भेंडी लागवडीचे तंत्रज्ञान
06-01-2023
भेंडी लागवडीचे तंत्रज्ञान
भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते.
हवामान:-
भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त.
लागवडीचा कालावधी
खरीप : जून- जुलै
रब्बी : थंडी सुरु होण्यापूर्वी
उन्हाळी : १५ जाने-फेब्रु
जमीन:-
भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा वापर करावा.
जाती :-(वाण)
अंकुर ४०,पुसा सावनी,महिको १०,परभणी क्रांती,वर्षा, अर्का अनामिका,सिलेक्शन २-२,फुले उत्कर्षा,या सुधारित जाती लागवडीस योग्य आहेत.
- अंकुर ४०:- सरळ वाढणारी जात.पेरांमधील अंतर कमी फळे हिरवी.व्हेक्टरी ८-१० टन उत्पादन.
- महिको १० :- अधिक लोकप्रिय जात.फळे गर्द हिरवी.व्हेक्टरी १०-१२ टन उत्पादन.
- वर्षा :- अधिक लोकप्रिय जात.लांबी ५-७ सेमी फळे हिरवी व लुसलूशीत तोडल्यानंतर काळी पडत नाहीत.व्हेक्टरी १० ते १२ टन उत्पादन.
- पुसा सावनी :- आय.ए. आर.आय विकसित जात फ़ळे १०-१५ से.मी लांब हिरवी मुलायम झाडावर काटेरी लव देठावर तांबूस छटा फुले पिवळी व प्रत्येक पाकळीवर पिवळा ठिपका,सुरुवातीला येलो मोझॅक व्हायरस रोगास प्रतिकारक परंतु सद्या व्हायरस रोगास बळी पडते. व्हेक्टरी ८-१० टन उत्पादन.
- परभणी क्रांती :- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित जात. फळे ७-१० सेमी लांब हिरवी पुसा सावनी पेक्षा कणखर व व्हायरस रोगास प्रतिकारक,फळे नाजूक तजेलदार हिरवी.पेरणी पासून ५५ दिवसात पहिला तोडा सुरु होतो. उन्हाळ्यात १४-१६ तोडे तर खरिपात २० तोडे होतात.व्हेक्टरी ७-८ टन उत्पादन.
- अर्का अनामिका :- झाड उंच फळे लांब कोवळी हिरवी, फळाचा देठ लांब. व्हायरस रोगास प्रतिकारक. फळे तोडण्यास सोईस्कर.व्हेक्टरी ९-१२ टन उत्पादन
लागवड :-
भेंडीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात करतात.खरीपासाठी बियांची पेरणी जून- जुलै महिन्यात तर उन्हाळी हंगामासाठी पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान करावी.लागवड सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यावर करतात.खरिपात दोन ओळीतील अंतर ४५-६० व दोन रोपांतील अंतर ३०-४५ सेमी ठेवावे तर रब्बी व उन्हाळी साठी ४५ बाय १५ किंवा ६० बाय २० सेमी अंतरावर पेरणी करावी.मजुरांची अडचण असल्यास पाभरीने पेरणी करतात व ते उतरल्यावर ठराविक अंतर राखून विरळणी करावी.खरीपासाठी ८-१०किलो तर उन्हाळी लागवडी साठी १०-१२ किलो बियाणे लागते.जमिनीच्या मगदुराप्रमाणे व हवामानानुसार ५-८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.उन्हाळ्यात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दोन ओळीत सुके गवताचे आच्छादन करावे.
आंतरमशागत :-
२-३ वेळा खुरपण्या करून झाडांना भर द्यावी.मजुरांची टंचाई असल्यास बासालींन तणनाशक २-२.५ लिटर ५००लिटर पाण्यातून पेरणीपूर्वी फवारावे.तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.तणनाशकाचा फावरणीनंतर ७ दिवसांनी पेरणी करावी. फळे येण्याच्या वेळेस रोपांना भर द्यावी.
