मिरचीच्या दरात मोठी घसरण, शेतकरी चिंताग्रस्त...
31-07-2024
![मिरचीच्या दरात मोठी घसरण, शेतकरी चिंताग्रस्त...](/_next/image?url=https%3A%2F%2Fstatic-img.krushikranti.com%2Fimages%2F1722417601104.webp&w=3840&q=75)
मिरचीच्या दरात मोठी घसरण, शेतकरी चिंताग्रस्त...
जालना जिल्ह्यामधील भोकरदन या तालुक्यातील धावडा व रेणुकाई पिंपळगाव येथील ठोक बाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणात मिरची आवक झाल्याने ७० टक्क्यांनी मिरचीचे भाव कमी झाले आहेत. बाजारामध्ये मिरचीची मोठी आवक झाल्यानमुळे ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ शेतकरी बांधवांवर आली आहे.
बाजारपेठेत रोज शेतीमालाचे दर घसरत आहेत. त्यामुळे, लागवडीचा खर्च सुद्धा निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सुरुवातीला १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत अशे दर पोहोचले होते.
आता त्यामागे ९ ते १० हजारापर्यंत भाव खाली आले पण मंगळवारी हे भाव तर ३ ते ५ हजारांवर आल्याने शेतकर्यांचा फवारणी, निंदणीसह तोडणीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या दरम्यान, तालुक्यात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे बाजारात सर्वाधिक हिरवी मिरची आवक झाली आहे. एका शेतकर्याला एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च लागला आहे.
एप्रिल पासून मिरचीचा चौथा ते पाचवा तोडा तोडणे सुरू आहे, सुरुवातीला काळी मिरचीला ११० रुपये किलो असा दर होता. आता ही मिरची ५० रुपये किलो अशी विक्री होत आहे.
सुरुवातीचे भाव चांगले असल्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते; पण, मंगळवारी हे भाव खूपच खाली आल्याने शेतकरी नाराजीत आहेत. सध्या भोकरदन तालुक्यासह इतर भागांत मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आहे.
त्यामुळे धावडा, रेणुकाई पिंपळगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणामध्ये आवक वाढल्याने मिरचीचे दर घसरून त्याचा फटका शेतकर्यांना बसला आहे.
मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव अधिक:
सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या दराने शेतमाल विक्री करावा लागत आहे. विक्री न झाल्यास माल फेकून द्यावा लागेल.
या भीतीमुळे मंगळवारी व्यापार्यांनी मागितलेल्या भावात मिरची देऊन टाकली आहे. यंदा मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव अधिक झाल्याने उत्पादक शेतकरी तोट्यात आहे.
तोडणीसह वाहतूक खर्च सुद्धा वाढला:
- मिरचीचे रोप लागवडीपासून तर तोडणीपर्यंत शेतकर्यांना एका एकरसाठी किमान ७० ते से ८० हजार रुपये खर्च येतो.
- यामध्ये तोडणीसाठी मजूर मिळत नसल्याने एक किलो मिरची तोडण्यासाठी गाडी भाड्यासहित ९ रुपये मजूरी द्यावी लागते.
- यंदा वाहतूक खर्चसुद्धा वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
बाजार समितीमध्ये मिरचीचे ठोक भाव:
मिरचीचा प्रकार | पूर्वीचे दर | मंगळवारचे भाव |
---|---|---|
काळी मिरची | १२० रुपये | २५-३० रुपये |
रुवेलरी (पांढरी) | ८० रुपये | ४५ रुपये |
शिमला | ६० रुपये | ३० रुपये |
बळीराम | ७० रुपये | ३० रुपये |
पिकेडोर | ८० रुपये | ३० रुपये |