गाईच्या दुधाच्या अनुदानासंदर्भात माहिती सादर करण्याची तारीख वाढवली
26-04-2024
![गाईच्या दुधाच्या अनुदानासंदर्भात माहिती सादर करण्याची तारीख वाढवली](/_next/image?url=https%3A%2F%2Fstatic-img.krushikranti.com%2Fimages%2F1714124619372.webp&w=3840&q=75)
गाईच्या दुधाच्या अनुदानासंदर्भात माहिती सादर करण्याची तारीख वाढवली
राज्य सरकारने गायीच्या दुधासाठी अनुदान जाहीर केल्यानंतर सहकारी दूध संस्थेने इअर टॅगींग असलेल्या गायींची माहिती भरण्याचे कामयुद्धपातळीवर सुरू केले. परंतु काही कारणास्तव अनेक गायी यापासून वंचित राहिल्या आणि त्यांना अनुदान मिळेल की नाही याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान यावर आता सरकारने मुदतवाढ दिली आहे.
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाच्या अनुदानासाठी 11 जानेवारी ते 10 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. दरम्यान राज्य शासनाने मंगळवार (दि. ३०) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वंचित शेतकऱ्यांनी दूध संघांच्या माध्यमातून ही माहिती भरण्याची तारीख पुन्हा वाढवून अंतिम तारीख देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी ४७ हजार ८८२ शेतकऱ्यांना २० कोटी ३७ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
जानेवारीत राज्य सरकारने गायीच्या दुधाच्या किंमतीत घट झाल्यामुळे प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. 11 जानेवारी ते 10 मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीसाठीही अनुदान देण्यात आले आहे. यासाठी शासनाच्या अॅपद्वारे पशुधन, दुधासह इतर माहिती भरायची होती.
पशुधन टॅगींग असणे बंधनकारक असल्याने अनेक दूध उत्पादकांची अडचण झाली होती. 'गोकुळ' दूध संघाने प्राधान्याने हे काम केल्याने त्यांच्या ३९ हजार शेतकऱ्यांना १४ कोटी ३६ लाख रुपये अनुदानाचा लाभ मिळाला आहे. त्या पाठोपाठ वारणा दूध संघाच्या ६९०२ शेतकऱ्यांना ३ कोटी ७० लाख रुपये अनुदान मिळाले.
अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. माहिती नमुन्यात न भरल्याने त्यांची नावे पात्र ठरलेले नाहीत. या शेतकऱ्यांसाठी मंगळवारपर्यंत नव्याने दुधाची माहिती भरता येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा दुग्ध विकास अधिकारी प्रकाश आवटे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांना वेळेत दुधाची माहिती भरता आलेली नाही. त्यांना मुदतवाढ दिली असून, आपल्या दूध संघांच्या माध्यमातून ती भरून अनुदानाचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील दूध संस्थांनीही वंचित शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन दुग्ध विकास अधिकारी आवटे यांनी केले.