खत व्यवस्थापन :-
- सेंद्रिय व जिवाणू खते :-शेणखत/कंपोस्ट १५-२० बैलगाडी/एकर
गांडूळ खत ४००-५०० किलो प्रति एकर
निंबोळी पेंड ४ गोणी लागवडीस - जिवाणू खत :-
शेतात टाकणे- रोगप्रक्रिया केली नसल्यास एकरी ३ किलो अँझाटोबॅक्टर व ४ किलो फॉस्फोकल्चर एक बैलगाडी शेणखत मिसळून द्यावे. - रासायनिक खते :-
पेरणीच्या वेळी ५०-५०-५० किलो व्हेक्टर नत्र स्फुरद व पालाश यांची मात्रा जमिनीत मिसळावी व पेरणी नंतर एक महिन्याच्या कालावधीने नत्राचा दुसरा हफ्ता ५० किलो या प्रमाणात द्यावा पेरणी नंतर हलके पाणी द्यावे.त्या नंतर ५ -७ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
अन्नद्रव्य कमतरता :-
- स्फुरद कमतरता :
लक्षणे- झाडाची व मुळाची वाढ खुंटते .फुलगळ होते व फळे पोसली जात नाहीत .पाने मागील बाजूस वाळतात. झाडाची पाने हिरवे व जांभळट होतात.
उपाय- ००:५२:३४ १.५ किलो/२००लिटर पाणी
५:४०:२८ १ किलो/ २००लिटर पाणी
जमिनीतून स्फुरदयुक्त खताचा पुरवठा करावा. - लोह :-
लक्षणे - पाने व देठ व पिवळे दिसतात.नवीनच फुटलेले पाने पिवळी पडतात.पानामध्ये हरिद्रव्याचा अभाव दिसतो.
उपाय- फवारणी - फेरस सल्फेट ५ ग्रँ/लिटर
फेरस सल्फेट (चिलेटेड) २५ किलो प्रति व्हेक्टर जमिनीत द्यावे.
पीक संरक्षण :-
- केवडा -
हा विषाणूजन्य रोग असून त्यास येलो व्हेन मोझॅक म्हणतात.रोगट झाडाच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात पानांचा इतर भाग पिवळसर हिरवा दिसतो.भेंडी लागल्यानंतर ती पिवळी दिसते.
रोग नियंत्रण :रोगट झाडे काढून नष्ट करावीत.पांढऱ्या माशीचे वेळीच नियंत्रण करावे.या साठी मिथिल डिमॅटोन २ मिली प्रति लि किंवा क्विनॉलफॉस २ मिली प्रति लिटर या पैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी. - भुरी -
प्रथम पानांवर पांढरे डाग पडतात.डाग नंतर पसरत जाऊन संपूर्ण पानावर पावडर पसरल्यासारखे दिसते. दमट हवामानात हा रोग झपाट्याने पसरतो.पाने सुकून गळून पडतात आणि फळे लागत नाहीत.
रोग नियंत्रण : ८०% पाण्यात विरघळणारे सल्फर २.५ ग्रँम प्रती लि आणि कॅराथेन ०.५ मिली प्रती लि याची फवारणी करावी.प्रादुर्भाव जास्त दिसू लागल्यास हेक्झकोनाझॉल (कॉन्टटाफ) ०.५
मिली प्रती लिटर ह्या बुरशीनाशकाची फवारणी करावी. - शेंडा अळी व फळ पोखरणारी अळी -
या किडीची अळी पांढरट तपकिरी असून डोके गर्द तपकिरी असते.शेंड्याकडून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात.अळी देठाजवळ फळात शिरून फळाचे नुकसान करते .फळे वाकडी होतात आणि त्यावर छिद्र दिसतात.
कीड नियंत्रण-
किडलेले शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावीत.क्लोरोपायरीफॉस २ मिली प्रति लिटर व क्विनॉलफॉस २ मिली प्रति लिटर फवारावे.कार्बारील २ ग्रॅम व निंबोळी तेल ३ मिली यांची एकत्रित फवारणी करावी.किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास सायपरमेथ्रीन ०.५ मिली किंवा फेंनव्हरलेट ०.५ मिली प्रति लिटर फवारावे. जमिनीवर पडलेले कीडग्रस्त फुले,फळे आणि कळ्या जाळून नष्ट करावीत. - मावा -
कोवळ्या पानातून रस शोषल्याने पाने पिवळसर पडतात त्यामुळे पाने वेडीवाकडी दिसतात.व रोपांची वाढ खुंटते.
किडीच्या शरीरातून पातळ स्त्राव बाहेर पडतो त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते.विषाणूजन्य रोगाचा प्रसार पिकांवर होतो.पानांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा येतो.
