सकस हिरव्या चाऱ्यासाठी चवळी लागवड
06-09-2022
सकस हिरव्या चाऱ्यासाठी चवळी लागवड
चवळी हे व्दिदल वर्गातील पीक खरीप व उन्हाळी हंगामात हिरव्या चाऱ्यासाठी घेण्यात येते. चवळीपासून जनावरांना पालेदार, रुचकर सकस हिरवा चारा मिळतो तर चवळी या पीकाच्या मुळावर रायझोबियम जिवाणू गाठीच्या स्वरूपात हवेतील नत्र साठवतात हे नत्र स्थिरीकरणाचे प्रमाण हेक्टरी २५ ते २० किलो पर्यंत होते त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते व हे पीक मिश्रपीक म्हणून घेता येते. (उदा. ज्वारी, बाजरी, मका)
जमीन:-
चवळी पीकाच्या उत्तम वाढीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य असते व खताचा योग्य वापर केल्यास हलक्या जमीनीतही पीकाची वाढ चांगली होते.
पूर्व मशागत:-
लागवडीपूर्वी नांगरणी करून कुळवाच्या दोन पाळ्या देवून हेक्टरी ५ टन शेणखत व कंपोस्ट खत पुर्वमशागतीवेळी जमीनीत मिसळावे.
बियाणे प्रमाण:-
चाऱ्याकरिता ४० किलो प्रतिहेक्टरी व बियाणेकरीता २५ किलो प्रतिहेक्टरी बियाणे लागवडीसाठी वापरावे.
पेरणीची योग्य वेळ:-
चवळी पीकाची पेरणी हि खरिप हंगामात जुन ते ऑगस्ट व उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते एप्रिल महिण्यात करावी.
बीजप्रकिया:-
चवळी पीक व्दिदल वर्गीय असल्यामुळे पीकाच्या मुळावरील रायझोबियम जिवाणूच्या गाठी हेवेतील नत्र शोषून घेऊन जमीनीत साठवतात त्यामुळे जमीनीचा पोत व सुपिकता सुधारते यासाठी मुळावरील गाठी वाळवणे यासाठी रायझोबियम जिवाणू संवर्धन २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपुर्वी चोळावे.
लागवड पद्धत:
जमीन, हवामान व पाण्याच्या उपलब्धेनुसार जातींची निवड करून लागवड करावी. लागवड करतांना २ ओळीत ३० से.मी. अंतर सोडून पाभरीने करावी त्यामुळे आंतरमशागत करणे सोपे ठरते.
सुधारित जातींची निवड:-
चवळी पीकाच्या सुधारीत जातींमध्ये श्वेता , यु.पी.सी. – ९२०२ , बुंदेल लोबीया , यु.पी.सी. -५२८६ , ई.सी. – ४२१६ , रशियन जायंट जातींची निवड करावी.
श्वेता वाणाचे वैशिष्टे:
हा वाण चाऱ्यासाठी राज्यस्तरावर शिफारशीत असून वाणारा भरपूर हिरवी रुंद पाने असून पानांची हिरव्या चाऱ्याची प्रत फुलधारणेपासून शेंगा पक्ष होईपर्यंत टिकुन राहते. या वाणापासून उत्तम प्रतीचा हिरवा चारा मिळतो.
खत व्यवस्थापन:
पुर्वमशागतीवेळी ५ टन शेणखत व कंपोस्ट खत वापरावे शिफारशीत रासायनिक खताचा डोस हा नत्र २० किलो स्फुरद ४० किलो पालाश ४० किलो प्रतीहेक्टरी द्यावे.
आंतरमशागत:-
बियाणे पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी १ खुरपणी करून पीक तणमुक्त करावे. पीकाव्या २ ओळीमधील जमीन हात कोळप्याने कोळपून घ्यावी. चवळीचे वेल उंच व दाट वाढत असल्याने पीक वाढीच्या काळात जमीन झाकली जाऊन तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
पाणी व्यवस्थापन:-
चवळी पेरणीनंतर लगेच एक पाणी द्यावे व त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे . उन्हाळी हंगामात ७ ते ८ व खरीप हंगामात १० ते १५ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देणे गरजेचे आहे .
आंतरपीकांचा अवलंब:-
लागवड करतांना एकदल पीकाच्या दोन ओळीनंतर एक किंवा दोन ओळी चवळी पीकाची लावावी हेच प्रमाण २ : १ किंवा २ : २ असे ठेवावे . ( उदा . हे पीक मका , ज्वारी , बाजरी या एकदल चारा पीकांमध्ये अंतरपीक म्हणुन घेता येते . )
कापणी व उत्पादन:-
चवळी पिकाची कापणी पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी पीक ५० टक्के फुलोऱ्यात असतांना केल्यास हिरव्या चाऱ्याचे भरपूर उत्पादन मिळते सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याचे उत्पादन प्रतीहेक्टरी २५० ते ३५० क्विंटल मिळते
प्रा. संजय बाबासाहेब बड़े
सहाय्यक प्राध्यापक (कृषि विद्या)
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगांव
ता वैजापूर जि.औरंगाबाद. मो. नं. ७८८८२ ९ ७८५९