गेल्यावर्षी पेक्षा नॅनो युरियाला यंदा मोठी मागणी...
05-07-2024
गेल्यावर्षी पेक्षा नॅनो युरियाला यंदा मोठी मागणी...
नॅनो युरिया खता विषयी शेतकर्यांमध्ये गेल्या वर्षी गैरसमज अधिक असल्याने वापर हा कमी झाला होता. पण, यंदा च्या खरीप हंगामात अनेकांचे गैरसमज दूर झाल्यामुळे मागणी वाढली.
त्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने नॅनो युरिया खताच्या तब्बल ६२ हजार ९०० बॉटल आवंटीत केल्या. यामधून २ हजार ८३० मेट्रिक टन युरियाची बचत होणार आहे, असा दावा अधिकार्यांनी केला आहे.
कशी घ्याल खबरदारी:
- नॅनो युरियाची बाटली वापरण्यापूर्वी व्यवस्थित हलवा.
- नॅनो युरिया हे विषमुक्त आहे तरीही सुरक्षिततेसाठी पिकावर फवारणी करताना फेस मास्क आणि हातमोजे वापरावे.
- एकसमान फवारणीसाठी सपाट पंखा किंवा कट नोजल वापरा. सकाळी किंवा संध्याकाळीच फवारणी करावी.
- लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवावी.
गेल्या वर्षीची स्थिती:
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या वर्षी २०२३ मध्ये ११ हजार ७६४ बॉटल मागविण्यात आल्या होत्या. यामधून ५२९ मेट्रिक टन युरियाची बचत झाली. यंदा च्या खरीप हंगामात कृषी विभागाने ६२ हजार ९०० बॉटल आवंटीत केल्या.
नॅनो युरिया म्हणजे काय?
नॅनो युरिया हे प्रामुख्याने नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आलेले खत आहे. कृषि तज्ज्ञांच्या मते, हे खत पिकांची नायट्रोजनची गरज पूर्ण करते. शेतकर्यांना सर्वांत जास्त प्रमाणात युरिया लागत असतो.
परंतू युरियाचा काही प्रमाणात तुटवडा भासत असल्याने यावर सरकारने पर्याय म्हणून नॅनो युरियाचा पुरवठा करीत आहे. या युरियाची अर्धा लिटरची बाटली पारंपरिक युरियाच्या एका पोत्याएवढे पोषक तत्त्वे देतो. पिकांच्या उत्पादनासाठी फायदेशीर आणि उत्पन्नात वाढीला मदत करतो.
असा होतो नॅनो युरियाचा फायदा:
नॅनो युरियाची पिकांच्या पानांवर फवारणी केल्यानंतर तो सहजपणे पर्ण रंध्रातून वनस्पती पेशीमध्ये प्रवेश करतो. पेशीमध्ये त्यांचे एकत्रीकरण केले जाते आणि पिकाच्या गरजेनुसार वनस्पतीमध्ये तो वितरित केला जाते. युरिया मुळे जमिनीचा पोत खराब होत होता. पण द्रवरूप स्वरूपातील नॅनो युरिया पिकांसाठी उपयुक्त ठरला.