जल, मृदा संधारणासाठी पावसाळ्यात काय उपाययोजना कराव्यात?
25-06-2023
जल, मृदा संधारणासाठी पावसाळ्यात काय उपाययोजना कराव्यात?
जमिनीवर पाणी साठविल्यास त्यातून बाष्पीभवनामुळे पाण्याचा ऱ्हास होतो. तो टाळण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखाली पाणी साठा करण्यासाठी पुनर्भरण चर उपयुक्त ठरतात.
सध्या बहुतांश शेतकरी शेतातील मशागती करून पावसाची वाट पाहत आहे. मोठ्या पावसामध्ये पाण्यासोबत माती वाहून जमिनीच्या सुपीकतेचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जमिनीबरोबरच पाण्याच्याही नियोजनाचा विचार केला पाहिजे.
आपले शेत ज्या परिसरात आहे, त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी कसे पडते, कोठे पडते, कसे वाहून जाते यांचा एक ठरावीक पॅटर्न असतो. यालाच शास्त्रीय भाषेमध्ये पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. त्याचा विकास करताना पाणलोट क्षेत्रातील जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार व उंच-सखलपणा, जमिनीचा भूस्तर लक्षात घ्यावा. येथे पाणी वाहून नेणारे ओढे, नाले यांचा विचार करून जल-मृद् संधारणाचे उपाय शास्त्रीय पद्धतीने करावेत.
समपातळी बांधबंदिस्ती
शेतातील वाहते पाणी अडविण्यासाठी उताराच्या आडव्या दिशेने घातलेल्या मातीच्या अथवा दगडाच्या अडथळ्यास ‘बांध’ असे म्हणतात.
कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात साधारणतः सहा टक्के अथवा त्यापेक्षा कमी उतार असणाऱ्या लागवडयोग्य जमिनीमध्ये समपातळी बांध घातले जातात. समपातळी बांधामुळे वाहत्या पाण्याचा वेग कमी होऊन ते जमिनीमध्ये मुरण्यास मदत होते. मातीची धूप कमी होते. जमिनीची सुपीकता जपली जाऊन उत्पादन क्षमता वाढते.
ढाळाची (उताराची) बांधबंदिस्ती
अनियमित अथवा अतिपावसाच्या प्रदेशात ढाळाच्या बांधाची उपाययोजना केली जाते. यात बांध करण्यासोबत जास्तीचे पाणी सावकाश, कमी गतीने बांधाबाहेर काढून दिले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या चरांचा उपयोग केला जातो.
समपातळी रेषेवर चर
लागवडीस अयोग्य जमिनीमध्ये उताराला आडव्या असणाऱ्या समपातळी रेषेवर खोदलेल्या चरांना ‘समपातळी चर’ असे म्हणतात. चरांमधून खोदलेल्या मातीच्या आधारे चराच्या खालच्या बाजूस बांध घालण्यात येतो. गरजेनुसार नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करून वृक्ष लागवडही केली जाते.
टपावसाचे पाणी समपातळी चरांमध्ये साठावे, यासाठी चरांचा आकार ६० सें.मी. रुंद व ३० सें.मी. खोल एवढा ठेवावा. दोन चरांमधील अंतर चार मीटर एवढे ठेवतात.
पुनर्भरण चर -
- जमिनीवर पाणी साठविल्यास त्यातून बाष्पीभवनामुळे पाण्याचा ऱ्हास होतो. तो टाळण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखाली पाणी साठा करण्यासाठी पुनर्भरण चर उपयुक्त ठरतात.
- सदर चरांमध्ये ६ ते ८ महिने पुनर्भरणाची प्रक्रिया सुरू राहते. त्याच्या खालच्या बाजूस १०० मीटर अंतरापर्यंत असणाऱ्या पाण्याच्या स्रोतांना वर्षभर पाणी उपलब्ध होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही उपाययोजना उपयुक्त आहे.
