलो, पालाश ४०० ग्रॅम प्रति २०० वर्ग मीटर क्षेत्र या प्रमाणात खतमात्रा द्यावी.बियाण्याची लागवड ओळींमध्ये ५ ते ७.५ सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. सिंचनाकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते
कांदा-
खरीप कांदा रोपवाटिकेमध्ये पेरणीनंतर २० दिवसांनी खुरपणी करावी. खुरपणीनंतर दोन गुंठे (२०० वर्ग मीटर) क्षेत्रासाठी ८०० ग्रॅम नत्र द्यावे. पाणी देताना ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. प्रत्येक वाफ्यामध्ये ठिबक सिंचनासाठी इनलाइन ड्रीपर असणाऱ्या १६ मि.मी. व्यासाच्या लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रीपरमधील अंतर ३० ते ५० सें.मी. असावे. त्यांची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ताशी ४ लिटर असावी. तुषार सिंचन पद्धतीसाठी दोन लॅटरलमध्ये ६ मीटर इतके अंतर ठेवून, ताशी १३५ लिटर पाणी फेकण्याची क्षमता असलेले नोझल वापरावेत.
रोपवाटिकेतील कीड व रोग नियंत्रण
- फूलकिडे (थ्रीप्स) - फवारणी प्रति लिटर पाणी
- फिप्रोनिल १ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.लि. किंवा कार्बोसल्फान २ मि.लि.
- मर रोग व मातीतून पसरणाऱ्या रोगांसाठी –
- मेटॅलॅक्झिल + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्रावण करून रोपांच्या ओळीत ओतावे.
- करपा रोग - फवारणी प्रति लिटर पाणी
- मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल १ मि.लि.
- फवारणीवेळी ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्टीकर वापरावे.
कृषी सल्ला कांदा
- खरीप कांदा रोपांची पुनर्लागवड
खरिपात रोपे ४० ते ४५ दिवसांत तयार होतात. रोप उपटण्याच्या २ ते ३ दिवस आधी थोड्या प्रमाणात पाणी द्यावे. पानांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून काढावा. काळा करपा, तपकिरी करपा, मर या बुरशीजन्य रोगांचा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता रोपांची मुळे कार्बेन्डाझीम १ ग्रॅम व कार्बोसल्फॉन २ मि.लि. प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये दोन तास बुडवून नंतरच लागवड करावी. पुनर्लागवडीपूर्वी किंवा पुनर्लागवडीच्या वेळी ऑक्सिफ्लोरफेन (२३.५ ईसी) १.५ मि.लि. किंवा पेंडीमेथॅलीन (३० ईसी) ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात तणनाशकांचा वापर करावा. दोन ओळींमध्ये १५ सें.मी. व दोन रोपांमध्ये १० सें.मी. अंतर ठेवून १२० सें.मी. रुंद, ४० ते ६० मीटर लांब व १५ सें.मी. उंच गादीवाफ्यांवर रोपांची पुनर्लागण करावी. पुनर्लागवडीवेळी व त्यानंतर तीन दिवसांनी पाणी द्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.