म्हशींमधील दुग्धज्वराकडे होत आहे दुर्लक्ष
21-12-2022
म्हशींमधील दुग्धज्वराकडे होत आहे दुर्लक्ष
दुग्धज्वर हा आजार प्रामुख्याने संकरित आणि उच्च दुग्धउत्पादकता असणाऱ्या विदेशी गायींमध्ये आढळून येणारा एक महत्त्वाचा दुग्ध उत्पादकतेशी निगडित आजार आहे. हा आजार प्रामुख्याने विण्यापूर्वी काही दिवस (३%), विताना (६%), विल्यानंतर (९१%) रक्तातील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होतो. व्यायलेल्या गायींमध्ये पहिल्या २४ तासात या आजाराचा प्रादुर्भाव जवळपास ७५ टक्के, २४-४८ तासांत १२ टक्के तर ४८-७२ तासांत ४ टक्के एवढा आढळून येतो. जरी हा आजार जास्त दूध उत्पादन असणाऱ्या संकरित गायींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असला तरीही या आजाराचा प्रादुर्भाव काही प्रमाणात देशी गोवंशात तर मोठ्या प्रमाणात दुधाळ म्हशींमध्येही आढळून येत आहे.
दृष्य दुग्धज्वर आजाराबरोबर, दुधाळ जनावरांमध्ये रक्तातील कॅल्शिअम कमी होऊन सुप्त प्रकारची कॅल्शिअमची कमतरता आढळून येते. उच्च दुग्धक्षमता असणाऱ्या संकरित आणि विदेशी गायींमध्ये दुग्धज्वर आजार झाल्यास त्या वेतामध्ये गायी डाऊनर काऊ सिंड्रोम, कितनबाधा, पोटाचा कप्पा (अबोम्याजम) विस्थापित होणे, कासदाह, दुग्ध उत्पादकता घटणे, प्रजननाशी निगडित व्याधी जडणे (अवघड प्रसूती, मायांग बाहेर येणे, वार न पडणे, गर्भाशयाचा दाह इत्यादी) अशा विविध आजारांना बळी पडण्याचे प्रमाण वाढते.
आजाराची वैशिष्टे
- हा आजार प्रामुख्याने ३ ते ५ या वेतामध्ये आणि ६ ते १० वर्ष वयोगटामध्ये मराठवाडी जातीच्या म्हशींमध्ये जास्त प्रमाणात आढळून आला आहे.
- मुऱ्हा तसेच इतर म्हशींच्या जातीत या आजाराचा प्रादुर्भाव आढळून येतो.
- या आजाराचा मुख्य प्रादुर्भाव व्यायल्यानंतर २ ते ५ दिवस या कालावधीमध्ये आढळून येतो तर काही म्हशींमध्ये हा आजार विण्याआगोदर काही काळ तर काही प्रमाणात व्यायल्यानंतर २ महिन्यांपर्यंतच्या कालावधीपर्यंतही आढळून येतो.
- गाभणकाळाच्या शेवटच्या टप्प्यात म्हशींची लांब अंतरावर वाहतूक केल्यास, वातावरण व प्रवासाच्या ताणामुळे अशा म्हशींमध्ये दुग्धज्वर आजार होण्याची शक्यता वाढते.
- हा आजार अधिक दुग्ध उत्पादन असणाऱ्या म्हशींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो.
- शरीर व दुग्धउत्पादनासाठी आवश्यक कॅल्शिअमचा पुरवठा आहारातून न झाल्यास दुग्धज्वर उद्भवतो.
- आहारातील बदलामुळे काही वेळा अपचन (आम्लीय किंवा अल्कधर्मी) झाल्यासही रक्तातील कॅल्शिअम कमी होऊन दुधाळ म्हशींमध्ये दुय्यम प्रकारचा दुग्धज्वर आजार आढळून येतो.
आजाराची लक्षणे
दुग्धज्वर आजाराने ग्रस्त म्हशींमध्ये आजाराची लक्षणे प्रामुख्याने तीन टप्प्यात दिसून येतात.
पहिला टप्पा
- बाधित जनावर काही काळासाठी अतिसंवेदनशील बनते,
- चालण्या-फिरण्यासाठी निरुत्साही बनते.
- त्यानंतर खाणे-पिणे मंदावते, दुग्धउत्पादन घटते.
- मागील पायांमध्ये जडत्व येते, चालताना जनावर काही वेळा अडखळून पडते,
- तसेच जनावरांत भीतीसदृश भाव दिसून येतात जसे की, डोके हलविणे, जीभ बाहेर काढणे, दातांचा आवाज करणे इत्यादी.
- ही लक्षणे खूप कमी कालावधीसाठी दिसून येत असल्याने बऱ्याचवेळा ती पशुपालाकाच्या निदर्शनासही येत नाहीत.
- अशी जनावरे आजाराच्या दुसऱ्या टप्प्यात जातात.
- या टप्यात म्हशींच्या श्वसनाचा वेग, हृदयाचे ठोके व शरीराचे तापमान हे सर्वसाधारण असते.