पाणी साठविण्यासाठी शेततळे, पाझर तलाव
पाऊस अनियमित होत चालला आहे. अशा स्थितीमध्ये पावसाळ्यात पडलेल्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे व कौशल्याने करावे लागते. पावसात मोठा खंड, ऐन मोक्याच्या वेळेस ताण अशा वळी संरक्षित सिंचन देण्यासाठी शेततळे किंवा पाझर तलाव अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
विहीर पुनर्भरण
जमिनीमध्ये अनेक वेगवेगळे भिन्न थर आढळतात. या थरांची जाडी, आकारमान वेगवेगळे आहे. पहिला थर मातीचा असून, या थरातून पाणी मुरण्याचा वेग हा दर दिवसाला साधारणपणे दोन सें.मी. असतो. मुरमाच्या थरातून पाणी वाहण्याचा दर दहा सें.मी. असू शकतो. त्या खडकांना भेगा, फटी, सळ व सूक्ष्म छिद्रे असतात.
त्या खडकातून पाणी वाहण्याचा दर हा २०० सें.मी. एवढासुद्धा असू शकतो. या सर्वांचा एकत्रितपणे विचार केला असता पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यापासून भूजल साठ्यापर्यंत पोचण्यास साधारणपणे एक महिना किंवा जास्त कालावधी लागतो.
म्हणजेच नैसर्गिक भूजल भरणाचा वेग फार कमी असतो. त्यामुळे विहीर पुनर्भरण करणे गरजेचे असते. त्यासाठी विहीर व ओढ्याच्या अंतरामध्ये १० फूट लांबीचे दोन स्वतंत्र खड्डे घ्यावेत. विहिरीपासून पहिला खड्डा १० फूट लांब, १० फूट रुंद व १० फूट खोल घ्यावा.
या खड्ड्याच्या तळाशी एक आडवे छिद्र घेऊन चार इंची पी.व्ही.सी. पाइपद्वारे हा खड्डा विहिरीशी जोडावा. या खड्ड्याच्या तळाशी २.५ फूट जाडीचा दगड-गोट्यांचा थर भरावा. त्या थरावर २.५ फूट जाडीचा थर भरावा. त्यानंतर २.५ फूट जाडीचा वाळूचा चाळ (चाळलेली वाळू) भरून त्या थरावर धुतलेल्या वाळूचा २.५ जाडीचा थर भरून घ्यावा.
पहिल्या खड्ड्यापासून साधारणपणे ३.५ फूट अंतरावर पुन्हा १० फूट लांब, १० फूट रुंद व ३ फूट खोल असा दुसरा खड्डा घ्यावा. खड्ड्याच्या तळाशी दोन फूट जाडीचा दगड-गोट्यांचा थर भरावा. जमिनीच्या पातळीवर चार इंची पी.व्ही.सी. पाइपद्वारे दोन्ही खड्डे जोडावेत.
ओढ्याच्या पाण्यातील पालापाचोळा, कचरा हे पहिल्या खड्ड्यात स्थिरावतील आणि मातीचे कणविरहित पाणी पाइपद्वारे दुसऱ्या खड्ड्यात जाईल. दुसऱ्या खड्ड्यातून गाळलेले स्वच्छ पाणी विहिरीत पाइपद्वारे जाऊन विहीर पुनर्भरण होईल.
कूपनलिकेद्वारे भूजल पुनर्भरण
- कूपनलिका पुनर्भरण करताना कूपनलिके जवळून नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे.
- कूपनलिकेच्या सभोवताली २ मी. × २ मी. × २ मी. आकाराचा खड्डा खोदावा.
- खड्ड्यातील उंचीएवढ्या केसिंग पाइपच्या भागात १ ते २ सें.मी. अंतरावर सर्व बाजूंनी ४ ते ५ मि.मी. व्यासाची छिद्रे पाडावीत. या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावा
- खड्ड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वांत खालच्या भागात दगड-गोटे, त्यावरच्या भागात खडी, नंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी.
- अशा प्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी या तयार केलेल्या गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल.
source : agrowon