Summer mung bean : उन्हाळी मूग उत्पादन तंत्रज्ञान

06-09-2022

Summer mung bean : उन्हाळी मूग उत्पादन तंत्रज्ञान

Summer mung bean : उन्हाळी मूग उत्पादन तंत्रज्ञान

 

पाण्याची सुविधा उपलब्ध असल्यास रब्बी हंगामातील (Rabbi season) पिकानंतर ( उदा हरभरा , गहु , करडई इ . ) उन्हाळी मुग (Summer mung) घेणे फायदेशिर ठरते. मुग हे पिक ६० ते ६५ दिवसात पक्व होते. या काळात ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या देणे गरजेचे आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामानात हे पिक चांगले पोसून चांगले उत्पादन मिळते म्हणुन त्यासाठी उन्हाळी हंगामासाठी मुगाच्या शिफारशीत वाणांची लागवड करावी शिवाय या पिकावर उन्हाळ्यात रोगांचे व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो.
उन्हाळी मुग हे व्दिदल पिक असल्याने त्याच्या मुळावर गाठी असतात. या गाठीमध्ये रायझोबियम हे जिवाणु हवेतील नत्र शोषून घेवून ते मातीत स्थिर करत असतात व नत्राचा साठा वाढवतात त्यामुळे जमिनीचा कस वाढून हे पिक फायदेशिर ठरते म्हणून सुधारित तंत्राचा अवलंब केल्यास उत्पादनात भरघोस वाढ होते. या उन्हाळी मुगाचे उत्पादन वाढीचे तंत्र पुढील प्रमाणे.

हवामान:-

या पिकास २१ ते २५ अंश से.ग्रे. तापमान चांगले मानवते हे पिक ३० ते ३५ अंश से . ग्र . तापमानात चांगले येते खरिप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात स्वच्छ सूर्यप्रकाश, उष्ण हवामान यामुळे मुगावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळुन येतो.

जमीन:-

उन्हाळी मुग लागवडीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचरा होणारी जमीनीची निवड करावी. पाणथळ , क्षारयुक्त , उतारावरील हलक्या निकस जमीनीत लागवड करू नये.

पेरणीची योग्य वेळ:-

उन्हाळी मुगाची पेरणी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा व मार्चचा पहिला पंधरवाडा या काळात करावी उशिरा पेरणी केल्यास हे पीक पावसात सापडण्याची शक्यता असते.

बियाणे  प्रमाण:-

पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते त्यासाठी प्रती हेक्टरी बियाण्याचे प्रमाण पुरेसे व योग्य असणे महत्वाचे ठरते म्हणून हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे ( एकरी ५ ते ६ किलो ) घरचे बियाणे असल्यास दर ३ वर्षानी बदलावे.

पेरणी पद्धत व अंतर:-

उन्हाळी मुगाची पेरणी हि तिफणीने करावी . लागवड करतांना दोन ओळीतील अंतर ३० से.मी. व दोन रोपांतील अंतर १० से.मी. ठेवावे.

बीजप्रक्रिया:-

लागवडीपूर्वी कार्बेन्डान्झीम ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी व पेरणीपूर्वी प्रती किला बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी त्यामुळे बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळते व उगवन चांगली होते.

जीवाणू संवर्धकाची निवड:-

युरशी नाशकाची बीजप्रक्रिया झाल्यानंतर ३ तासांनी मुगाच्या मुळावर गाठीचे प्रमाण वाढीविण्यासाठी रायझोबियम व पिएसबी हे जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी.

अन्नद्रव्य व्यवस्थापन:-

पुर्व मशागतीवेळी पुरेशे शेणखत व कंपोस्ट खत १० ते १५ गाडया प्रती हेक्टरी वापरावे . लागवडीवेळी एकरी ८ किलो नत्र ( १७.५ किलो युरिया व १६ किलो स्फुरद म्हणजेच १०० किलो एसएसपी द्यावी ) पिक फुलोरा अवस्थेत असतांना २ टक्के युरिया ( २० ग्रॅम प्रती लिटर पाणी मिसळुन फवारावे ) तसेच शेंगा भरत असतांना २ टक्के डीएपी ( २० ग्रॅम डीएपी प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारावे).

पाणी व्यवस्थापन:-

उन्हाळी मुगाकरिता वेळेवर पाण्याच्या पाळ्या देणे अतिशय गरजेचे असते या पिकास साधारणपणे ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्यावे. पिक पेरणीच्या पाण्यानंतर जमीनीच्या मगदुराप्रमाणे साधारणतः ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी यासाठी शेताची रानबांधनी व्यवस्थित करावी या पिकाला फुले येतांना व शेंगा भरतांना पाण्याची कमतरता भासू देवू नये.

सुधारित जातींची निवड

जाती कालावधी(दिवस)उत्पादन क्विं/हेक्टरी विशेष गुणधर्म 
बी . पी . एम . आर १४५६५ ते ७०१२ ते १४लांब शेंगा , टपोरे हिरवे दाणे , भुरी रोग प्रतिकारक्षम
वैभव७० ते ७५१२ ते १४भुरी रोग प्रतिकारक्षम , टपोरे हिरवे दाणे
पी . के . व्हि . ग्रीन गोल्ड७० ते ७५१० ते ११एकाच वेळी पक्वता
बि. एम . २००२-०१६५ ते ७०१२ ते १४टपोरे दाणे , लांब शेंगा अधिक उत्पादन भुरी रोग प्रतिकारक्षम
बि. एम-४६० ते ६५१० ते १२उन्हाळी हंगामासाठी योग्य
बि. एम-२००३-०२६५ ते ७०१२ ते १४टपोरे दाणे , लांब शेंगा अधिक उत्पादन भुरी रोग प्रतिकारक्षम

वरील प्रमाणे सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून  उन्हाळी मुगाची जाती परत्वे ४ ते ५ क्विंटल प्रती एकरी उत्पादन मिळू शकते.
हे पण वाचा:- पीक उत्पादन वाढीसाठी करा गांडुळ खताचा वापर

श्री. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक (कृषी विद्या)
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगांव
ता. वैजापुर, जि. औरंगाबाद
मो.नं. 7888297859
ई-मेल : [email protected]

उन्हाळी मूग लागवड माहिती, zaid crop

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading