जतमध्ये अवकाळीच्या पंचनाम्यांत गडबड
06-04-2024
जतमध्ये अवकाळीच्या पंचनाम्यांत गडबड
कृषी, ग्रामपंचायती आणि महसूल विभागाने चुकीच्या पद्धतीने पंचनामे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जत तालुक्यातील वाषण आणि वज्रवाड या दोन गावांतील शेतकऱ्यांच्या नावावर द्राक्षांचे पीक नसतानाही त्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे अवकाळीने बाधित झालेल्या पिकांच्या पंचनाम्यात गोलमाल उघड झाल्याने शेतकरी संतप्त आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे जत तालुक्यातील द्राक्ष आणि डाळिंबाच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने कृषी, ग्रामपंचायती आणि महसूल विभागांना दिले आहेत.
कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचमाने करून त्याचा अहवाल करायचा असतो. त्यानुसार या तिन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी पंचमाने केले. त्यानंतर हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देण्यात आली.
दरम्यान, वाषण आणि वज्रवाड गावातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची माहिती मिळाली. त्यामध्ये या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या नावे सात-बारावर द्राक्ष बागांची नोंद आणि क्षेत्रच नाही, अशा शेतकऱ्यांना मदत मंजूर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन गावांमध्ये अशी गोष्ट उघडकीस आली असल्याने, जत तालुक्यातील आणखी किती गावांनी अशा प्रकारे बनावट पंचनामे केले आहेत आणि अद्याप पीक नसणाऱ्या किती शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली आहे हे कळू शकलेले नाही.
शेतकऱ्यांनी हा प्रकार कृषी विभागाच्या निदर्शनास आणून दिला. परंतु कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष पंचनाम्याच्या वेळी त्यांचे अधिकारी तेथे उपस्थित होते. गावातील एका शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, पंचनामा करण्यासाठी ग्रामसेवक आणि तलाठीही तिथे उपस्थित होते. मग ज्या शेतकऱ्यांच्या नावावर द्राक्षे नाहीत, त्यांना मदत कशी मंजूर केली जाते ", असा सवाल त्यांनी केला. कृषी, ग्राम पंचायत आणि महसूल विभागाच्या संगनमताने हे पंचनामे करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
तलाठी, ग्रामसेवकांचा काणाडोळा
खरे तर, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे ग्रामस्तरीय समित्यांनी संयुक्तपणे करणे अपेक्षित आहे. कृषी विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ज्या सज्जामध्ये अवकाळीमुळे नुकसान झाले नाही, अशा सज्जामधील कृषी सहायकांना अतिरिक्त जबाबदारी दिली होती. त्यानुसार, बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी कृषी सहाय्यक उपस्थित होते. मात्र, तलाठी आणि ग्रामसेवक कुठेही उपस्थित नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.