तुरीचे दर सध्या तेजीत, पण तरीही तुरीची लागवड यंदा १८ टक्क्यांनी कमी
25-07-2023
तुरीचे दर सध्या तेजीत, पण तरीही तुरीची लागवड यंदा १८ टक्क्यांनी कमी
देशात सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत. सरकारनेही हमीभावाने तूर खेरदीवरील बंधनं काढली, हमीभावातही वाढ केली. पण देशातील तुरीची लागवड गेल्यावर्षीपेक्षा कमीच दिसते. देशात आतापर्यंत २७ लाख हेक्टरवर तुरीची लागवड झाली. म्हणजेच गेल्यावर्षीपेक्षा तुरीखालील क्षेत्र १८ टक्क्यांनी कमी आहे.
देशात सध्या तुरीचा तुटवडा जाणवत आहे. देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. तुरीला सध्या ९ हजार ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात यंदा तुरीचा पुरवठा कमी आहे. पुरवठ्यात यंदा १७ लाख टनांची तूट असल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले. तुरीचा पुरवठा कमी असल्याने दरातील तेजी पुढील काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे.
ऐन लागवडीच्या काळात तुरीच्या दरात तेजी असल्याने शेतकरी तूर लागवडीला प्राधान्य देतील असे वाटत होते. त्यातच सरकारने हमीभावाने तूर खेरदीवरील मर्यादा काढली होती. म्हणजेच शेतकरी आपला संपूर्ण माल हमीभावाने सरकारला विकू शकतात. पण जून महिन्यात लांबलेल्या पावसाने तूर लागवड वाढीच्या मनसुब्यावर पाणी फेरले.
कडधान्याचा पेरा यंदा जवळपास १० टक्क्यांनी घटल्याचे दिसते. कडधान्याचा पेरा ८६ लाख हेक्टरपर्यंतच पोचला. कडधान्यामध्ये तुरीच्या लागवडीत झालेली घट जास्त आहे. तुरीखालील क्षेत्र १८ टक्क्यांनी घटले. मुगाची लागवडही दोन टक्क्यांनी कमी झाली असून उडदाचे क्षेत्रही जवळपास १० टक्क्यांनी घटले आहे. तुरीची लागवड आतापर्यंत २७ लाख हेक्टरवर पोचली.
तूर उत्पादनात महत्वाच्या महाराष्ट्रात लागवड सात टक्क्यांनी पिछाडीवर असून ९ लाख ६० हजार हेक्टरवर पोचली. तर कर्नाटकातील तूर लागवड तब्बल ४१ टक्क्यांनी कमी आहे.देशातील कोरवाहू तूर लागवडीचा कालावधी आता संपला. देशात जवळपास ९५ टक्के तूर पीक कोरडवाहू आहे. त्यामुळे शेतकरी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तूर लागवड करण्याची शक्यता खूपच कमी आहे. परिणामी यंदा तुरीखालील क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
source : agrowon