एकात्मीक किड व्यवस्थापनामध्ये निंबोळी अर्काचा वापर व फायदे
06-09-2022
Uses And Benefits Of Nimboli Extract : एकात्मीक किड व्यवस्थापनामध्ये निंबोळी अर्काचा वापर व फायदे
प्रा . संजय बाबासाहेब बडे सहाय्यक प्राध्यापक ( कृषी विद्या विभाग )
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव ता . वैजापूर जि . औरंगाबाद
पिन कोड ४२३७०३ मो.नं. 788829759.
कडुनिंबाची मुळे , खोड , खोडाची साल , डिंक , पान , फुले , फळे यापासून कडुनिंब तेल , निंबोळी अर्क व तेल काढुन राहिलेली पेंड अशी प्रत्येक गोष्ट अनमोल आहे.कडुनिंब दिर्घायुषी आहे . निंबाळी अर्क हे अत्यंत सुरक्षित किडनाशक आहे . पावसाच्या सुरुवातीच्या काळात निंबोळया जमा करून ठेवाव्यात किंवा बाजारातही आपल्या निंबोळी मिळतात व त्या निंबोळीचा घरगुती निंबोळी अर्क तयार करून त्याचा वापर केल्यास खर्चात बचत होऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते . ५ टक्के निंबोळी अर्क हे कोणत्याही पिकावरील किडीसाठी प्राथमिक फवारणीसाठी योग्य असते . कडुनिंबाच्या बियांमध्ये निबीडीन , निंबीन , मेलॅट्रीयाल व अॅझडिरॅक्टीन असे अनेक महत्वाचे घटक असतात हे घटक किडी नियंत्रणामध्ये महत्वाची भुमिका बजावतात म्हणून कडुनिंबाच्या निंबोळी अर्काचा वापर एकात्मीक किड नियंत्रण व्यवस्थापनात केल्यास रासायनिक किडनाशकांचा वापर कमी करून खर्चात बचत करता येईल .
कडुनिंबातील घटकांमुळे किडीवर होणारे परिणाम:
विविध किडीच्या मादी हया फवारणी केलेल्या पिकांवर अंडी घालण्यापासून परावर्तीत होतात . कडुनिंबा पासूनचे अर्क हे किटकांवर बहुआयामी आंतरप्रवाही किटक नाशकाप्रमाणे काम करतात . कडुनिंबाच्या तिव्र वासामुळे • विविध पिकांवर किडींना हे एक खाय प्रतिबंधात्मक म्हणून उपयोगी ठरते यातील काही घटक किडींची वाढ थांबवतात आणि कात टाकण्यापासून प्रतिबंध करतात त्यामुळे किड मरतात . किडीच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो .
कडुनिंबापासून ५ टक्के निंबोळी अर्क तयार करणे:
५ किलो निंबोळया गोळा करून त्या सावलीत वाळवाव्यात आणि फवारणीच्या १ दिवस अगोदर त्या कुटुन बारीक कराव्यात आणि ९ लिटर पाण्यात रात्रभर भिजु घालावे तसेच २०० ग्रॅम साबणाचा चुरा किंवा वॉशिंग पावडर १ लिटर पाण्यात वेगळा भिजत घालावा . दुसऱ्या दिवशी सकाळी लाकडी काठीने ते द्रावण दुधासारखे दिसेपर्यंत ढवळावे . द्रावण ढवळुन झाल्यावर निंबोळी अर्क स्वच्छ पातळ कापडाने गाळुन घ्यावे आणि त्यात साबनाचे द्रावण मिसळावे अशा रीतीने निंबोळीचा ५ टक्के अर्क तयार होतो हा सर्व अर्क १०० लिटर होईल एवढे पाणी टाकावे व फवारणीसाठी वापरावे .
निंबोळ अर्क वापरण्याचे प्रमाण:
निंबोळी अर्क ५ टक्के ५ मि.ली. प्रति लिटर पाणी म्हणजे १० लिटर पाण्यामध्ये ५० मिली याप्रमाणे प्रतिपंपाला फवारणी करावी .
नियंत्रित होणाऱ्या किडी:
मावा , पाने खाणारी अळी , तुडतुडे , पाने पोखरणारी व देठे कुरतडणारी अळी , खोडकिडा , घाटे अळी , अमेरिकन बोंडअळया , फळमाशी , फुलकिडे इ .
फवारणीची योग्य वेळ:
निंबोळी अर्काची फवारणी संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दुपारी ४ वाजल्यानंतर करणे योग्य असते . हा तयार केले अर्कवरही पडला तरी तो आंतरप्रवाही म्हणून पुर्ण झाडात पोहोचतो .
विशेष बाब:
निंबाळी अर्काचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही . निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावे . हा अर्क फवारल्याने पिकांवरील किडी नष्ट होतात व किडी या नपुंसक होवून त्यांना अपंगत्व येते त्यांचे जनरेशन होत नाही . निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो . सर्व प्रकारच्या पिकांवर १५ दिवसाच्या अंतराने नियमित फवारणी घेतल्यास रसशोषक किडीच्या जीवनचक्रात अडथळा येवून किडीचे नियंत्रण होते .
निंबोळी अर्क फवारणीचे फायदे:
निंबोळी अर्क तयार करणे , हाताळणे सोपे आहे . नैसर्गिक असल्याने प्रदुषण होत नाही . अर्क निर्मीतीसाठी खर्च कमी लागतो . निंबोळीतील अॅझ डिरॅक्टीन या घटकामुळे किड झाडापासून दूर राहते . त्यांना अपंगत्व येते . किडीचे जीवनचक्र संपुष्टात आणण्याची शक्ती या घटकात आहे . मेलियानट्री ऑल हा घटकसुद्धा निंबोळीमध्ये असतो हा घटक पिकांवर पडणाऱ्या किडींना झाडाची पाने खाऊ देत नाही त्यामुळे झाडे निरोगी राहुन पिकांची वाढ उत्तम होते . निंबोळी अर्क हा मित्र किटकांसाठी फारसा हानिकारक नाही.निंबोळी अर्कामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो आशाप्रकारे निंबोळी अर्क हे बुरशीनाशक , जिवाणुनाशक , विषाणुरोधक म्हणून परिणामकारक काम करते.