हळद लागवड तंत्रज्ञान
06-02-2023
हळद लागवड तंत्रज्ञान
सरी वरंबा पद्धतीपेक्षा रुंद वरंबा पद्धतीने हळदीची लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. लागवड एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. लागवडीपूर्वी रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया अवश्य करावी.
हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींची निवड महत्त्वाची ठरते. पाणी देण्याच्या पद्धतीनुसार हळद लागवडीच्या सरी वरंबा आणि रुंद वरंबा अशा दोन पद्धती पडतात. ठिबक सिंचनाची सुविधा असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी, उत्पादनात वाढ होते.
लागवड पद्धती ः
१) सरी वरंबा पद्धत ः
- हळद पिकास पाट पाणी पद्धतीने सिंचन करावयाचे असल्यास ही पद्धती फायदेशीर ठरते.
- या पद्धतीने लागवडीसाठी ७५ बाय ९० सेंमी अंतरावर सऱ्या पाडाव्यात.
- सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत मिसळावे.
- जमिनीच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी जमिनीचा उतार लक्षात घेऊन ५ ते ६ मीटर ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.
२) रुंद वरंबा पद्धत ः
- ठिबक सिंचन पद्धती उपलब्ध असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.
- रुंद वरंबा तयार करताना १२० सेंमी (४ फूट) अंतरावर सऱ्या पाडाव्यात. त्या सऱ्या उजवून ६० ते ७५ सेंमी माथा असलेले २० ते ३० सेंमी उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन योग्य त्या लांबी रुंदीचे गादीवाफे पाडावेत.
- वरंब्याचा माथा सपाट करून घ्यावा. त्यानंतर ३० बाय ३० सेंमी अंतरावर लागवड करावी. लागवडीच्या वेळी गड्डे पूर्ण झाकले जातील, याची दक्षता घ्यावी.
- एका गादीवाफ्यावर दोन ओळी बसवाव्यात. या पद्धतीसाठी जमीन समपातळीत असणे गरजेचे असते.
- रुंद वरंबा पद्धतीने हळद लागवड केल्यास वरब्यांवर पडणाऱ्या जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. परिणामी कंदकूज रोगापासून हळद पिकाचे संरक्षण होते.
बिजप्रक्रिया ः
कंदमाशी आणि बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी ः
१) रासायनिक बियाणे प्रक्रिया ः
क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि अधिक कार्बेन्डाझिम (५० टक्के पाण्यात मिसळणारे) २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात निवडलेले गड्डे १५ ते २० मिनिटे बुडवावेत. नंतर बेणे सावलीत सुकवावे.
२) जैविक बियाणे प्रक्रिया ः
- ही बेणे प्रक्रिया लागवड करतेवेळी करावी. यामध्ये ॲझोस्पिरीलम १० ग्रॅम अधिक स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक (पीएसबी) १० ग्रॅम आणि व्हॅम २५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. द्रावणात बेणे १० ते १५ मिनिटे बुडवून लगेच लागवडीसाठी वापरावे.
- अगोदर रासायनिक बेणे प्रक्रिया करून बियाणे सावलीमध्ये दोन ते तीन दिवस सुकवावे. त्यानंतर लागवडीपूर्वी जैविक बीजप्रक्रिया करावी.
लागवडीचा हंगाम व बियाणे ः
- हळदीची लागवड एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
- एक हेक्टर लागवडीसाठी २५ क्विंटल जेठे गड्डे (त्रिकोणाकृती मातृकंद) बियाणे आवश्यक असते.
- अंगठे गड्डे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे वापरल्याने उत्पादन अधिक मिळते.
- साधारण ५० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे सशक्त, रसरशीत तसेच नुकतीच सुप्तावस्था संपवून थोडेसे कोंब आलेले असावेत.
- गड्डे स्वच्छ करून त्यावरील मुळ्या काढून घ्याव्यात. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये.
- जेठे गड्डे उपलब्ध होत नसतील तर बगल गड्डे (४०-५० ग्रॅम) किंवा हळकुंडे (३० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे) बेणे म्हणून वापरावे. निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराची भेसळमुक्त असावीत.
लागवड अंतर ः
- सरी वरंबा पद्धतीत ३० सें.मी. अंतरावर गड्ड्यांची लागवड करावी किंवा वाकुरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात ३ ते ५ सें.मी. खोल दाबून घ्यावेत.
- पाण्यात लागवड करताना गड्डे खोलवर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जर गड्डे खोल लावले गेले तर उगवणीवर परिणाम होण्याची शक्यता असते.
- रुंद वरंबा पद्धतीने ३० बाय ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी. लागवडीपासून २१ ते २६ दिवसांत संपूर्ण उगवण होते.
खत व्यवस्थापन ः
- सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर केल्यास उत्पादनवाढीस फायदा होतो. पूर्वमशागतीच्या वेळी हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
- माती परीक्षणानुसार हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा द्यावा. नत्र मात्र २ हप्त्यांत विभागून द्यावे. नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी, तर दुसरा हप्ता भरणीच्या वेळी (लागवडीनंतर १०५ दिवसांनी) द्यावा.
- तसेच भरणीच्या वेळी हेक्टरी दोन टन निंबोळी किंवा करंज पेंडीचा वापर करावा.
पाणी व्यवस्थापन ः
- रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा. ठिबकच्या दोन लॅटरमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. दोन तोट्यांमधील अंतर जमिनीच्या प्रतीनुसार ठेवावे.
- जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते.
- लागवड एप्रिल-मे महिन्यात होत असल्याने सुरवातीच्या काळात पाऊस पडेपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. कारण मुळांना जमिनीत स्थिरता प्राप्त होण्याचा हा काळ असतो. या कालावधीत आंबवणीचे पाणी लगेच ४ ते ६ दिवसांच्या अंतराने द्यावे. जमिनीच्या प्रतीनुसार हा कालावधी कमी-जास्त ठेवावा.
- पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळीमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. मात्र पीक काढणीच्या अगोदर १५ दिवस अजिबात पाणी देऊ नये.
- पाऊस समाधानकारक असेल तर हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत पाण्याच्या १३ ते १५ पाळ्या द्याव्या लागतात.
आंतरपिकांची लागवड ः
- हळदीची मुळे आणि निवडलेल्या आंतरपिकाची मुळे जमिनीत समान खोलीवर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
- तुरीसारख्या पिकांचा वापर हळदीमध्ये सावलीसाठी करावा. २५ टक्के सावलीमध्ये हळद पीक चांगले वाढते.
- आंतरपिके ही हळद पिकापेक्षा उंचीने कमी तसेच पसाऱ्याने कमी जागा व्यापणारी असावीत.
- हळद लागवड केल्यापासून ३ ते ३.५ महिन्यांनी फुटवे येऊन कंद पोसण्यास सुरुवात होते. हळकुंडे येण्याच्या कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी करणे फायदेशीर ठरते.
- आंतरपिकासाठी घेवडा, झेंडू, मिरची, कोथिंबीर, तूर, उडीद, मूग या पिकांची निवड करावी.
- हळदीमध्ये आंतरपीक म्हणून मका पिकाची लागवड टाळावी. कारण, मका पिकामुळे हळदीच्या उत्पादनात १५ ते २० टक्के घट येते.
डॉ. मनोज माळी,
( प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली )
source : agrowon