कीड नियंत्रण-
लागवडीनंतर रोपांभोवती दाणेदार फॉरेट ५ ग्रॅम प्रती झाड या प्रमाणात रिंग करून टाकावे. निंबोळी तेल ३ मिली प्रति लिटर अधिक असिफेट २ ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉन्फिडॉर
०.५ मिली प्रति लिटर या कीटकनाशकाची फवारणी करावी - पांढरी माशी -
ह्या किडीची पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषतात.झाडाची वाढ खुंटते व भेंडी लागत नाही.पाने अर्धवट पिवळे होतात.
कीड नियंत्रण- या किडीसाठी मिथिल डिमेटोन २ मिली प्रति लिटर या पैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी.ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसू लागल्यास प्राईड ०.५ ग्रॅम प्रति लिटर फवारावे. निंबोळी तेल आलटून पालटून फवारावे. - लाल कोळी -
ह्या किडीची पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषतात त्यामुळे पानामध्ये हरिद्रव्याचा अभाव दिसतो आणि पाने मागील बाजूने लालसर होतात. हि कीड अति सूक्ष्म असून पानाच्या मागील बाजूला आढळते.
कीड नियंत्रण-
८०% पाण्यात विरघळणारे सल्फर २.५ ग्रॅम प्रति लिटर आणि इथिऑन
३ग्रॅम प्रती लिटर किंवा कॉस्केड १ मिली प्रती लिटर या पैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी. अति प्रादुर्भाव दिसल्यास व्हर्टिमेक ०.५ मिली प्रती लिटर फवारावे ओमाईट २ मिली प्रति लिटर किंवा केलथेन १.५ मिली प्रति लिटर फवारावे. - तुडतुडे -
हि कीड पानाच्या खाली राहून आतील भाग कुरडतात. पाने पिवळसर होतात.झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम दिसतो.
कीड नियंत्रण -
लागवडी नंतर रोपांभोवती दाणेदार फोरेट ५ ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात रिंग करून टाकावे. नुवाक्रॉन २ मिली प्रति लिटर किंवा मिथिल डीमेटॉन २ मिलि प्रती लिटर यांची ठराविक अंतराने फवारणी करावी.प्रादुर्भाव जास्त दिसू लागल्यास इमिडाक्लोरो प्रीड ०.५ मिली प्रति लिटर प्रमाणात फवारणी करावी. - हेलिकोव्हर्पा -
हि हिरव्या रंगाची घाटेअळी असून ती फुले, कळ्या आणि फळांना उपद्रव पोहोचवते. कीडग्रस्त फुले व फळे गळून पडतात.
कीड नियंत्रण -
किडलेले शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावीत.प्रति एकरी ५ फिरोमेन सापळे लावावीत.प्रकाश सापळ्यांचा वापर किडीचे पतंग पकडण्यासाठी करावा.एच एन पी व्ही या विषाणू ची २ मिली प्रति लिटर ची फवारणी करावी.
काढणी व उत्पादन :-
पेरणी नंतर ३५-४५ दिवसात फुले येतात व त्यानंतर ५-६ दिवसात फळे तोडणी योग्य होतात. कोवळ्या फळाची काढणी तोडा सुरु झाल्यास २-३ दिवसाच्या अंतराने करावी.तोडणीसाठी म. फु.कृ. विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या भेंडी हार्वेस्टचा वापर करावा.
निर्यातीसाठी ५-७ सेमी लांब कोवळी एकसारखी फळाची तोडणी करावी. काढणी सकाळी लवकर करावी. काढणी नंतर शून्य ऊर्जा शीत कक्षा मध्ये भेंडीचे पूर्व शीतकरण करावे. खरिपातील उत्पादन व्हेक्टरी १०-१२ टन तर उन्हाळी हंगामात ६-७ टन पर्यंत मिळते.
एकात्मिक कीड नियंत्रण :-
- एकाच जमिनीत भेंडीचे पीक सतत घेऊ नये. भेंडीचे पीक घेण्यापूर्वी पूर्वीच्या पिकाचे अवशेष नष्ट करावेत.
- पिकाच्या वाढ अवस्थेत रासायनिक नत्र खताचा वापर कमी करून पोषण संतुलन करावे.
- एखाद्यकीडीचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या कीटकनाशकाचा कमीतकमी वापर करावा.
- शेंडे अळीचा नियंत्रणासाठी शेंडे काढून जाळावीत.गंध सापळे व प्रकाश सापळे यांचा वापर करावा.
- अंडी नियंत्रणासाठी अमावस्येनंतर ३ दिवसांनी क्युराक्रोन ची फवारणी करावी.
- सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अधून मधून झेंडूचे आंतरपीक घ्यावे.
- मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर करावा भेंडी महीती