आवळा लागवड तंत्रज्ञान
16-08-2023
आवळा लागवड तंत्रज्ञान
महाराष्ट्रामध्ये आवळा लागवडीसाठी कृष्णा, कांचन, एनए-१० व एनए-७ या जातींची शिफारस आहे. जमिनीचा पोत व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन आवळ्यामध्ये आंतरपिके घ्यावीत.
महाराष्ट्रामध्ये आवळा लागवडीसाठी कृष्णा, कांचन, एनए-१० व एनए-७ या जातींची शिफारस आहे. जमिनीचा पोत व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन आवळ्यामध्ये आंतरपिके घ्यावीत. आवळा हे भारतीय उपखंडातील सर्वांत महत्त्वाचे औषधी व आरोग्यवर्धक फळ आहे. आवळा फळ क जीवनसत्त्व आणि टॅनिनचा समृद्ध स्रोत आहे. फळांमध्ये सरासरी १०० ग्रॅममध्ये ७०० मिलिग्रॅम अस्कोर्बिक अॅसिड आणि लोह, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात.
जमीन
- हे फळझाड कोरड्या उप-उष्णकटिबंधीय, उष्ण व समशीतोष्ण हवामानात सर्व ठिकाणी येते.
- हा वृक्ष आकाराने मध्यम, कठीण, जास्त फांद्या असतात. साधारणपणे १० ते १५ मीटर उंच वाढते. जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये पर्णपाती होते. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात फांद्यांवर फुले येण्यास सुरुवात होते.
- जुलै-ऑगस्ट महिन्यांमधील उबदार हवामान फळांच्या वाढीस अनुकूल असते.
- लागवडीसाठी सुपीक चिकण मातीचे प्रमाण जास्त असलेली व पाण्याचा निचरा योग्य होणारी जमीन उत्तम असते. परंतु हे फळझाड विविध प्रकारच्या जमिनींमध्ये, कॅल्शिअमयुक्त जमीन आणि सामू ६ ते ९.५ असणाऱ्या जमिनीमध्ये वाढू शकते.
- चुनखडीयुक्त किंवा रेताड जमिनीत लागवड करू नये.
अभिवृद्धी तंत्रज्ञान
- बियांपासून तयार केली रोपे प्रामुख्याने रूटस्टॉक म्हणून कलमे तयार करण्यासाठी वापरली जातात. कारण बियांपासून तयार केलेल्या रोपांपासून आकाराने छोटी, कमी दर्जाची व खूप कालावधीनंतर फळे मिळतात. म्हणून व्यापारीदृष्ट्या लागवडीमध्ये ती वापरत नाहीत.
- देशी जातीपासून परिपक्व फळे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत गोळा केली जातात. फळे सावलीमध्ये सुकवून दाब देऊन बिया काढल्या जातात. एका फळामध्ये सरासरी सहा बिया असून, जवळ जवळ ३००-५०० बिया प्रति १० ग्रॅम असतात.
- बियांना १२ ते २४ तास पाण्यामध्ये किंवा ५०० पीपीएम जीए३ च्या द्रावणामध्ये २४ तास भिजवाव्यात. गादी वाफ्यावर वसंत ऋतू किंवा पावसाळी हंगामात, २ ते ३ सेंटिमीटर खोल बिया (दोन ओळींमध्ये १५ सेंमी अंतर ठेवून) पेरल्या जातात. ४० दिवसांनंतर पिशव्यांमध्ये रोपे भरली जातात. गादीवाफ्यावर किंवा रोपवाटिकेमध्ये पुरेशी सावली असावी.
- ६ ते ८ देशी आवळ्याच्या रोपावर मृदकाष्ठ किंवा ढाल पद्धतीने डोळे भरून कलमे तयार केली जातात.
- सुधारित जाती महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी कृष्णा, कांचन, एनए-१० व एनए-७ या जातींची शिफारस आहे. राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये एनए-१० या जातीची लागवड यशस्वीरीत्या केली आहे.
जाती | वैशिष्ट्ये |
---|---|
बनारसी | फळांचे वजन ४०-४५ ग्रॅम, साखरेचे प्रमाण १२.५ %, आम्लता १.५ %, फळांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात ६५० मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. उत्पादन ३५-३८ किलो प्रति झाड. |
कृष्णा (एन.ए.-५) | फळांचे वजन ३५-४० ग्रॅम, साखरेचे प्रमाण ११.५ %, आम्लता १.४ %, १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात ४७५ मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. |
चकैया | फळांचे वजन ३०-३२ ग्रॅम, फळांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात ५०० मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. उत्पादन ३० किलो प्रति झाड |
कांचन (एन.ए.-४) | फळांचे वजन ३०-३२ ग्रॅम, साखरेचे प्रमाण १० %, आम्लता १.४५ %. फळांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात ५०० मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. |
आनंद-१ | फळाचे वजन ३५ ग्रॅम, जीवनसत्त्व ‘क’ ७७० मि.ग्रॅम प्रती १०० ग्रॅम असते. उत्पादन - ७०-८० किलो प्रति झाड |
आनंद-२ | फळाचे वजन ४५ ग्रॅम असते. जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण १०० ग्रॅम ला ७७५ मि.ग्रॅम असते. उत्पादन १००-१२५ किलो प्रति झाड |
बी.एस.आर.-१ | फळाचे सरासरी वजन २७.३० ग्रॅम. फळांमध्ये साखरेचे प्रमाण १८.१० %, जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण १०० ग्रॅमला ६२० मिलिग्रॅम. उत्पादन ४०-४५ किलो प्रति झाड. |
बलवंत (एन.ए.-१०) | फळाचे वजन ४० ग्रॅम, साखरेचे प्रमाण ९.९० %, आम्लता २.१७ %, जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण १०० ग्रॅम ला ५२८ मि.ग्रॅम असते. उत्पादन ४२ किलो प्रति झाड. |
लागवड
- जून ते जुलै महिन्यामध्ये लागवड केल्याने रोपांची उत्तम वाढ होते.
