विदर्भ आणि कोकणात अवकाळी पावसामुळे पिकाचे तसेच फळबागांचेही मोठे नुकसान

25-04-2024

विदर्भ आणि कोकणात अवकाळी पावसामुळे पिकाचे तसेच फळबागांचेही मोठे नुकसान

विदर्भ आणि कोकणात अवकाळी पावसामुळे पिकाचे तसेच फळबागांचेही मोठे नुकसान 

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. कोकणात आज पुन्हा काही भागात अवकाळी पाउस पडला आहे. याशिवाय, अवकाळी पावसामुळे विदर्भालाही मोठा फटका बसला आहे, ज्यामुळे भात पिकाचे तसेच फळबागांचेही नुकसान झाले आहे.

कोकणात (Kokan) पुन्हा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे.त्यामुळे आंबा उत्पादक आंबा चिंतेत पडले आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज कोकणातील काही भागात अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. सकाळपासून रायगड, रत्नागिरी सीमेवरील भागात ढगाळ वातावरण पसरल्याने दमट हवा पाहायला मिळाली. आकाशात काळे ढग पसरले होते, यावरून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. अखेर पावसाने काल सकाळी 8 वाजेपासून हजेरी लावली. 

हिंगोलीत जोरदार अवकाळी पाऊस

हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मंगळवारी रात्री जोरदार स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी वाळू घातलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणात या पावसाने नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी हळदीची काढणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हळद शिजवून शेतामध्ये वाळू घातली होती. परंतु रात्री झालेल्या पावसामुळे ही हळद पूर्णपणे भिजवून गेली आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की हळद भिजवल्यामुळे या हळदीची बाजारात किंमतही मिळणार नाही, त्यामुळे अर्ध्या भावात बाजारात विकावी लागेल. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सातारा आणि परभणीमध्ये पाऊस

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कराड भागात मुसळधार पाऊस झाला आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी आणि बुधवारी या भागात मुसळधार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. परभणीत आज सायंकाळपासून पुन्हा तुफान पाऊस बरसतोय. परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. विजांच्या कडकडाटासह सर्वत्र जोरदार पाऊस पडत असल्याने उन्हाळा सुरु आहे की, पावसाळा असा प्रश्न परभणीकरांना पडला आहे.

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीसह फळबागांचं नुकसान

वाशिममध्ये मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अर्ध्या तासाच्या वादळी वाऱ्याने होत्याच नव्हत झालं. वाशिमच्या कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मेहा येथील चार एक्कर क्षेत्रातील पपई पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे.   परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मेहा येथील शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. मोठ्या कष्टाने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या पपई बागेचे अर्ध्या तासाच्या अवकाळी वादळी पावसामुळे होत्याच नव्हत झालं. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

अवकाळी पावसामुळे भात पिकांचं प्रचंड नुकसान

भंडाऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे कापणीला आलेल्या भातपिकांच्या लोंबी गळून पडल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्यानं शेतकरी चिंतातूर झाला आहे. दरम्यान, जोरदार पाऊस सुरू असताना अनेक भागातील वीजपुरवठा बऱ्याच काळासाठी खंडित झाला होता. या पावसाचा अन्य पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात आज सकाळपासूनही हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत.

झाडं कोसळल्यानं मोठं नुकसान, दुचाकीस्वार झाला जखमी

वादळी वारा आणि पावसामुळे कोल्हापूर शहरात दोन ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. झाड कोसळल्याने दोन चारचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान गाडी रस्त्याच्या कडेला लावलेली होती. त्यामुळे, मोठा अनर्थ टळला. परिख फुलाजवळ झाड कोसळल्याची घटना घडली आहे. 
कोल्हापूर शहर वाहतूक शाखेजवळ देखील आणखी एक झाड कोसळलं. एका दुचाकीवर झाड कोसळल्याने दुचाकीस्वार देखील जखमी झाला आहे.

unseasonal rain, weather, weather forcast, rain

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading