तुरीचा भाव वाढला पण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली…
21-05-2024
तुरीचा भाव वाढला पण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली…
सध्या तूर 12 हजार रुपयांवर गेली आहे. तर दुसरीकडं सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण सोयाबीनचे दर जेवढे होते तेवढेच आहेत.
सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण तुरीच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तूर 12 हजार रुपयांवर गेली आहे. तर दुसरीकडं सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण सोयाबीनचे दर जैसे थे आहेत. त्यामुळं तुरीचे दर वाढले सोयाबीनचे दर कधी वाढणार? असा प्रस्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.
तुरीला आणि हरभऱ्याला मिळतोय विक्रमी दर
शेतीमालाच्या दरावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीमालाची आवक वाढली असताना दरातही चांगला मिळत आहे. त्यामुळे किमान खरीप हंगामासाठी पैशाची जुळवाजुळव होऊ लागली आहे. सोयाबीन या मुख्य पिकाने शेतकऱ्यांची निराशा केली असली तरी तुरीला आणि हरभऱ्याला विक्रमी दर मिळाला आहे.
हरभऱ्याला 6 हजार 200 रुपयांचा दर
शेतशिवारत सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. मशागतीसह पेरणी, बी-बियाणे यासाठी शेतकऱ्यांचा खर्च होणार आहे. गतवर्षी निसर्गाचा लहरीपणा असतानाही सोयाबीनचे उत्पादन वाढले पण वर्षभरापासून दर नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. दुसरीकडे तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली असून बाजारपेठेत उच्चांकी दर मिळत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लातूर कृषी बाजार समितीमध्ये तुरीला 12 हजार रुपये तर हरभऱ्याला 6 हजार 200 रुपये असा दर मिळाला होता. वाढत्या दराचा ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. दुसरीकडे सोयाबीनची आवक 9 हजार 300 क्विंटल असताना 4 हजार 500 असाच दर मिळाला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक नाराज आहे तर वाढीव दर मिळत असलेल्या तूर उत्पादकांची संख्या मोजकीच आहे. रब्बी हंगामातील हरभरा पिकाचा शेतकऱ्यास दिलासा मिळत असून असेच दर कायम राहण्याची शेतकरी अपेक्षा करीत आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात कापसानंतर सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असेत. मात्र, ज्यावेळी माल शेतकऱ्यांच्या हातात येतो, त्यावेळी दरात मोठी घसरण होते. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसता. कधी कधी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. कधी शेतकऱ्यांच्या पिकाला अवकाळीचा फटका बसतो तर कधी दुष्काळाचा फटका बसतो. तर या आस्मानी संकटातून बाहेर पडलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी संकट गाठते, अशी शेतकऱ्यांची स्थिती होत आहे.