सध्याच्या काळात सर्रास केली जाते रासायनिक शेती! मग जमिनीचा दर्जा टिकणार तरी कसा?
01-08-2024
सध्याच्या काळात सर्रास केली जाते रासायनिक शेती! मग जमिनीचा दर्जा टिकणार तरी कसा?
अधिक आणि झटपट उत्पन्नाच्या बळी पडून नैसर्गिक शेतीला फाटा देत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकर्यांनी रासायनिक शेतीला प्राधान्य दिले आहे. पश्चिम वन्हाडातील तीन जिल्ह्यांचा विचार केल्यास एकट्या खरीप हंगामात सुमारे २५ लाख लिटर 'पेस्टीसाईड' (कीडनाशक) आणि 'विडीसाईड' (तणनाशक) वापरले जात आहे. ही बाब जमिनीला नापिक बनविण्यास कारणीभूत ठरत असून, मानवी आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम करणारी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम वन्हाडातील अकोला जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीखाली ४ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्र असून, वाशिम जिल्ह्यात ४ लाख ५ हजार; तर बुलढाणा जिल्ह्यात ७ लाख ३५ हजार अशा एकंदरित १५ लाख ८३ हजार हेक्टरवर पिकांची लागवड केली जाते.
त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे असून, या पिकावर प्रत्येकवर्षी हिरवी उंटअळी, शेंडेअळी, चक्रीभुंगा, तंबाखूची पाने खाणारी अळी आदींचा प्रादुर्भाव होणे निश्चित आहे.
त्यावर नियंत्रणासाठी हेक्टरी अर्धा लिटर याप्रमाणे ७ लाख ९० हजार लिटर कीडनाशक फवारले जाते. यासह हेक्टरी १ लिटर याप्रमाणे १५ लाख ८० हजार लिटर तणनाशकाचा वापर केला जात आहे.
कीडनाशकाचा दर वाढला:
सोयाबीनवरील हिरवी उंटअळी, शेंडेअळी, चक्रीभुंगा आणि अव्यांच्या अंडीला नष्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कीडनाशकाचा दर ६५० ते ७०० रुपये प्रतिलिटर आहे. दोन हेक्टरसाठी १ लिटर औषध लागत असून ७ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हेच औषध प्रामुख्याने वापरले जात आहे.
तणनाशकाचा दर एक हजार रुपयांच्या :
खरिपातील एकदल आणि द्विदलवर्गीय तण नष्ट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तणनाशक औषधीचा दर सध्या हजार रुपये प्रतिलिटर आहे.
एका लिटरमध्ये साधारण एक हेक्टर क्षेत्रातील तण नष्ट होऊ शकते. त्यानुसार, एकूण क्षेत्रासाठी १५ लाख ८० हजार लिटरपेक्षा जास्त तणनाशकाचा वापर दरवर्षी केला जात आहे.
खरीप हंगामात 'पेस्टीसाईड' आणि 'विडीसाईड'चा वापर कमीत कमी कसा करता येईल, याचा विचार शेतकर्यांनी करणे अत्यावश्यक आहे. रासायनिक द्रव्य, खत न वापरता सेंद्रिय पद्धतीच्या शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे.