कृषी विभागाचे नवीन अपडेट!
08-07-2023
कृषी विभागाचे नवीन अपडेट! पेरणीसाठी घाई करू नका, चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी सुरु करा…
दमदार पाऊस (Rain) व जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा. त्यासाठी घाई करू नका, असा सल्ला उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी रियाज मुल्ला यांनी विंगसह परिसरातील शेतकऱ्यांना दिला.
खरीप हंगामाच्या (Kharif Season) पार्श्वभूमीवर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री. मुल्ला व सहकाऱ्यांनी विंग व कोळे विभागात भेट दिली. शेतीची पाहणी केली.
दरम्यान, जमिनीत खड्डा काढून ओलाव्याचा स्तर तपासला. पुरेशी ओल नसल्याचे निदर्शनास येताच अशा घातीवर पेरणी केल्यास बियाणे उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते म्हणाले, कृषी विभागाला आणि बियाण्याला दोष देण्यापेक्षा पेरणीसाठी पुरेशी ओल निर्माण होऊ द्या. त्यासाठी दमदार व पुरेशा पावसाची वाट बघा.
किमान सात ते दहा इंच ओल जाणे अपेक्षित आहे. मगच पेरणीची कामे हाती घ्या. जानेवारी फेब्रुवारी दरम्यान, विंग परिसरात वळीव झालेले नाहीत. त्यातच जून कोरडा गेला आहे. अधूनमधून रिपरिप असली तरी पेरणीस योग्य वाफसा तयार झालेला नाही. त्यासाठी घाई करू नका, ढेबेवाडी मंडलकृषी अधिकारी चंद्रकांत कोळी, कोळे कृषी सहायक संतोष काळे, कृषी सहायक आर. एस. भांदिर्गे यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते.