सेंद्रिय शेती म्हणजे काय? जैविक, सेंद्रिय अन नैसर्गिक शेतीत नक्की काय फरक? जाणून घ्या सोप्या भाषेत
27-12-2022
जैविक, सेंद्रिय अन नैसर्गिक शेतीत नक्की काय फरक? जाणून घ्या सोप्या भाषेत
शेतकरी मित्रांनो आपण अनेकदा रासायनिक खतांच्या अतिवापराने घाईला येतो. रासायनिक खतांनी शेतीतला खर्च तर वाढतोच पण त्याचसोबत जमिनीचा पोलहि खालावतो. वर्षानुवर्षे रासायनिक खते वापरून जमिनीची उत्पादकता कमी होते अन जमीन नापीक बनते. आजकाल अनेक शेतकरी यामुळे जैविक, सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीकडे वळले आहेत. मात्र तुम्हाला जैविक, सेंद्रिय अन नैसर्गिक शेतीत नक्की काय फरक आहे याबाबत माहिती आहे काय? आज आम्ही तुम्हाला याबाबतच अगदी सोप्या भाषेत माहिती देणार आहोत.
जैविक शेती :
ही एक रसायन मुक्त शेती पद्धती आहे ज्यामधे पिकाच्या जास्त उत्पादनासाठी सूक्ष्म जीवाणूंवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या कार्यावर जास्तीत जास्त भर देण्यात आला आहे. ज्यामुळे पिकाची निकोप वाढ होऊन भरपूर उत्पादन मिळू शकेल.
सेंद्रीय शेती:
या प्रकारमधे रासायनिक संसाधनांचा वापर न करता, सेंद्रीय निविष्ठा उदा. जनावरांचे शेण, मूत्र, पिकांचे उरलेले अवशेष किंवा त्यापासून तयार होणारे कंपोस्ट, हिरवळीची खते अशा घटकांचा वापर करून जमीनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे , ज्यामुळे जमीनीत गांडुळांची व सूक्ष्म जीवाणूंची वाढ होऊन जमीन सुपिक बनते व पिकाची निरोगी व निकोप वाढ होते.
नैसर्गिक शेती:
पिकाच्या वाढीसाठी व संरक्षणासाठी केवळ नैसर्गिक संसाधनांचा वापर करून केलेली शेती म्हणजेच नैसर्गिक शेती. ही नैसर्गिक संसाधने म्हणजेच 1)जनावरांचे शेण, 2)मूत्र, 3)पिकांचे उरलेले अवशेष. या व्यतिरीक्त मिश्र पिके, सापळा पिके आच्छादन पुरविणारे पिके यांचा अंतर्भाव केल्याने जमीनीतील सेंद्रीय कर्ब वाढून सूक्ष्म जिवाणूंना वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते परीणामी पिके निरोगी वाढतात व उत्पादनातही वाढ होते.
वरील तीनही प्रकार एकमेका सापेक्ष आहेत. सूक्ष्मजिवाणूंची वाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे सूक्ष्मजिवाणू मृत अथवा जिवीत सेंद्रीय पदार्थांवरच आपली उपजीवीका करतात. आणि हे सेंद्रीय पदार्थ केवळ निसर्गाद्वारेच प्राप्त होऊ शकतात. या निसर्ग चक्रातील एखाद्या घटाकाच्या आधारे जर कोण्या शास्त्रज्ञाने अथवा संशोधकाने आपल्या पद्धतीचे नामकरण केले असेल तर उरलेल्या इतर घटकांचे अस्तित्व नाकारता थोडेच येइल.
आता यातील सेंद्रीय हे नाव कसे प्रचलित झाले?
सर्व सजीवांच्या शरीररचनेतील मूलभूत घटक म्हणजे कर्ब किंवा कार्बन आहे. या कार्बनची अनेक रूपे आहेत त्यापैकी कार्बन मोनॉक्साईड व कार्बन डायऑक्साईड ही दोन वायुरूप अवस्था वगळता बाकी सर्वच रूपे सेंद्रीय आहेत. म्हणून या सेंद्रीय रूपातील घटकावर आधारीत शेतीला इ.स.१९४२ मधे जे.आय. रोडले या अमेरीकन शास्त्रज्ञाने आपल्या नियतकालिकामधे (सेंद्रीय शेती) असे नामकरण केले. गमतीचा भाग असा की या मूलत: सेंद्रीय रूपात असलेल्या कर्बास आपल्या भारतातील काही अति विद्वान मंडळी “सेंद्रीय कर्ब” असे संबोधतात.
इतरही काही शब्दांचे अर्थ जाणुन घ्या
कंपोस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे विघटनाचे तंत्रज्ञान
वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडुळांद्वारा विघटित खत
बायोडायनामिक :
ही एक प्रकारची सेंद्रीय शेती पद्धतीच आहे. रूडॉल्फ स्टेनर नामक ऑस्ट्रीयन शेती तज्ञाद्वारा संशोधित
ही पद्धती आहे, ज्याचे नामकरण म्हणजे जैविक व म्हणजे गतिशीलता असे आहे.
एखादी संकल्पना अस्तित्वात आली की त्यावर आधारीत उत्पादने तयार करणे व गरजूंच्या माथी मारणे ही जगाची रीत आहे. शेती सुद्धा यापासून वंचित राहिलेली नाही. अशा उपयुक्त संकल्पनांच्या नावावर काही नफेखोर जर आपली महागडी उत्पादने जनमाणसांत खपवत असतील तर त्या मूळ संकल्पनेला चूक म्हणने सर्वथा मूर्खपणाचे आहे. असे प्रतिपादन करणाऱ्यांच्या बुद्धीची कीवही करू नये.
जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे.
9404075628
source : hellokrushi