शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? असा करा कायदेशीर अर्ज ; मिळणार हक्काचा रस्ता…
20-01-2023
शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? असा करा कायदेशीर अर्ज ; मिळणार हक्काचा रस्ता…
शेती करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी कधी तर शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो. मग हा हक्काचा रस्ता आपला कसा होणार या विचारात शेतकरी गुरफटून जातो.
ज्या प्रमाणात शेतामध्ये उत्पादन महत्वाचे आहे अगदी त्याप्रमाणेच शेत रस्ता देखील महत्वाचा असतो. त्यामुळे कायदेशीर रस्ता नेमका करायचा कसा ? त्यासाठी काय करावे लागते याची माहिती पाहुया..
शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याची ही एक मोठी समस्या तर आहेच. परंतु शेतीसाठी लागणारा रस्ताही शेतकऱ्यांना मिळत नाही. या शेत रस्त्यांसाठी शेतकऱ्यांमध्ये मोठमोठे वाद होतात.
मात्र, हे वाद न घालता कायदेशीररित्या शेत रस्ता मिळू शकतो. चला तर मग कोणत्या कायद्याने रस्ता मिळवतो व त्यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेऊयात.
शेत रस्ता कायदा -
वडिलोपार्जित जमीनीची पुढे विभागणी होत जाते. यामुळे शेतीसाठी रस्त्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. याच शेत रस्त्यासाठी शेतकरी कायद्याचा आधार घेऊ शकतात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये या कायद्यांतर्गत शेतकरी रस्त्यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना तहसीलदारांकडे लिखित स्वरूपात अर्ज करावा लागतो. या अर्जात सर्व माहिती लिहिणे अनिवार्य आहे. या कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना बांधावरून रस्ता दिला जातो.
असा करा अर्ज –
कायदेशीर रस्ता तयार करण्यासाठी शेतकऱ्याला तहसीलदाराकडे लेखी स्वरूपात अर्ज करावा लागेल. शेतकऱ्याला हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो. तहसीलदार यांच्या नावाने अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर कशाच्या आधारे तुम्ही हा अर्ज करता आहे ते नमुद करायचे आहे.
त्या खालोखाल अर्जाचा विषय लिहायाचा आहे. विषयामध्ये शेतात येण्या-जाण्यासाठी जमिनिच्या बांधावरून कायमस्वरूपी मिळण्याबाबत, असा विषय नमुद करा. यानंतर अर्जदाराचे नाव आणि शेतीच्या माहिती द्यावी लागेल.
अर्जदाराची लागणारी माहिती –
अर्जदाराचे नाव, गाव, तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव असायला पाहिजे. त्याखाली अर्जादाराला आपल्या शेतीचा तपशील द्यायचा आहे. गट क्रमांक, शेतकऱ्याकडे असलेली शेती किती आहे. तसेच अर्जदाराची शेती जर सामायिक क्षेत्रात येत असेल तर त्याच्या वाटणीला किती शेती येत आहे.
यानंतर अर्जदार शेतकऱ्याच्या शेतजमिनी शेजारी कोणाकोणाची शेती आहे. त्या शेतकऱ्यांची नावं आणि पत्ता याची माहिती द्या. यामध्ये अर्जदाराच्या जमिनीच्या चारही दिशांना ज्या शेतकऱ्यांची जमिन आहे. त्यांची नावे आणि पत्ते द्यावे लागणार आहेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
- अर्जदाराचा आणि शेजारील शेतकऱ्याच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे. त्या जमिनचा कच्चा नकाशा..
- अर्जदाराचा जमिनीचा सातबारा उतारा
- शेजारील शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील
- अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसह माहिती
रस्त्याची गरज आहे का? केली जाते पाहणी –
शेजारच्या शेतकरी यांना नोटीस पाठवून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. तसेच अर्जदाराला शेत रस्त्याची खरोखरच गरज आहे काय? याचीही तहसीलदारांकडून प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून खातरजमा केली जाते. एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की, तहसीलदार शेत रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय घेतात.
तहसीलदारांच्या आदेशानंतर रस्ता दिला जातो-
तहसीलदारांनी अर्जदार शेतकऱ्याचा अर्ज मान्य केला तर, शेजारील शेतकऱ्याच्या बांधावरून अर्जदार शेतकऱ्याला रस्ता देण्यासाठीचा आदेश काढतात. यामध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे कमीतकमी नुकसान होईल, याची काळजी घेतली जाते. ८ फूट रूंदीचा रस्ता मंजूर केला जातो.
source : mieshetkari