- लागवडीपूर्वी, उभी-आडवी खोल नांगरणी करून जमीन तयार करावी. ६० × ६० × ६० सेंमी आकाराचे खड्डे खोदून प्रत्येक खड्ड्यात १०-१५ किलो कुजलेले शेणखत, २५० ग्रॅम निंबोळी खत आणि २५० ग्रॅम एनपीकेचे मिश्रण (१९:१९:१९) मातीमध्ये मिसळून खड्डे भरून घ्यावेत.
- कठीण खडकाळ जमिनीमध्ये १ × १ × १ मीटर आकाराचे खड्डे यंत्राच्या साह्याने खोदून त्यामध्ये १:१:१ या प्रमाणात मूळ माती, काळी किंवा पोयटा माती आणि स्पेंट मशरूम सबस्ट्रेट यांचे मिश्रण भरल्याने कलमांची चांगली वाढ होते.
- लागवड ६ × ६ मी., ८ × ८ मी. किंवा ८ × ६ मी. अंतरावर करावी.
- लागवड करताना परागीभवन आणि जास्तीत जास्त उत्पादनाच्या हेतूने २:२:१ च्या गुणोत्तरामध्ये किमान तीन जातींची लागवड करावी.
पाणी आणि खत व्यवस्थापन
- नवीन कलमे जगविण्यासाठी गरजेनुसार २० ते ३० लिटर पाणी प्रति झाड १० ते १५ दिवसांच्या अंतराने द्यावे.
- जून, जुलै महिन्यांत पाऊस नसेल तर बागेला पाणी द्यावे. उन्हाळ्यामध्ये १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. आंतरपिके घेतल्यास पाणी व खाते देण्याची विशेष गरज भासत नाही.
- जुलै महिन्यामध्ये पूर्ण शेणखत आणि अर्धी रासायनिक खताची मात्रा द्यावी. अर्धी रासायनिक खतांची मात्रा ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये पावसाचा अंदाज घेऊन द्यावी.
- खतांचा वापर केल्यानंतर (जानेवारी/फेब्रुवारी) प्रथम पाणी दिले जाते.
- फूलधारणेच्या कालावधीत म्हणजेच मार्चच्या-एप्रिलदरम्यान पाणी तोडावे. फळगळती कमी करण्यासाठी एखादे संरक्षित पाणी द्यावे.
खत मात्रा वापर
झाडाचे वय | शेणखत (किलो) | खताची मात्रा प्रति झाड | ||
---|---|---|---|---|
नत्र (ग्रॅम) | स्फुरद (ग्रॅम) | पालाश (ग्रॅम) | ||
१ | ५ ते १० | ५० | ५० | ५० |
२ ते ४ | १५ ते २० | १०० | १०० | १०० |
५ ते ६ | २५ ते ३० | २०० | १५० | १५० |
७ व त्यापुढील | ३० ते ४० | ४०० | २०० | २०० |
- कलमे केलेली झाडे लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून फळे देण्यास सुरुवात करतात, तर बियांपासून लागवड केलेल्या झाडांना ६ ते ८ वर्षे लागतात.
- आवळ्याला मार्च-एप्रिल महिन्यात फुले येतात. फूल ते परिपक्व फळासाठी सामान्यपणे ५ ते ६ महिने लागतात.
- फळधारणा झाल्यानंतर फळे सुप्तावस्थेत जातात. या काळात कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करू नये.
- मृगाचा पाऊस पडल्यानंतर फळाची वाढ होण्यास सुरुवात होते.
तोडणी हंगाम
- तोडणीचा हंगाम जातिपरत्वे सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत चालतो. चांगली तयार झालेली फळे काढावीत.
- फळे आकडीने किंवा बांबूने हलवून काढावी लागतात. तोडणीच्या विलंबामुळे काही जातींच्या बाबतीत फळे मोठ्या प्रमाणात गळतात.
- तोडणी सहसा दिवसाच्या लवकर किंवा उशिरा करावी. पूर्ण वाढलेल्या १० वर्षांपुढील झाडापासून १०० ते १२० किलो फळे मिळतात. हेक्टरी १५ ते २० टन उत्पादन मिळते.
वर्गीकरण
- आकारानुसार फळांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. मोठ्या आकाराची फळे मुख्यतः कँडीसाठी वापरतात.
- लहान आकाराची च्यवनप्राश आणि त्रिफळा तयार करण्यासाठी वापरतात. उरलेली फळे पावडर आणि शाम्पू बनवण्यासाठी वापरतात.
source : agrowon