राज्यात सर्वदूर पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
20-08-2024
Maharashtra Rain Alert : राज्यात सर्वदूर पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
Rain Update : आज (ता. २०) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे
राज्याच्या विविध भागात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून उन्हाचा चटका आणि उकाड्या पाठोपाठ दुपारनंतर वळीव स्वरूपाचा पाऊस दणका देत आहे.
आज (ता. २०) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण बांगलादेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगरपासून, दिल्ली, कानपूर, देहरी, बंकुरा, कमी दाबाचे केंद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. रायलसिमा आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून तमिळनाडू, कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.
सोमवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३५ अंश तापमानाची नोंद झाली. सकाळपासून वाढलेल्या उकाड्यानंतर दुपारी जोरदार सरी कोसळत आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाने तडाखा दिला आहे.
आज (ता. २०) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, पुणे, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.