सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव; 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट…
16-11-2024
सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव; 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट…
तमिळनाडू व केरळ या राज्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सध्या सतत हवामानामध्ये बदल होताना दिसत आहे. मुंबईसह उपनगर आणि महाराष्ट्रात हवेतील उष्णतेमध्ये वाढ होत आहे.
तापमानाचा पारा वाढल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या २४ तासामध्ये तापमानात कोणतीही घट झालेली नाही. येत्या २४ तासात विशेष तापमानात घट होईल, याची शक्यता कमी आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज (१६ नोव्हेंबर) रोजी पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील, वीजपुरवठाही खंडीत केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात आज हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, लातूर या जिल्ह्यात आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
आंबा आणि काजू बागायतदारांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील पाच दिवसांमध्ये २ ते ३ अंश डिग्री सेल्सियसने तापमान खाली उतरण्याची शक्यता आहे. पण, थंडीसाठी आणखी थोडी वाट पाहायला लागू शकते. याचे प्रमुख कारण असे आहे की, सायक्लोनिक सर्क्युलेशनामुळे हवामानात बदल होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रामधील हवामान:
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा जोर पुन्हा कमी झाला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुन्हा पाऊस पडतोय. पुणे जिल्ह्यामध्ये आज वातावरण ढगाळ राहणार आहे.
तर आज कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि २२ अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. मागील २ दिवसांपासून साताऱ्यात काही भागात पाऊस झाला. आज देखील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार आहे. तर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस कमाल आणि २० अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
सांगली जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली होती. आज पुन्हा काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. येथील तापमान वाढले असून कमाल ३२ तर किमान २२ अंश सेल्सिअस तापमान असेल.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वातावरणात बदल झाला असून ढगाळ राहणार आहे. शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) रोजी जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी बरसल्या. आज कोल्हापूरचे ३० अंश सेल्सिअस कमाल तर २१ अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
येत्या २ दिवसांमध्ये थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला:
मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याने व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्याकारणामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.