पिकांच्या पोषणासाठी व शेती उत्पादन वाढीसाठी संतुलित प्रमाणात अन्नद्रव्यांचा वापर आवश्यक
25-07-2023
पिकांच्या पोषणासाठी व शेती उत्पादन वाढीसाठी संतुलित प्रमाणात अन्नद्रव्यांचा वापर आवश्यक
खतांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ आणि शाश्वत शेती उत्पादनासाठी पीक पोषणाच्या नवीन पर्यायांचा तसेच विशेष खतांचा वापर होणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने नॅनो युरिया, नॅनो डीएपी, सल्फर-लेपित युरिया, पॉली फोर आणि पीडीएम खताचा समावेश होतो.
पिकांच्या वाढीसाठी संतुलित प्रमाणात अन्नद्रव्यांचा वापर महत्त्वाचा आहे. आपल्या देशातील ५० टक्के जमिनीत नत्राची कमतरता आहे. युरियाच्या वापराचे परिणाम शेतकऱ्यांना पिकावर जलद व ठळकपणे दिसतात. नत्र हे मुख्य अन्नद्रव्य असून पिकातील हरित लवकाचा भाग असून, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये महत्त्वाचे कार्य करते. त्यामुळे पिकांची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे युरियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. पण युरियाची कार्यक्षमता फक्त ३० ते ४० टक्के इतकीच असते. ६० ते ७० टक्के युरिया वाया जातो आणि वाया जाणारा युरिया जमीन, पाणी व हवामान यांना प्रदूषित करतो. त्याचबरोबर युरियावरती होणारा खर्च सुद्धा वाया जातो आणि आर्थिक नुकसान होते.
अतिरिक्त वाया जाणारा युरिया जर जमिनीमध्ये राहिला तर जमिनीतील इतर अन्नद्रव्ये, जमिनीचा सामू व सूक्ष्म जीवजंतूंवर त्याचा अनिष्ट परिणाम करतो. त्याचा जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो. जर युरिया पाण्यामध्ये वाहून गेला तर पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढवून पाणी प्रदूषित होते. त्याचबरोबर काही युरिया हवेमध्ये अमोनिया व नायट्रस ऑक्साइडच्या स्वरूपात उडून जातो. त्यामुळे हवामान प्रदूषित होते.
युरिया खताच्या अतिवापरामुळे पिकांची फक्त शाखीय वाढ होते, पिकांमध्ये लुसलुशीतपणा वाढतो त्यामुळे पीक रोग, किडीला बळी पडते. नाजूकपणा वाढल्यामुळे पीक लोळते. युरियाच्या बरोबरीने डीएपी खताचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. डीएपी किंवा संयुक्त खतातील स्फुरदाची कार्यक्षमता ही अतिशय कमी आहे त्यामुळे अतिरिक्त स्फुरदचा वापर नैसर्गिक स्रोतांना घातक असतो. या सर्व बाबींचा विचार करता खतांची कार्यक्षमता वाढवणे आणि शाश्वत शेती उत्पादनासाठी पीक पोषणाच्या नवीन पर्यायांचा तसेच विशेष खतांचा वापर आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने नॅनो युरिया, नॅनो डीएपी, सल्फर-लेपित युरिया, पॉली फोर आणि पीडीएम खताचा समावेश होतो.
नॅनो युरिया :
- नॅनो युरियामध्ये नत्राच्या कणाचा आकार हा २० ते ५० नॅनोमीटर इतका असतो. नॅनो युरियामध्ये नत्राचे प्रमाण हे वजनाच्या ४ टक्के असते. त्यामुळे पीकवाढीच्या मुख्य अवस्थेमध्ये नॅनो युरियाची फवारणी करून पिकाची नत्राची ५० टक्के गरज भागवता येते.
- नॅनो युरिया २ ते ४ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी यामुळे नॅनो युरियातील नत्राचे शोषण पानावरील पर्णरंध्रांद्वारे पिकाच्या पेशीमध्ये होते. शोषण केलेला नत्र पेशीतील रिक्तिकामध्ये साठवला जातो. पिकाच्या गरजेनुसार अमोनिकल आणि नायट्रेट रूपामध्ये पुरवला जातो.
- नॅनो कणांचा आकार, त्यांचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ, पर्णरंध्राद्वारे शोषण, पेशींच्या रिक्तिकामध्ये साठवण आणि गरजेनुसार पुरवठा यामुळे नॅनो युरियाची कार्यक्षमता ८६ टक्क्यांपर्यंत जाते.
