खरीप हंगामातील कांदा लागवड भाग 1 आणि भाग 2
26-05-2023
खरीप हंगामातील कांदा लागवड भाग 1
श्री. निवृत्ती बा. पाटील, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषि विज्ञान केंद्र, वाशिम, - ९९२१००८५७५
कोरोनारोगाच्या प्रभावामुळे भाजीपाला उत्पादकांना भाजीपाल्याच्या नाशवंतपणा व विक्री व्यवस्था या मुळे खूप तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी दीर्घकाळ साठवणूक करता येईल अशी पिके निवडावी. या पैकी कांदा, लसून, लाल मिरची, बटाटा इत्यादी अश्या प्रकारची पिके निवडून भविष्यातील धोका कमी करता येऊ शकतो.
कांदा हे व्यापारी दृष्ट्या सर्वात महत्वाचे भाजीपाला पीक आहे. कांदा पिकवणाऱ्या राज्यात क्षेत्र व उत्पादन य दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. कांदा हे पिक मुख्यता तीन हंगामात म्हणजेच खरीप, लेट खरीफ (रांगडा) व रब्बी हंगामात घेण्यात येते. एकून क्षेत्रापैकी सरारारी २०% क्षेत्र हे खरीप, २०% क्षेत्र हे लेट खरीप (रांगडा) तर ६०% क्षेत्र हे रब्बी हंगामात राहते.
नोहेंबर ते मार्च महिन्यात निघणारया खरीप व लेट खरीप कांद्याला बाजारभाव चांगला मिळतो. खरीफ कांदा हा उत्तम निचऱ्याच्या हलक्या ते मध्यम जमीनीती चांगला येतो. खरीप हंगामातील कांद्याचे उत्पादन जवळपास ८० ते १०० क़्वि/एकर मिळते. उत्पादन जरी कमी असले तरी बाजारभाव चांगला मिळाल्यामुळे निव्वळ नफा चांगला राहतो. लेट खरीप कांद्याला पोषक असे हवामान मिळाल्यामुळे उत्पादन सुद्धा चांगले येते व आर्थिक दृष्टीने अधिक फायदा होतो. एकंदरीत मागणी व पुरवठा यांचा विचार केला असता खरीप व रांगडा हंगामातील कांदा उत्पादन तंत्रज्ञान हे नक्कीच शेतकऱ्याना आर्थिकदृष्ट्या परवडणारे तंत्रज्ञान ठरू शकते.
विशेषता विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून खरीफ व रांगडा हंगामातील कांद्या चे क्षेत्र नगण्य आहे. वाशिम जिल्ह्याचा विचार करता जमीन व हवामान हे अतिशय योग्य आहे.
खरीफ कांदा यशस्वीतेचे सूत्र
- योग्य जमिनीची निवड
- शिफारशीत जातीचा वापर
- रोपवाटिका व्यावस्थापन (गादी वाफा)
- पुनर्लागवड पद्धती (गादी वाफा)
- एकात्मिक अन्नद्रव्या व्यावस्थापन
- एकात्मिक कीड व रोप व्यावस्थापन
जमिनीची निवड
अती जास्त पाण्याला हे पिक संवेदनशील असल्यामुळे खरीफ हंगामात पावसाचे पाणी कमी जास्त असल्यामुळे जमीन हि उत्तम निचऱ्याची, हलकी ते मध्यम असून सामू हा ६.५ ते ७.५ असावा. पाणथळ, पाणी साचणारया जमिनी निवडू नये.
कालावधी, वाण व उत्पादन
- खरीफ हंगाम –
- पिकाचा कालावधी - मे ते ऑक्टोबर
- वाण - भीमा सुपर, भीमा रेड ऑग्री फाऊड डार्क रेड,
- बसवंत ७८० , एन-५३ , फुले समर्थ
- उत्पादकता - 15-20 टन/हे.
- रांगडा हंगाम –
- पिकाचा कालावधी - ऑगस्ट ते फेब्रुवारी
- वाण - भीमा सुपर, भीमा रेड, फुले सफेद, फुले समर्थ,
- ऑग्री फाऊड डार्क रेड, बसवंत ७८०
- उत्पादकता - 22-25 टन/हे.
खरीप हंगामातील कांदा लागवड भाग 2
श्री. निवृत्ती बा. पाटील, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषि विज्ञान केंद्र, वाशिम, - ९९२१००८५७५
रोपवाटिका व्यावस्थापन
निरोगी रोपवाटिका करून त्याची ला गवड साधली म्हणजे निम्मी लढाई जिकली असा अर्थ होतो. रोपवाटिके साठी शेतातील उंच भागावरील जागेची हलकी ते मध्यम जमिनिची निवड करावी. एक हेक्टर लागवडीसाठी १०-१२ गुंठे क्षेत्र तसेच प्रती एकरी ४-५ किलो बियाणे लागते. रोपवाटिके साठी गादी वाफा / रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा त्यासाठी १ मी रुंद, ३ मी लांब व १५ सेमी उंचीचे गादी वाफे तयार करावे. मिश्र खत (१०० ग्राम १५:१५:१५) व शेन खत (२० किलो) टाकावे. बीज प्रक्रिया करावी. उगवण पूर्व तननाशकाचा वापर करावा (स्टंप २ मिली/ली). नियमित व योग्य पाणी द्यावे. ४० -४५ दिवसात रोपे लागवडी योग्य होतात. खरीप हंगामाकरिता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बी टाकावे. सावली करिता 50 टक्के हिरवी नेट वापरावी.
पुनर्लागवड
कांदे जमिनीच्या खाली २५ सेमी पर्यंत वाढतात. उत्तम निचरयाची हलकी ते मध्यम भारी जमिनीची निवड करावी. नांगरणी व वखरणी करून शेत ढेकुळमुक्त करून २० ते २५ टन कुजलेले शेन खत टाकवे. पुनर्लागवडी करिता
रुंद वरंबा व सरी पद्धतीच अवलंब करावा त्यासाठी ४-५ फुट रुंदीचे व १२-१५ सेमी उंचीचे शेताच्या लांबी नुसार वरंबे तयार करून १५ x १० सेमी वर लागवड करावी. ओलिताकरिता ठीम्बक किवा स्प्रिंकलर पद्धतीचा अवलंब करावा. रोपांच्या शेंड्याकडील १/३ भाग कापून टाकावा व लागवड पूर्वी रोपे शिफारशीत कीटकनाशक व बुरशीनाशकाच्या द्रावणात डुबउन लागवड करावी.