तुषारसिंचन संचाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन
10-03-2023
तुषारसिंचन संचाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन
अ) मेनलाइन व लॅटरल्सची देखभाल -
पाइप्स फुटू नयेत व गळती होऊ नये याची दक्षता म्हणून त्यांची कधीही फेकाफेक करू नये, विशेषत: वाहतूक करताना याची काळजी घ्यावी. पाइपवरून चालू नये, तसेच त्यावरून वाहनेही चालवू नयेत. खते, कीडनाशके किंवा इतर रासायनिक पदार्थांच्या समवेत पाइप्स ठेवू नयेत. सुगीपश्चात सर्व पाइप्स जमा करून जमिनीपासून अंतराळी लोखंडी किंवा लाकडी रॅकमध्ये ठेवावेत. पाइप्स जर जमिनीवरच जमा करून ठेवायचे असतील, तर त्यांचे एक तोंड थोडेसे उंचावर ठेवावे, म्हणजे त्यामधील साचलेले पाणी बाहेर येईल.
ब) कपलर व्हॉल्व्ह व फिल्टरची देखभाल -
पाइप्स जेथे जोडले जातात, त्या ठिकाणच्या रबरी सीलिंग रिंग खराब झालेल्या नाहीत किंवा त्या ठिकाणी गळती होत नाही याची पाहणी करावी. सुगीनंतर व संच काढून साठवण करण्यापूर्वी सर्व रबरी सीलिंग रिंग बाहेर काढाव्यात आणि त्या स्वच्छ, कोरड्या करून थंड व कोरड्या ठिकाणी साठवून ठेवाव्यात. रबरी सीलिंग रिंग्ज पुन्हा बसविताना त्या कपलरमध्ये व्यवस्थित व घट्ट बसल्या आहेत, याची खात्री करून घ्यावी. पाइप्समधून वाहणाऱ्या पाण्याच्या दाबामुळे पाइप सिस्टिम व पंप खराब होऊ नयेत म्हणून हळुवारपणे व्हॉल्व्हस् उघडावेत आणि बंद करावेत. ज्या वेळेस संच वापरात नसेल, त्या वेळी व्हॉल्व्ह घट्टपणे बंद करू नयेत. पोर्टेबल संचाचा फिल्टर दररोज स्वच्छ करावा, तर कायमस्वरूपी संचाचा फिल्टर प्रत्येक आठवड्याला स्वच्छ करावा.
क) रायझर पाइप व फवारा तोटीची देखभाल -
रायझर पाइप लॅटरल पाइपला जोडताना प्रमाणित पदार्थांचा वापर करावा म्हणजे दोन्ही पाइपना गंज चढणार नाही, तसेच संच साठवण करताना संचाचे भाग वेगळे करणे सोईस्कर होईल. तुषार तोट्या दररोज बाजूला काढावयाच्या असल्यास तोट्या सहजपणे फिरतात याची खात्री करावी. तसेच त्यामध्ये काही अडथळा आल्यास तो दूर करण्यासाठी टोकदार किंवा धारदार वस्तूचा वापर करू नये. तुषार तोटीचे सर्व भाग व्यवस्थित फिरतात याची खात्री करावी व तोट्यांना कधीही वंगण तेल देऊ नये, अन्यथा नोझल बंद पडू शकतात.
source ; मराठी.विकासपीडिया.भारत