- नॅनो युरिया जमिनीमधून न देता पिकाला फवारणीद्वारे देत असल्यामुळे युरियाचा जमीन आणि पाण्याशी संबंध येत नाही. कार्यक्षमता चांगली असल्यामुळे हवेमध्ये वाया जात नाही. त्यामुळे नॅनो युरिया पर्यावरण पूरक आणि शाश्वत शेतीसाठी पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक आहे.
नॅनो डीएपी :
- नॅनो डीएपी (द्रवरूप) हे एक नवीन नॅनो खत आहे. यामध्ये नायट्रोजन (८.० टक्के N w/v) आणि फॉस्फरस (१६.० टक्के P२O५ w/v) आहे. नॅनो डीएपीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ते आकारमानाच्या दृष्टीने फायदा आहे, कारण त्याचा कण आकार १०० नॅनोमीटरपेक्षा कमी आहे. या गुणधर्मामुळे ते बिया/मुळाच्या पृष्ठभागाच्या आत किंवा पानांच्या रंध्रातून आणि वनस्पतींच्या इतर छिद्रातून सहज प्रवेश करू शकतात.
- नॅनो डीएपी (द्रवरूप) मधील नायट्रोजन आणि फॉस्फरसचे नॅनो क्लस्टर बायो-पॉलिमर आणि इतर एक्सिपियंट्ससह कार्य करतात. नॅनो डीएपीची चांगल्या प्रसाराची क्षमता आणि वनस्पती प्रणालीमध्ये एकत्रीकरण केल्याने बियाण्याला अधिक जोमदारपणा येतो. अधिक हरितद्रव्य, प्रकाशसंश्लेषण कार्यक्षमता, चांगली गुणवत्ता आणि पीक उत्पादनात वाढ होते.
सल्फर-लेपित युरिया :
- जमिनीतील सल्फरची कमतरता दूर करण्यासाठी सरकारने सल्फरलेपित युरिया या खतास मान्यता दिली आहे. सल्फरलेपित युरिया इतर प्रकारांपेक्षा अधिक किफायतशीर आणि कार्यक्षम आहे.
- याची नायट्रोजन शोषण कार्यक्षमता ७८ टक्के आहे. या खताचे दीर्घायुष्य वाढवण्यासाठी ह्युमिक अॅसिड मिसळले आहे. यामुळे युरियाचा वापर कमी होईल.
- याच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य सुधारणा, शेतकऱ्यांचा खर्चात बचत, उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे शक्य आहे.
पॉली फोर :
- कोणतीही रासायनिक प्रक्रिया नसलेले आणि उत्पादनादरम्यान कार्बन फूटप्रिंट कमी असलेले पॉली फोर हे सेंद्रिय शेतीसाठी सुयोग्य असून, ते पूर्ण हंगामात पिकांना पोषण देते. हे नैसर्गिकरीत्या घडलेले, कमी क्लोराइड असलेले, अनेक पोषकद्रव्ये असलेले खत असून, पीकवाढीसाठी आवश्यक पोषकद्रव्यांपैकी पोटॅशिअम १४ टक्के, सल्फर १९ टक्के, मॅग्नेशिअम ६ टक्के आणि कॅल्शिअम १७ टक्के ही अत्यावश्यक पोषणद्रव्ये पुरवते.
- हे पूर्णपणे विद्राव्य खत असून पिकाला नियमितपणे पोषकद्रव्ये पुरवते. जमिनीतून पोषकद्रव्ये ग्रहण करण्याची क्षमता वाढवते. एमओपीच्या तुलनेत पॉली फोर हे गव्हासाठीचे सातत्यपूर्ण उपलब्धता असणारे सल्फेट-सल्फर खत आहे. पॉली फोरमुळे तृणधान्य पिकांचे शेंडे वाकण्यात घट होते.
पीडीएम खत :
- पीडीएम खत म्हणजे पोटॅश डेरीव्हड फ्रॉम मोलॅसिस. हे एक एफसीओ मान्यताप्राप्त खत आहे. त्यामध्ये १४.५ टक्के पालाश असतो.
- एमओपी खताची निर्मिती आपल्या देशात होत नाही. हे खत पूर्णपणे आयात केले जाते. सध्या त्याचे दर वाढतच आहेत, अशावेळी साखर कारखान्यातील उपपदार्थ निर्मित मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या राखेपासून हे खत तयार केले जाते.
- एमओपी खताला एक उत्तम पालाशयुक्त खताचा पर्याय पीडीएम खत होऊ शकते. यामध्ये १४.५ टक्के पालाश आहे.
source : agrowon