AI करणार पिकांमधील बोंडअळीचा नायनाट...
15-10-2024
AI करणार पिकांमधील बोंडअळीचा नायनाट...
कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव गेल्या तीन वर्षांमध्ये वाढलेला दिसून येत आहे. उत्तर भारतामधील पंजाब, हरियाना, राजस्थान हे तीन राज्य यामुळे दरवर्षी सर्वाधीक ग्रस्त होतात. गुलाबी बोंड अळीच्या परिणामी सरासरी कापूस उत्पादकांचे वीस टक्के नुकसान होते.
त्या पार्श्वभूमीवर या किडीच्या नियंत्रणाकरिता पहिल्या टप्प्यात नर पतंगां आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळे (फेरोमॅन ट्रॅप) लावण्याची शिफारस केली जाते. हेक्टरी पाच सापळे लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.
सापळ्यामधील पतंगाची मोजदाद करून त्याद्वारे किडीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या वर आहे किंवा खाली हे ठरविण्यात येते. पाच टक्क्यांपेक्षा कमी प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या खाली मानला जातो. पण शेतकऱ्यांना निरीक्षणात सातत्य ठेवावे लागते.
निरीक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने पिकाचा नाश होण्याची शक्यता असते. त्यामुळे एआय तंत्रज्ञान वापरण्यात यावे, अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने एआय तंत्रज्ञान आधारित प्रकल्पाला केंद्राने निधी देत अंमलबजावणीस मान्यता दिली आहे.
पायलट प्रकल्प पंजाबमध्ये:
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठीच्या या पायलट प्रकल्पाची अंमलबजावणी पंजाब राज्यातील मुक्तसर, भटिंडा आणि मानसा या तीन जिल्ह्यांत होत आहे.
प्रत्येक जिल्ह्यामधील सहा याप्रमाणे तीन जिल्ह्यांतील १८ शेतकऱ्यांचा या प्रकल्पात सहभाग आहे. पंजाबमध्ये प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर राजस्थान आणि हरियाना या राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
काय आहे तंत्रज्ञान..?
फेरोमॅन ट्रॅप (कामगंध सापळे) मध्ये कॅमेरा लावण्यात आला आहे तो फोटो घेतो. त्यानंतर लर्निंग एल्गोरिदम या तंत्रज्ञानाचा उपयोग करून सापळ्यात फसलेली कीड नेमकी कोणती याचे पृथक्करण व मोजदाद केली जाते.
त्यानंतर ही माहिती शेतकरी, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, कृषी विभाग तसेच पंजाब कृषी विद्यापीठ व तेथील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर पोहोचविली जाते.
त्याचे विश्लेषण करून नुकसान पातळीपेक्षा किडींचा प्रादुर्भाव अधिक असल्यास शेतकऱ्यांना नियंत्रण विषयक सल्ला तत्काळ दिला जातो.