अरबी समुद्रात मान्सूनचे आगमन, हवामान विभागाने वर्तवली अनुकूलता
24-05-2024
अरबी समुद्रात मान्सूनचे आगमन, हवामान विभागाने वर्तवली अनुकूलता
अरबी समुद्रात मान्सूनचे आगमन झाले असून, दक्षिणेकडून प्रवास करत मान्सून अरबी समुद्र आणि श्रीलंकेच्या जवळपास निम्म्याहून अधिक भागात दाखल झाला आहे. आता मान्सून भारताच्या मुख्य भूमीपासून अवघ्या काही अंतरावर येऊन ठेपला आहे. सध्या मान्सूनच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान परिस्थिती अनुकूल, ढगांची गर्दी
नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. एकंदर हवामान परिस्थितीमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सध्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने 19 मे रोजी निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्र आणि मालदीव पर्यंत मान्सून दाखल झाल्याचे सांगितले होते.
मान्सूनचा प्रवास
दक्षिण-पश्चिम मान्सून आज अरबी समुद्रातील काही भागांमध्ये, मालदीवमधील काही भाग, कन्याकुमारीच्या आसपास, दक्षिण बंगालच्या उपसागरात, अंदमान आणि निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात पुढे सरकला आहे.
कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे क्षेत्र 25 मे पर्यंत ईशान्य बंगालच्या उपसागर आणि त्याच्या आसपासच्या भागात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.