कीड व्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती
18-03-2024
कीड व्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती
कीटक हे पृथ्वीतलावरील आकर्षक व लक्षवेधक जीव आहेत. सर्व प्राणी जातीचा विचार केल्यास दोन तृतीयांश किटकाच्या जाती आहेत. कीटक हे मनुष्याच्या कित्येक वर्ष आधी जवळपास ३५० दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर निर्माण झाले आहेत. कीटक हे ५ प्रकारच्या परिस्थितमध्ये आढळून येतात. जमिन, पाणी, हवा तसेच बर्फ आणि वाळवंटातदेखील कीटक आढळून येतात. कीटक म्हटल्यावर आपल्यासमोर घरातील माश्या, डास, झुरळ, मुंग्या इत्यादी हानिकारक किडी येतात. कीटक हे मानवास हानि पोहचवितात, पण काही कीटक फायदेशीर आहेत. कीटक हे जवळपास प्रत्येक वनस्पतीवर आढळून येतात. मनुष्यात अन्न, वस्त्र व निवारा उपलब्ध करून देणाऱ्या विविध पिकावर किटकांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नुकसान होते. पिकाशिवाय साठविलेले अन्नधान्याचे देखील कीटक मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. तसेच काही कीटक वनस्पतीमध्ये रोगाचा प्रसार करतात.
किडींच्या नुकसान करण्याच्या पद्धती
१. वनस्पती कुरतडून खाण्याऱ्या किडी
उदा. नाकतोडा, टोळ, अळ्या, भुंगेरे या किडी पाने,वनस्पतीचे इतर भाग कुरतडून खातात.
२. रस शोषण करणाऱ्या किडी उदा. मावा, तुडतुडे, पिठ्या ढेकूण, खवले कीड, ढेकूण, या किडी टोकदार अवयव वनस्पतीमध्ये खुपसून रसशोषण करतात.
३. गाठी निर्माण करणाऱ्या किडीः
उदा. गादमाशी, आंब्यावरील मिजमाशी, इत्यादि या किडी पानावर किंवा इतर भागावर गाठी निर्माण करतात.
४. मुळावर उपजिविका करणाऱ्या किडी
उदा. ऊसातील मुळा कुरतडणारी अळी, हुमणी, वाळवी, मावा या किडी वनस्पतीच्या मुळा पोखरुन कुरतडून किंवा रस शोषण करुन उपजिविका करतात.
५. अंडी देण्यामुळे नुकसान करणाऱ्या किडी: उदा. तुडतुडे, फळमाशी या किडी कळया, फुले किंवा फळामध्ये अणकुचीदार अवयवाद्वारे अंडी घालतात. त्यामुळे त्यावर जखमा झाल्यामुळे नुकसान होते.
६. वनस्पतींचा भाग पोखरून नुकसान करणाऱ्या किडी: उदा. खोड किडा, फळ पोखरणाऱ्या कीडी, नागअळी, फळमाशी, बोंडअळी. या किडी खोड, फळे, पाने, बोंडे इत्यादी पोखरून नुकसान करतात.
७. रोगांचा प्रसार करणाऱ्या किडी उदा. मावा, फुलकिडे, पांढरी माशी. या किडी वनस्पतीमध्ये सुक्ष्म जंतुद्वारे होणाऱ्या रोगाचा प्रसार करतात.
किटकनाशके वापरताना घ्यावयाची काळजी, फवारणीनंतर पीक काढणीचा काळ या बाबीसुध्दा माहिती असणे आवश्यक आहेत.
कीड व्यवस्थापनाच्या पध्दती
१. मशागतीय पध्दती: पीक उत्पादनासाठी शेतकरीवापरत असलेल्या तंत्रज्ञानाचा कीड व्यवस्थापनासाठी उपयोग करणे, याला मशागतीय पध्दती म्हणतात. यामुळे पिकांना पोषक व किडींना प्रतिकुल वातावरण निर्माण होतो.
उदा. नांगरणी, कोळपणी, काडीकचरा नष्ट करणे, निरोगी बी-बियाणे वापरणे, तणांचा बंदोबस्त, योग्यवेळी पेरणी, प्रतिकारक्षम वाणांचा वापर, पिकाची फेरपालट, सापळा पिके, मिश्र व आंतर पिके, पाणी देणे. क्षेत्रीय पेरणी, बीजप्रक्रिया.
२. यांत्रिक पध्दती विविध यंत्र किंवा उपकरणे आणि मानवी शक्तीचा वापर करुन किडींना मारणे किंवा किडींना खाद्यपर्यंत पोहचू न देणे, याला यांत्रिक पध्दती म्हणतात. उदा. हाताने किडी जमा करणे, कीडग्रस्त भाग नष्ट करणे, जाळीने किडी पकडणे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे, धान्य चाळणे, चिकट सापळे, खोडाभोवती चिकट पदार्थ किंवा पत्रा लावणे, शेताभेवती चर खोदणे, फळांना झाकणे, धूर करणे, आग निर्माण करणारे यंत्र.
३. भौतिक पध्दती : वातावरणाचे अजैविक घटक
जसे तापमान, आर्द्रता ईत्यादीमध्ये बदल घडक कीड व्यवस्थापन करण्याला भौतिक पध्दत म्हणतात. उदा. धान्य वाळविणे, उष्ण पाण्याची प्रक्रिया, साचलेले पाणी काढून टाकणे, लाकडाचा भुसा किंवा राखेचा वापर, कमी तापमानात वस्तु ठेवणे, प्रकाश, ध्वनी यांचा वापर.
४. जैविक पध्दती किडींच्या नैसर्गिक शत्रुद्वारे व्यवस्थापनाला जैविक पध्दती म्हणतात.
उदा. परभक्षी कीटक (लेडीबर्ड बीटल, क्रायसोपा, भक्षक ढेकूण), परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा, अपेंटेलीस), सुक्ष्म जीव (बुरशी, विषाणू, जीवाणू), कोळी, पक्षी इत्यादी,
५. रासायनिक पध्दती किटकनाशकांचा वापर करुन कीड व्यवस्थापन करणे याला रासायनिक पध्दती म्हणतात.
उदा. निंबोळी अर्क, क्लोरपायरिफॉस, ईमाडाक्लोप्रीड, सायपरमेथ्रीन, स्पिनोसॅड इत्यादी.