शेतमाल बाजाराची सध्याची स्थिती काय? जाणून घ्या सविस्तर
13-02-2024
शेतमाल बाजाराची सध्याची स्थिती काय? जाणून घ्या सविस्तर
वायद्यांमध्ये कापसाचे भाव टिकून आहेत. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात ९०.९१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे एमसीएक्सवर वायदे ५८ हजार ६०० रुपयांवर होते. तर बाजारातील आवक कालही कमी झाली होती.
कापूस आवक १ लाख ४७ हजार गाठींवर आली होती. तरीही कापसाचे भाव दबावातच होते. कापसाचा भाव ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता. बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.
सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम आहे. सोयाबीनला आजही सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. तर बाजारातील आवक आजही ३ लाख ६० हजार पोत्यांच्या दरम्यान कायम होती. बाजारातील आवक कायम असल्याचा दबाव आजही सोयाबीनच्या भावावर दिसून येत आहे, असे व्यापारी सांगत आहेत.
तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनवरील दबाव कायम आहे. सोयाबीनची आवक पुढच्या काही आठवड्यांमध्ये कमी होत जाईल, असा अंदाज असून दरातही काहीशी वाढ होईल, अशी शक्यता सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली.
बाजारातील घटती आणि चांगला उठाव, यामुळे टोमॅटोच्या भावात सुधारणा झाली. टोमॅटोचे भाव मागील मागील काही आठवड्यांपासून काहीसे वाढत आहेत. सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी १ हजार ८०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.
सध्या काही भागात पिकाला पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर सध्या तोडा सुरु असलेले प्लाॅटही कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील, असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.तुरीच्या भावाताल तेजी कायम आहे. सध्या तूर आवकेचा हंगाम आहे. एरवी याच काळात आफ्रिकेतून तूर आयात होत असते. पण यंदा आफ्रिकेतून होणारी तूर आयात कमी आहे. त्यातच उत्पादन घटल्याने शेतकरीही मर्यादीत विक्री करत आहेत.
यामुळे तुरीच्या भावाला चांगलाच आधार आहे. सध्या तुरीला देशात ९हजार ५०० ते १० हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सध्या बाजारातील तुरीची स्थिती पाहीली तर हा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात कांद्याच्या भावात पुन्हा नरमाई दिसून आली. कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून १ हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान कायम आहेत. सध्या महाराष्ट्रातील कांदा आवक कमी होत आहे. तर गुजरातमधील आवक टिकून आहे.
यामुळे भाववाढीवर दबाव दिसतो, असेही त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील कांदा आवकही सुरु झाली. कांद्याच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.