दुसरा टप्पा
- बाधित म्हशींना योग्य वेळेत उपचार न भेटल्यास त्या आजाराच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतात.
- या टप्यामध्ये आजारी म्हशी अशक्तपणामुळे पोटावर बसून मान पोटाकडे वळवून सुस्थपणे बसून राहतात,
- नाकपुड्या कोरड्या पडतात, अंग थंड पडायला सुरवात होते.
- शरीराचे तापमान कमी होण्यास (९६.८-१०० अंश फॅरानाईट) सुरवात होते. श्वसनाचा वेग व नाडीचे ठोके वाढतात.
- शेण व लघवी बंद होणे, डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या व स्थिर होणे, डोळे कोरडे पडतात, रवंथ बंद होते व पोट फुगते.
- हा आजार विण्यापूर्वी किंवा विताना झाल्यास म्हशींमध्ये विण्याच्या प्रक्रियेतील दुसरा टप्पा पूर्ण होण्यास विलंब लागतो.
- मायांग बाहेर येते. पोटाची तसेच अन्ननलिकेची हालचाल मंदावल्याने दुसऱ्या टप्प्यातील बाधित म्हशींमध्ये पोटफुगीसुद्धा आढळून येते.
तिसरा टप्पा
- दुग्धज्वर आजाराचा तिसरा टप्पा तीव्र असून यामध्ये बाधित म्हशी अशक्तपणामुळे आडव्या पडतात,
- शरीर एकदम थंड पडते (९६ ते ९८ अंश फ्यॅरानाईट),
- डोळ्याला हात लावला असता जनावर प्रतिसाद दाखवत नाही.
- तत्काळ उपचार न झाल्यास असे जनावर बेशुद्ध पडून काही वेळात दगावते.
आजाराचा उपचार
- पशुवैद्यकाच्या मदतीने आजारी म्हशींमध्ये साधारणपणे ४५० मिलि कॅल्शिअमचे सलाईन दिल्यास जनावर तत्काळ प्रतिसाद देते.
- आजारातून बाहेर पडते.
- आजारासाठी करावयाचा उपचार हा काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे, कारण
- कॅल्शिअम सलाईन अयोग्य वापरामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि काही वेळा जनावर दगावण्याची शक्यता असते.
- कॅल्शिअम सलाईन देणे सुरु केल्यानंतर लगेचच म्हशी उपचारास प्रतिसाद दाखवतात.
- ज्यामध्ये स्नायूंमध्ये ऊर्जा निर्माण होते, स्नायूंमध्ये थरथर दिसून येते आणि आडवे पडलेले जनावर बसण्याचा प्रयत्न करते तर बसलेले जनावर उठून उभे राहते,
- नाकपुड्या ओलसर होतात आणि उपचार पूर्ण होताच पोटफुगी कमी होऊन जनावरे शेण-लघवी टाकतात.
दुग्धज्वर आजाराचा प्रतिबंध
- दुभत्या तसेच गाभणकाळाच्या शेवटच्या टप्प्यातील म्हशींना थंडीपासून संरक्षण द्यावे.
- त्यांना उबदार निवारा उपलब्ध करून द्यावा.
- गाभण म्हशींना काही प्रमाणात चालण्याचा हलका व्यायाम नियमितपणे देण्यात यावा जेणेकरून पोटाची कार्यक्षमता अबाधित राहील.
- हाडातून रक्तामध्ये कॅल्शिअम शोषण्याची प्रक्रिया उत्तेजित होईल.
- गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात आणि विल्यानंतर सुरवातीचा आठवडा या कालावधीमध्ये जनावरांची लांब पल्ल्याची वाहतूक करू नये.
- या आजाराचा जास्तीत-जास्त प्रादुर्भाव हा विण्यापुर्वीचा काही काळ आणि व्यायल्यानंतरचा काही काळ असल्याने विण्यापूर्वी ४८ तास आणि विल्यानंतर ४८ तास म्हशी चांगल्या देखरीखीखाली ठेवाव्यात.
- विण्यापूर्वी २-३ आठवडे अगोदर आहारातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी करावे, जेणेकरून हाडातील कॅल्शिअम शोषण करण्याची प्रक्रिया उत्तेजित राहील आणि दुग्धज्वर आजारास आळा घालता येईल.
- विण्यापूर्वी साधारणपणे एक आठवडा अगोदर इंजेक्शनद्वारे (१० लाख युनिट) किंवा आहारातून (१० ते २० लाख युनिट दररोज ७ दिवस विण्यापूर्वी) ड जीवनसत्त्व देण्यात यावे.
- आतड्यातून तसेच हाडातून कॅल्शिअमचे शोषण प्रक्रिया अबाधित राखण्यासाठी आहारात अमोनिअम क्लोराईड, कॅल्शिअम क्लोराईड, कॅल्शिअम सल्फेट इत्यादी क्षारयुक्त बाजारातील विविध उत्पादने वापरण्यात यावीत.
टीप : अशाप्रकारे शेतीविषयक महत्त्वाची माहिती, हवामान अंदाज तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या whatsapp ग्रुपला जोडले जा ➡ येथे क्लिक करा
source : agrowon